शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक जणांना एनआयएची नोटीस

    • Author, खुशहाल लाली
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

कट्टरतावाद आणि बेकायदेशीर कारवायांचा तपास करणाऱ्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) नं पंजाबशी संबंधित असलेल्या अनेक जणांना लोकांना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याच्या (युएपीए) च्या कलमांतर्गत नोटीस बजावली आहे.

शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या पंजाबच्या 32 शेतकरी संघटनांपैकी एका संघटनेचे नेते बलदेव सिंह सिरसा आणि शेतकरी आंदोलनाला गेल्या काही महिनांपासून समर्थन देणारे चित्रपट कलाकार दीप सिद्धू यांचं नावही नोटीस बजावलेल्या लोकांमध्ये आहे.

15 जानेवारीला शेतकरी आणि सरकार दरम्यान झालेल्या चर्चेदरम्यानही शेतकरी नेत्यांनी आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांविरोधात खटले दाखल करण्याबद्दल गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि खटले मागे घेण्याची मागणीही केली होती.

दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पेजवर एनआयएनं बजावलेल्या नोटीसची कॉपी शेअर केली आहे. या कॉपीनुसार एनआयएनं इन्स्पेक्टर धीरज कुमार यांच्या सहीनं नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसनुसार सर्व व्यक्तींना 17 जानेवारीला एनआयएच्या नवी दिल्लीतील लोधी रोड इथल्या मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

नोटीसनुसार ज्या प्रकरणांमध्ये या सर्वांची चौकशी होणार आहे, त्या प्रकरणी 15 डिसेंबर 2020 ला आयपीसीच्या कलम 120 (बी), 124 (ए),153 (ए) आणि 153 (बी) अंतर्गत तसंच यूएपीएच्या कलम 13, 17, 18, 18 (बी) आणि 20 अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत.

व्हॉट्स अपच्या माध्यमातून नोटीस

शेतकरी नेते बलदेव सिंह सिरसा यांनी एनआयएकडून नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

त्यांनी म्हटलं, "आम्हाला नोटीस मिळाली आहे. नोटीसमध्ये अतिशय कमी वेळ देण्यात आला आहे. काल आम्हाला ही नोटीस मिळाली आणि ती व्हॉट्स अपवर पाठविण्यात आली आहे. ही नोटीस खरंच एजन्सीकडून आली आहे की इतर कोणी ही पाठवली आहे, हेही आम्हाला माहीत नाही. कारण आजकाल फोनवर खूप काही होत असतं.

सिरसा यांनी सांगितलं, "जर ही नोटीस एजन्सीनं पाठवली असेल तर ती लिखित स्वरुपातली, पोस्टानं पाठवलेली असायला हवी होती. अशा संस्थांचे जागोजागी विभाग असतात, ते आम्हाला लेखी नोटीस पाठवू शकतात."

सिरसा यांनी पुढे सांगितलं, "माझ्या नातीचं लग्न आहे. मी त्याच्या खरेदीसाठी आलो आहे. 7 फेब्रुवारीच्या आधी एनआयएसमोर उपस्थित राहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. मी त्यांना माझ्या वकिलांच्या माध्यमातून एक चिठ्ठी पाठवली आहे."

कोणाला पाठविण्यात आली आहे नोटीस?

बलदेव सिंह सिरसा (शेतकरी नेते)

दीप सिद्धू, अभिनेता और शेतकरी आंदोलनाचे समर्थक

मनदीप सिद्धू (दीप सिद्धू यांचे भाऊ)

बलतेज पन्नू (पत्रकार,पटियाला)

जसवीर सिंह (पत्रकार, श्री मुक्तसर साहिब)

परमजीत सिंह अकाली (अमृतसर)

नोबलजीत सिंह (होशियारपुर)

जंग सिंह (लुधियाना)

प्रदीप सिंह (लुधियाना)

सुरिंदर सिंह ठिक्रीवाला (बरनाला)

पलविंदर सिंह (अमरकोट)

जज इंद्रपाल सिंह (लुधियाना)

रणजीत सिंह दमदमी टक्साल (अमृतसर)

कर्नल सिंह दसूहा (होशियारपुर)

तेजिंदर सिंह, पत्रकार अकाल चॅनल

नोटिशीवर प्रतिक्रिया

एनआयएनं पाठवलेल्या नोटीसला शेतकरी संघटनांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हटलं आहे.

सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या गटाला संबोधित करताना शेतकरी नेते सुरजीत सिंह फूल यांनी म्हटलं की शेतकरी आंदोलन आणि त्याच्या समर्थकांना दडपण्यासाठी हे केलं जात आहे.

याच दरम्यान पंजाब काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार राजकुमार वेरका यांनी म्हटलं, "सीबीआय असो की ईडी किंवा एनआयए...या सर्व घटनात्मक संस्थांचा वापर केंद्र सरकार कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे करून घेत आहे. त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेतलं जात आहे. असं करून शेतकऱ्यांना घाबरलं जात आहे. खलिस्तानी, नक्षलवादी किंवा कट्टरतावादी म्हटलं जात आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)