राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांना नागपूरमधल्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.

"संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे," असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे."द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसंच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केलं. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्यावैद्य यांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. 'तरुण भारत'चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालवला आहे," असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

मा. गो. वैद्य कोण होते?

मा. गो. वैद्य हे पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे प्रचार प्रमुख होते.

मा. गो. वैद्य 1943 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं 'सुगम संघ' नावाचं हिंदी पुस्तक लिहिलं आहे. 1978 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)