कोरोना लस: राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल, 'भारताचा नंबर कधी लागणार'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना लस केव्हा येणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारतात कोरोनाची लस कधी येणार याची चर्चा देखील शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण अद्याप भारतात लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.

कोरोनाचे लसीकरण भारतात कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

जगभरातल्या 23 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीन, अमेरिका, रशिया आणि युकेत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताचा नंबर कधी लागणार मोदीजी असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक चार्टसुद्धा टाकला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोणत्या देशात किती जणांना लस देण्यात आली ही माहिती देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या प्रश्नाला अद्याप भाजपने किंवा सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की जानेवारीमध्ये भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. भारतात जानेवारी ते मार्च या काळात लसीकरणाला सुरुवात होईल असा अंदाज होता पण जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती.

सध्या कोरोनाचा नवा स्ट्रेन युकेमध्ये आढळला आहे. या स्ट्रेनबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. हा स्ट्रेन अनियंत्रित नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं होतं. नवा स्ट्रेन आल्यावर लसीकरणावर काही परिणाम होईल का? अशी देखील चर्चा सुरू होती. अनेकांच्या मनात ही शंका आहे की नव्या स्ट्रेनमुळे लसीकरणावर काही फरक तर पडणार नाही ना? लस निर्माण करणाऱ्या या स्ट्रेनबाबत आणि लसीबाबत चाचण्या करत आहेत.

लसीकरणावर परिणाम होईल का?

कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे कोरोना लसीवर काही परिणाम होईल का? आतापर्यंत ज्या लसी विकसित करण्यात आल्या आहेत त्या विषाणूच्या बदललेल्या स्वरुपावरही परिणामकारक ठरतील का? याचीही चिंता लागून आहे.

याविषयी बोलताना डॉ. पॉल म्हणाले, "सध्यातरी युकेमध्ये आढळलेल्या कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनचा लसींच्या परिणामकारकतेवर काही फरक पडेल, असं दिसत नाही."

ते पुढे म्हणाले, "युकेतल्या संशोधकांशी, जागतिक आरोग्य संघटनेतल्या आपल्या सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून आणि आम्ही केलेल्या अभ्यासातून घाबरण्याची गरज नाही, असं आपण म्हणू शकतो. विषाणूमधल्या म्युटेशनमुळे उपचाराची पद्धत आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या म्युटेशनचा लसीच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही."

मात्र, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची संक्रमित करण्याची वाढलेली क्षमता बघता लोकांना यापुढे अधिक सावधगिरी बाळगायला हवी आणि वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे, दारं, खिडक्या उघड्या ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)