You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलनः महेंद्र सिंह टिकैत यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन अचानक मागे घेतलं होतं तेव्हा...
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह सोफ्यावर बसून खड्या गोरखपुरिया लहेजामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे, पण या खड्या सुरामध्ये बोलणारा कोणीतरी आपल्याहून वरचढ ठरणारा इसम असेल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.
1987 साली करमूखेडी बिजलीघर इथून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला कंटाळून वीर बहादूर सिंह यांनी भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष महेंद्र सिंह टिकैत यांना संपर्क साधला आणि सिसौली या त्यांच्या गावी येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय जाहीर करायची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वीर बहादूर सिंह यांना त्यांच्याहून खडा सूर ऐकू आला.
टिकैत यांनी यावर सहमती दर्शवली, पण या बैठकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा नसेल व वीर बहादूर सिंह यांच्यासोबत काँग्रेसचा कोणी नेता वा पोलीस येणार नाहीत, अशी अट त्यांनी घातली.
वीर बहादूर सिंह 11 ऑगस्ट 1987 रोजी हेलिकॉप्टरने सिसौलीमध्ये उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं आणि सभास्थानी जाण्यासाठी त्यांना जवळपास अर्धा किलोमीटर चालावं लागलं. मंचावर बसल्यानंतर त्यांनी प्यायला पाणी मागितलं, तेव्हा टिकैत यांच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना हातांची ओंजळ करायला लावून त्यात पाणी दिलं.
अशाप्रकारे पाणी प्यायला लावल्यामुळे वीर बहादूर सिंह यांचा अपमान झाला. टिकैत एवढ्यावरच थांबले नाहीत. ते मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा वीर बहादूर सिंह यांच्या उपस्थितीतच त्यांनी सरकारच्या चुका परखडपणे मांडल्या. या सगळ्या प्रकाराने वीर बहादूर सिंह इतके नाराज झाले की कोणतीही घोषणा वा चर्चा न करताच ते लखनौला परत गेले.
राजकीय नेत्यांना मंचांपासून कायम ठेवलं दूर
सहा फुटांहून अधिक उंच, अंगावर कायम जाड कापडाचा कुर्ता आणि डोक्यावर गांधी टोपी आणि वेदना कमी करण्यासाठी कंबरेला बांधलेला पट्टा - अशा रूपात समोर येणाऱ्या महेंद्र सिंह टिकैत यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1935 रोजी शामलीपासून 17 किलोमीटर दूर असणाऱ्या सिसौली गावात झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतर ते बालियान खाप पंचायतीचे चौधरी झाले तेव्हा त्यांचं वय केवळ आठ वर्षं होतं.
ज्येष्ठ पत्रकार विनोदी अग्निहोत्री सांगतात, "महेंद्र सिंह टिकैत योगायोगाने शेतकरी नेते झाले. खरंतर चौधरी चरणसिंह यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. त्याच वेळी उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विजेच्या दरात वाढ केली. शेतकऱ्यांनी या विरोधात आंदोलन सुरू केलं. टिकैत बालियान खापचे चौधरी असल्यामुळे त्यांना पुढे करण्यात आलं. या आंदोलनामध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महेंद्र सिंह टिकैत अचानक शेतकऱ्यांचे नेते झाले."
बीबीसीसोबत काम केलेले ज्येष्ठ पत्रकार कुर्बान अली म्हणतात, "गोळीबार झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मी टिकैत यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या गावी गेलो, तेव्हा शेकडो लोक त्यांच्या आसपास बसल्याचं दिसलं आणि त्यांनी आपल्या घरात देशी तुपाचा दिवा लावून ठेवला होता. त्या काळी टिकैत यांना राजकारणाची बाराखडीदेखील येत नव्हती. पण त्यांनी भारतीय किसान युनियनची स्थापना केली, तेव्हा त्याआधी ठळक अक्षरांत लिहिलं- 'बिगरराजकीय.'
"कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांनी स्वतःच्या मंचावर येऊ दिलं नाही. एकदा तर चरण सिंह यांच्या विधवा पत्नी गायत्री देवी व त्यांचा मुलगा अजित सिंह हे टिकैत यांच्या मंचापाशी पोचले, तेव्हा त्यांच्या मंचावर कोणीही राजकीय व्यक्ती येऊ शकत नाही, हे या मायलेकांना हात जोडून सांगितलं होतं."
टिकैत यांचा लहेजा दिल्लीच्या पत्रकारांना समजायचा नाही
महेंद्र सिंह टिकैत यांची खासियत म्हणजे ते सरळसाधे होते. विनोद अग्निहोत्री सांगतात, "टिकैत लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा ते स्वतःच्या हाताने शेती करायचे. ते स्वतः ऊस कापत असल्याचं मी पाहिलेलं आहे. ते थेट गावरान भाषेत प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधायचे. त्यांना शहरी धाटणीची भाषा येत नव्हती.
