शेतकरी आंदोलनः 15 हजार शेतकरी मुंबईत आंदोलन, शरद पवार होणार सहभागी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारत सरकारने केलेले नवे शेती कायदे रद्द करण्यासाठी तसेच शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत.

उद्या (25 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काल 23 जानेवारी रोजी नाशिक ते मुंबई असा हजारो शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन सुरू केला.

नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी, दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला.

देशभरात आंदोलन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे 24 जानेवारी रोजी सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा सामील होईल.

कोणत्या संघटना सहभागी झाल्या आहेत?

राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

दिनांक 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील.

राजभवनाच्या दिशेने मोर्चा

सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन या महामुक्कामाची सांगता होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)