'किसान एकता मोर्चा' आयटी सेल, भाजपच्या आयटी सेलला टक्कर देईल?

शेतकरी, आंदोलन, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, किसान एकता मोर्चा
    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातलाय. 25 दिवस उलटून गेलेत. आंदोलनकर्ते शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत अशी त्यांची मागणी आहे.

गेल्या चार महिन्यांपासून भारतातील टिव्ही चॅनल्स, वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत आहे. न्यूयॉर्क टाईम्स आणि द गार्डियन सारखी वृत्तपत्र शेतकरी आंदोलनाची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत.

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एकीकडे, शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. तर, सरकारही कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. कृषी कायद्यांच्या मुद्यावर तोडगा निघताना दिसत नाहीये.

शेतकरी मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या काही युवकांनी 'किसान एकता मोर्चा' नावाने आयटी सेल सुरू केला आहे. या आयटी सेलमध्ये 10 ते 15 तरुणांची टीम काम करतेय.

शेतकऱ्यांच्या आयटी सेलचे कॉ-ऑर्डिनेटर हरिंदर हप्पी सांगतात, 'शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या युवकांनी, आंदोलनाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरू केला आहे.'

चार दिवसात सोशल मीडिया अकाऊंटला तुफान प्रतिसाद

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ग्रामीण विकास या विषयाचा अभ्यास करणारे हरिंदर सांगतात, 'गेल्या काही वर्षात शेतीवर मोठं संकट ओढवलं आहे. माझ्यासारखे काही युवक याचा अभ्यास करत आहेत. या संकटाचा सामना करत आम्ही मोठे झालो. मात्र, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं. यामुळेच आम्ही या आंदोलनात सहभागी झालो.'

काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या 'किसान एकता मोर्चा' ला फेसबुकवर फॉलो करणाऱ्यांची संख्या 1.30 लाख़ांपर्यंत पोहोचली आहे.

शेतकरी, आंदोलन, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक

ट्विटरवर 'किसान एकता मोर्चा' ला 94.6 हजार लोक फॉलो करतात. तर, यूट्यूबवर 6.75 लाख लोकांनी 'किसान एकता मोर्चा' ला फॉलो केलंय.

'किसान एकता मोर्चा' च्या पेजवर शेतकऱ्यांची भाषणं, शेतकरी नेत्यांच्या मुलाखती, फॅक्ट चेक आणि आंदोलनासंबंधी माहिती दिली जाते. एवढंच नाही, तर शेतकरी आंदोलनाविरोधी पोस्टना उत्तर या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यामातून दिलं जातं.

पण, प्रश्न असा आहे की, 'किसान एकता मोर्चा' आयटी सेल बनवण्याची गरज का पडली?

आव्हानात्मक परिस्थिती

दिल्लीत थंडीचा कडाका सुरू झालाय. एकीकडे हाडं गोठवणारी थंडी. तर, दुसरीकडे 'किसान एकता मोर्चा' च्या आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या युवकांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानही अपुरं आहे.

हरिंदर पुढे सांगतात, 'चलो दिल्लीचं आवाहन केल्यापासून आम्ही या आंदोलनात सक्रिय झालो. घरी गेलेलो नाही. चार दिवसापूर्वी आम्ही आयटी सेल सुरू केला. शेतकरी नेत्यांपासून सर्वांनी आमच्या या मोहिमेचं स्वागत केलं.'

शेतकरी, आंदोलन, सोशल मीडिया

फोटो स्रोत, EPA/RAMINDER PAL SINGH

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक

'आयटी सेलच्या माध्यामातून, भाजपच्या आयटी सेलला टक्कर देऊ शकू अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे साधनं कमी आहेत. दोन-तीन लॅपटॉप आहेत. घर भाड्याने घेऊन काम सुरू केलंय. शेतकरी नेत्यांची भाषणं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण, नेत्यांची भाषणं लाईव्ह दाखवण्याचं मोठं आव्हान पेलावं लागत आहे. आम्हाला जास्तीत-जास्त लोकांची गरज आहे.'

'दिल्लीत आमच्यासोबत आयटी सेलचं काम सांभाळणारे 10 लोक आहेत. यातील काही लोकांकडे पाच, तर काहीकडे दहा वर्षांचा अनुभव आहे. या टीमचे प्रमुख बलजीत सिंह आहेत. पण, सद्य स्थितीत काम करणाऱ्यांची संख्या अपूरी आहे. काहीवेळा सकाळी चार वाजेपर्यंत काम करावं लागतं,' असं हरिंदर पुढे सांगतात.

भाजपच्या आयटी सेलचा सामना

शेतकरी आंदोलनाविरोधात गेल्या 26 दिवसात अनेकवेळा प्रोपगंडा चालवण्यात आला. शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक पोस्टर समोर आले. फॅक्टचेक करणाऱ्या ऑल्टन्यूजने अशा प्रकारच्या अनेक बातम्यांचं खंडन केलं.

हरिंदर सांगतात, 'सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या अनेक वक्तव्यांचं आम्ही खंडन करतो. उदाहरणार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले. तर, त्याच्यावर आम्ही खोटं असं लिहितो. जेणेकरून लोकांना खरं काय आहे याची माहिती मिळेल.'

शेतकरी, आंदोलन, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आंदोलकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय

'शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी म्हणून संबोधण्यात आलं. या गोष्टींचा आम्ही विरोध करतो. सरकारमधील काही लोक म्हणतात, शेतकऱ्यांना भ्रम झालाय. एमएसपी कायम आहे. या वक्तव्यांना आम्ही शेतकरी नेत्यांकडून खोडून काढतो. त्याचसोबत पंजाबमधील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, लोक जीओचे सीमकार्ड फेकून देत आहेत. आपल्या शेतातून टॉवर उखडून टाकत आहेत. आम्ही ही सर्व माहिती सोशल मीडिया पेजवर टाकत आहोत. जेणेकरून भाजपच्या आयटी सेलच याकडे लक्ष जाईल. आम्ही सोशल मीडियावर टाकत असलेल्या सर्व गोष्ट सत्य आहेत, हा माझा विश्वास आहे,' असं हरिंदर पुढे सांगतात.

'किसान एकता मोर्चा' च्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आलेली माहिती खरी-खोटी, योग्य-अयोग्य यापुढे जाऊन विचार केला. तर, 'किसान एकता मोर्चा' शेतकऱ्यांची बाजू मांडणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून पुढे आलाय.

शेतकरी, आंदोलन, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक

हरिंदर पुढे सांगतात, 'पंजाबमध्ये जिल्हा स्त्ररावर विरोध प्रदर्शन करण्यात येत आहेत. पण, प्रत्येक गोष्ट मीडियामध्ये येत नाही. सामान्यांपर्यंत न पोहोचणारी माहिती, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.'

'किसान एकता मोर्चा' चे बलजीत सिंह व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना आवाहन करताना म्हणतात, 'शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देणारी एकादी गोष्ट तुम्ही केली. तर, त्याची व्हिडीओ क्लिप 'किसान एकता मोर्चा' च्या इनबॉक्समध्ये अपलोड करा. जेणेकरून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट आम्हाला पोहोचवता येईल.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)