"मी नवभारत टाईम्समध्ये पश्चिम उत्तर प्रदेश भागाचा प्रतिनिधी होतो, तेव्हा दिल्लीहून मेरठला येणारा प्रत्येक पत्रकार मला सोबत घेऊन टिकैत यांच्याकडे जायचा, जेणेकरून मी दुभाषी म्हणून काम करू शकेन. त्या पत्रकारांना टिकैत यांची बोली समजणं अवघड जायचं. टिकैत खूप परखड होते आणि एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही, तर ते तसं तोंडावर सांगून मोकळे व्हायचे."
मेरठमधील दंगली थांबवण्यामधील टिकैत यांची भूमिका
टिकैत हे प्रेमविवाहाच्या आणि टीव्ही बघण्याच्या पूर्णतः विरोधात होते, पण शोले हा चित्रपट पाहायला मात्र ते कधीही नकार देत नसत. टिकैत यांना चौधरी चरण सिंह यांच्यानंतरचा शेतकऱ्यांचा दुसरा प्रेषित मानलं जात होतं.
एका लोककथेनुसार सातव्या शतकातील राजा हर्षवर्धनने त्यांच्या कुटुंबाला टिकैत हे नाव दिलं होतं. पण विसाव्या शतकातलं ऐंशीचं दशक येईपर्यंत महेंद्र सिंह टिकैत स्वतःच 'किंगमेकर' झाले होते. लोकसभेच्या 12 आणि विधानसभेच्या 35 मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या 2 कोटी 75 लाख जाट मतदारांवर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसत होता.
1987 साली मेरठमध्ये भयंकर जातीय दंगली झाल्या. कुर्बान अली सांगतात, "या दंगली तीन महिने चालल्या, पण टिकैत यांनी या दंगलींची आग मेरठ शहराच्या हद्दीबाहेर जाऊ दिली नाही. त्यांनी गावोगावी जाऊन पंचायती भरवल्या व हिंदू-मुस्लिमांचं ऐक्य टिकवून ठेवलं."
त्यांच्या मंचावर कायम एक मुस्लीम नेता असायचाच. ते स्वतः मंचावर बसायचे नाहीत. प्रत्येक सभेमध्ये ते शेतकऱ्यांसोबत खाली बसायचे आणि भाषणापुरते मंचावर येऊन मग परत खाली शेतकऱ्यांत जाऊन बसायचे.
'सिलौली ते दिल्ली बैलगाड्यांची रांग लावू'
टिकैत यांच्या कारकीर्दीमधील सर्वोच्च क्षण 25 ऑक्टोबर 1988 रोजी आला. त्या दिवशी त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध बोट क्लबच्या लॉनवर पाच लाख शेतकऱ्यांना एकत्र आणलं. उसाचा भाव वाढवण्यात यावा, पाणी व विजेचा दर कमी करावा, आणि शेतकऱ्यांची कर्जं माफ करण्यात यावी अशा त्यांच्या मागण्या होत्या.
दिल्लीला येण्यापूर्वी त्यांनी शामली, मुझफ्फरनगर व मेरठ इथे मोठी ठिय्या आंदोलनं केली होती. मेरठमध्ये त्यांनी 27 दिवस आयुक्तालयाला घेराव घातला होता.
"दिल्लीला जाण्याची घोषणा त्यांनी खास त्यांच्या शैलीत केली होती. सिसौली या त्यांच्या गावी दर महिन्याच्या 17 तारखेला शेतकऱ्यांची पंचायत भरत असे. तिथेच त्यांनी घोषणा केली की, 'आठवड्याभराने आपण सिसौली ते दिल्ली बैलगाड्यांची रांग लावू.' त्यानंतर केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांचे हातपाय गळून गेले होते," अशी आठवण विनोद अग्निहोत्री सांगतात.
"शेतकरी दिल्लीत पोचू नयेत यासाठी आधी प्रयत्न केले गेले. तत्कालीन गृह मंत्री बूटा सिंह, राजेश पायलट, बलराम झाकड व नटवर सिंह यांनी खूप खटपट केली, पण त्यांना टिकैत यांचं मन वळवता आलं नाही. मग त्यांना दिल्लीत येऊ देण्यात आलं. शेतकरी एक-दोन दिवस दिल्लीत थांबून निघून जातील, असं सत्ताधाऱ्यांना वाटलं. पण आंदोलकांनी इंडिया गेट ते विजय चौक या परिसरात तंबूच ठोकले."
राजपथावर चुली पेटल्या
मध्य दिल्लीमधील या प्रतिष्ठित परिसरावर शेतकऱ्यांनी कब्जा करण्याची ही घटना अभूतपूर्व होती आणि त्यानंतरही कधी असं काही घडलेलं नाही. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातून ट्रॅक्टर, ट्रॉल्या व बैलगाड्या यांमधून साधारण आठवड्याभराचा शिधा घेतलेले शेतकरी दिल्लीत दाखल झाले आणि बोट क्लबमध्येच त्यांनी तात्पुरते तंबू ठोकले.
