कोरोना : पुण्यातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येतोय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सप्टेंबरमध्ये राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेलं शहर म्हणून पुण्याचं नाव घेतलं जात होतं. वाढणारी रुग्ण संख्या आणि बेड्सची कमतरता यामुळे पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते.
ही परिस्थिती आता 4 महिन्यांनंतर नियंत्रणात असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असून आता केवळ 2678 इतकेच रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा संसर्ग खरंच आटोक्यात आलाय का ?
सप्टेंबर महिन्यात बेड्स लवकर मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. पत्रकार पांडुरंग रायकर यांना देखील वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा सीओईपी येथील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये मृत्यू झाला.
सप्टेंबरमध्ये पुण्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत होता, तर आरोग्य व्यवस्था अपुरी पडत होती. 7 सप्टेंबरला पुण्यात 2053 इतके नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या दिवशी 3354 इतक्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. याच दिवशी तब्बल 37 रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता, तर 16830 इतके अॅक्टिव्ह रुग्ण होते.
चार महिन्यानंतर पुण्यात काय परिस्थिती?
पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यात जंम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आले. सीओईपी मैदानावर आणि पिंपरीतील मगर महाविद्यालयाच्या मैदानावर ही सेंटर्स उभारण्यात आली. सुरुवातीला सीओईपी येथील कोव्हिड सेंटरमधील अपुऱ्या सुविधांमुळे त्यावर टीका देखील करण्यात आली. योग्य उपचार मिळत नसल्याने येथील कॉन्ट्रक्टर बदलण्यात आला.
आता चार महिन्यानंतर पुण्यातील परिस्थिती बदलताना दिसत आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 7 जानेवारीला 202 इतके नवीन रुग्ण आढळून आले. या दिवशी 1911 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. 336 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला. या दिवशी पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2678 इतकी होती.
रुग्णसंख्या कमी होण्याची कारणं कोणती?
पुण्यातल्या गणेशोत्सवासाठी मोठी गर्दी होत असते. यंदा हा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याचबरोबर इतर अनेक सण देखील घरी राहूनच नागरिकांनी साजरे केले.

फोटो स्रोत, Getty Images
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर पुण्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. सरकारने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचाच परिणाम रुग्णसंख्या कमी होण्यात दिसून येतोय, असं निरीक्षण अनेकांनी नोंदवलं आहे.
मास्कचा वापर
सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार 500 रुपये दंड आकारण्यात येतो. सुरुवातील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर कारवाईचे अधिकार पोलिसांना देखील देण्यात आले.
2 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी तब्बल 1 लाख 72 हजार 631 इतक्या नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल दंड केला. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून आला. नागरिकांमध्ये देखील मास्कबाबत जागृती झाल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत झाली. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील अनेक ठिकाणी नागरिक करताना दिसून येत आहेत.
चाचण्यांची संख्या
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांवर भर द्यायला हवा असे जागतिक आरोग्य संघटना वारंवार सांगत होती. त्यानुसार पुण्यात देखील चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात आला. सुरुवातीला केवळ पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये चाचण्यांची सोय होती. त्यानंतर खासगी रुग्णालये आणि खासगी लॅब्समध्ये चाचण्या करण्यात येऊ लागल्याने शहरातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिवसाला 5 ते 6 हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. ही संख्या मधल्या काळात कमी झालेली दिसून आली. परंतु लक्षणे नसल्याने चाचण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने चाचण्या कमी दिसत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. 7 जानेवारीला 5043 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
नागरिकांमध्ये जागरुकता
पुण्यातील रुग्णसंख्या कमी होण्यात नागरिकांमधील जागरुकता हा देखील एक भाग आहे. पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे सांगतात, ''कोरोनाला रोखण्यात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मास्क, सॅनिटायझरचा वापर आता नागरिकांच्या अंगवळणी पडला आहे. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर नागरिक लगेच चाचणी करुन घेत आहेत. पालिकेने आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्याने बेड्सची उपलब्धता आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.
रेमडिसेव्हिर या औषधाच्या वापरामुळे देखील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या विषाणूची लागण क्षमता कमी झाल्याने देखील रुग्णसंख्या कमी झाल्याची शक्यता आहे. नागरिकांना लक्षणे दिसत नसल्याने काही दिवस चाचण्या देखील कमी झाल्या होत्या.''
''1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीचा अभ्यास केला तर चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 7 टक्क्यांच्या दरम्यान आहे. ही चांगली बाब आहे'' असं देखील वावरे सांगतात.
जम्बो कोव्हिड सेंटर बंद
रुग्ण संख्या कमी झाल्याने सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

फोटो स्रोत, Ani
1 जानेवारीपासून या ठिकाणी नवीन रुग्ण दाखल करुन घेणे बंद करण्यात आले. याबाबत 30 डिसेंबर रोजी बीबीसी मराठीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी पुण्यातील रुग्णसंख्या मर्यादित असल्याने तसेच इतर सरकारी तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता असल्याने जम्बो कोव्हिड सेंटर तात्पुरते बंद करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सेंटर बंद करण्यात येतंय याचाच अर्थ पुणे शहरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चिंन्ह आहे असंही ते म्हणाले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)























