एल्गार परिषदेसाठी अरुंधती रॉय आणि कन्नन गोपीनाथन प्रमुख वक्ते #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. 'एल्गार परिषद 30 जानेवारीला होणार'
'भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान' यांची एल्गार परिषद 30 जानेवारी रोजी होणार असून त्याविषयीची माहिती देणारं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एल्गार परिषदेत लेखक अरुंधती रॉय, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला हे प्रमुख वक्ते असणार आहेत. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
यापूर्वी 31 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा-सुव्यवस्था आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली होती.
आता हीच एल्गार परिषद 30 जानेवारी रोजी घेण्याचे नियोजन आयोजकांनी केले आहे. यादिवशी रोहित वेमुला यांचा जन्मदिवस आहे.
2. मुंबई महानगरपालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचा तुटवडा
को-विन अपमध्ये दुरुस्ती केल्यानंतर मुंबईत आजपासून (19 जानेवारी) कोरोना व्हायरस लशीच्या मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. पण 50-55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देता येईल एवढेच डोस उपलब्ध असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.

फोटो स्रोत, SOPA IMAGES
मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आहेत. 28 दिवसांत प्रत्येक कर्मचाऱ्याला लशीचे दोन डोस देण्यात येतील. सकाळने हे वृत्त दिले आहे.
बीएमसीला कोव्हिशिल्डचे 1,39,500 डोस मिळाले आहेत. "लस दिलेल्या पहिल्या 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारकडून अधिक लस आल्याशिवाय आम्ही लस उपलब्ध करून देऊ शकत नाही." अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
3. कोरोनाची लस घेतल्यानंतर 580 जणांना आरोग्य विषयक तक्रारी - केंद्र सरकार
आतापर्यंत एकूण 3.8 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. यापैकी 580 जणांच्या लस घेतल्यानंतर काही आरोग्य विषयक तक्रारी समोर आल्या आहेत तसंच सात जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

फोटो स्रोत, Reuters
दोन जणांचा मृत्यू झाला पण त्याचा संबंध लशीशी नव्हता असंही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. एनडिटिव्हीने हे वृत्त दिले आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून मृत्यूची बातमी समोर आली आहे. महिपाल सिंह (46) हे सरकारी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयम्हणून काम करत होते. मृत्यूच्या 24 तास आधी त्यांनी लस घेतली होती. पण मृत्यू लसीमुळे झाला नसल्याचं जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पोस्ट मॉर्टममध्ये मृत्यूचे कारण हे फुफ्फुसाच्या आजारामुळे किंवा कार्डिओजेनिक शॉक यामुळे झाल्याचे उघड झाले आहे.
कर्नाटकातही 43 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूची घटना घडली आहे. कार्डिओ पलमोनरी फेल झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
4. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाला मोठा धक्का?
भाजपचे आमदार नितेश राणे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनोळी गावात शिवसेनेने बाजी मारली असून सात जागांपैकी पाच जागांवर शिवसेनेचे पॅनेल विजयी ठरले आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, Facebook
भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेनेत सतत आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू असतात. नितेश राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नितेश राणेंनी मात्र 70 पैकी 55 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचा दावा केला आहे. हा पंतप्रधानांच्या कृषी कायद्यांचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
5. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चासाठी परवानगी देण्याचा अधिकार दिल्ली पोलिसांना- सर्वोच्च न्यायालय
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याबाबत शेतकरी ठाम आहेत. पण यासाठी परवानगी देण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदूने हे वृत्त दिले आहे.
ट्रॅक्टर मोर्चामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे परवानगी नाकारावी असा अर्ज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता.
ट्रॅक्टरवर मोर्चा काढणे हा आमचा अधिकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण प्रजासत्ताकदिनी देशाच्या राजधानीत कसे नियोजन असावे तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना आहेत असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