एक-दोन दिवस सरकारने त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही, पण राजपथच्या आसपास तंबू लावून शेतकऱ्यांनी चुली पेटवल्या, गायी-गुरांना बोट-क्लबवरच्या गवतात चरायला सोडलं, तेव्हा सत्ताधारी खडबडून जागे झाले.
दिवसभर शेतकरी टिकैत व इतर शेतकरी नेत्यांची भाषणं ऐकायचे आणि रात्री नाचगाणी होत. विजय चौक ते इंडिया गेट या परिसरात शेतकऱ्यांना आराम करण्यासाठी गवताच्या गंज्या पसरण्यात आल्या होत्या.
हे गोरगरीब शेतकरी कनॉट प्लेसमधील कारंज्यांवर आंघोळ करताना पाहिल्यावर दिल्लीच्या उच्चभ्रूंना धक्का बसला. रात्री अनेक लोक कनॉट प्लेस बाजारपेठेतील परिसरामध्ये चादरी टाकून झोपायला लागले. परंतु, टिकैत यांना याची पर्वा नव्हती. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोवर ते डगमगणार नव्हते. या सगळ्या घडामोडींदरम्यान त्यांचा लाडका हुक्का सतत त्यांच्या सोबत असायचा आणि अधूनमधून ते माइकवरून लोकांना संबोधित करून आंदोलनासाठी ऊर्जा पुरवत असत.
दणदण करणारं संगीत लावून टिकैत यांना हुसकावण्याचा प्रयत्न
राजपथाजवळ एकत्र आलेल्या लाखो शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अनेक खटपटी करून पाहिल्या. त्या भागातील पाणी व खाण्याचा पुरवठा थांबवला.
मध्यरात्री आंदोलनकर्त्यांना व त्यांच्या गायीगुरांना त्रास देण्यासाठी लाउडस्पीकरवर गोंगाटी संगीत वाजवण्यात आलं. दिल्लीमधील सर्व शाळा व महाविद्यालयं बंद करण्यात आली आणि दिल्लीचे सर्व वकील शेतकऱ्यांचं समर्थन करत उपोषणाला बसले.
नैनितालमधील काही श्रीमंत शेतकऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भरून सफरचंद व गाजराचा हलवा पाठवला. त्या वेळी हरियाणाचे मुख्यमंत्री व विख्यात जाट नेते देवी लाल यांना महेंद्र सिंह टिकैत यांचं असं आंदोलन करणं रुचलं नाही.
टिकैत यांनी आधी राजकीय सत्ता मिळवण्यासाठी लढायला हवं होतं, असं देवी लाल यांचं मत होतं. त्या काळी मोबाइल, इंटरनेट किंवा टीव्ही यांपैकी काहीच नव्हतं. तरीही टिकैत यांच्या आंदोलनाने शेतीतज्ज्ञांचं व सरकारचं लक्ष वेधून घेतलं.
अचानक ठिय्या आंदोलन मागे घेण्याची घोषणा
बोफोर्स घोटाळ्यामुळे आधीच गोत्यात आलेल्या राजीव गांधी यांनी टिकैत यांच्या नादी लागू नये, असा सल्ला त्यांच्या निकटवर्तीयांनी दिला. सरकारच्या वतीने रामनिवास मिर्धा व श्यामलाल यादव टिकैत यांच्याशी बोलणी करत होते. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम 31 ऑक्टोबरला होणार होता, त्यामुळे त्या आधी हे प्रकरण मिटवण्याचाही दबाव होता.
अखेरीस सरकारने इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या सभेचं स्थान बदललं व शक्तिस्थळावर सभा घेण्याचं ठरलं. सरकार अडचणीत आल्याचं पाहून टिकैत यांना गंमत वाटत होती.
ते वारंवार म्हणत होते, "आपल्याला किती काळ इथे थांबावं लागेल माहीत नाही. शेतकऱ्यांना काही भाड्याने इथे आणलेलं नाही."
पण 30 ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता टिकैत यांनी अचानक घोषणा केली, "बंधुंनो, खूप दिवस झालेत. आता आपण घरी जाऊन कामाला लागायला हवं. आपण हे ठिय्या आंदोलन थांबवून आपापल्या गावी परत जाऊ."
तोपर्यंत सरकारने टिकैत यांच्या 35 मागण्यांपैकी एकही मागणी औपचारिकरित्या मान्य केलेली नव्हती, त्यामुळे आंदोलन असं अचानक मागे घेण्याचं राजकीय विश्लेषकांना आश्चर्य वाटलं. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असं मात्र सरकारने सांगितलं होतं.
टिकैत यांनी ही घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी राजपथावरून आपापलं सामान आवरायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या या शक्तिप्रदर्शनानंतरच बोट क्लब परिसरात सभा घेण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)