You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळातही बीबीसीने राबवला युवा पत्रकारांसाठी प्रशिक्षण उपक्रम
सर्व जगभर कोरोनाचे थैमान असलेल्या या आव्हानात्मक वर्षात, बीबीसीच्या भारतीय भाषांतील सेवांनी प्रसारमाध्यमांचं शिक्षण घेणाऱ्या युवा पत्रकारांसाठी ट्रेनी स्कीम वेबिनारच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवली.
देशाच्या विविध भागातल्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित अशा वर्गातील उदयोन्मुख पत्रकारांना याचा लाभ मिळाला.
बीबीसी जोपासत असलेल्या संपादकीय मूल्यांसंदर्भात म्हणजेच निष्पक्षता, अचूकता, वस्तुनिष्ठ पत्रकारिता याबाबत 'जर्नलिझम- द बीबीसी वे' या वेबिनारच्या माध्यमातून सांगितलं गेलं. हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलुगू, तामीळ या सहा भारतीय भाषांमध्ये वेबिनारचं आयोजन केलं जातं.
रुपा झा, हेड ऑफ इंडियन लँग्वेजेस (भारतीय भाषांच्या प्रमुख) या म्हणतात, "पत्रकार म्हणून आपण सातत्याने आणि निष्पक्षपणे आपल्यासमोर मांडण्यात येणाऱ्या युक्तिवादाची छाननी करायला हवी, सहमतीने झालेल्या निर्णयावरही प्रश्न विचारता यायला हवेत, सत्ता ज्यांच्या हातात केंद्रित झाली आहे त्यांना प्रश्नांना बांधील करायला हवं."
कोरोना संकटादरम्यान राबवण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाचा भाग म्हणून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित अशा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांना आपण पत्रकारितेचं मूलभूत तत्व अर्थात निष्पक्ष या मूल्याधिष्ठित मार्गाने काम करण्याचं प्रशिक्षण दिलं.
गेल्या दोन वर्षात, आऊटरिच उपक्रमाद्वारे पत्रकारिता पदवीधारक तसंत पदव्युत्तर अशा युवा पत्रकारांची निवड करण्यात आली. बीबीसीच्या दिल्ली ब्युरोत त्यांना ज्येष्ठ पत्रकार तसंच प्रॉडक्शन टीमच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली.
बीबीसीच्या भारतीय भाषांमधील सेवांसाठी, न्यूजरुममध्ये टीव्ही, रेडिओ, डिजिटल तसंच सोशल मीडिया अशा विविध व्यासपीठांकरता काम करण्याची संधी या युवा पत्रकारांना मिळाली.
बीबीसीतर्फे आयोजित करण्यात आलेला ट्रेनी प्रोग्रॅम हा कारकीर्दीत महत्त्वाचं शिकण्याची संधी देणारा होता असं काही ट्रेनी अर्थात युवा पत्रकारांनी सांगितलं.
अनन्या दास 2018-19 च्या ट्रेनी स्कीमचा भाग होती. अनन्या सध्या बीबीसी मॉनिटरिंगसाठी पूर्ण वेळ काम करते. तिच्या अनुभवाबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, "ट्रेनी प्रोग्रॅमअंतर्गत मला न्यूजरुममधलं नवनवीन संधी, आव्हानं तसंच गुंतागुंतीचं काम समजून घेण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली."
"दररोज नवं काहीतरी समोर येणाऱ्या न्यूजरुममध्ये एकाचवेळी अनेक गोष्टी करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि निर्धार पक्का होत गेला. ऐकणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मला झाली. उपक्रमाअंतर्गत मी वैयक्तिक आणि कामाच्या पातळीवर अधिक कौशल्यपूर्ण झालं," अनन्या सांगते.
कैलास पिंपळकर सध्या बीबीसी मराठीसाठी काम करतो. कैलास म्हणतो, "बीबीसी हे माझ्यासाठी एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. इथे सर्वांना समान पद्धतीने वागवलं जातं. सगळे एकाच पातळीवर येऊन काम करतात. माझी पार्श्वभूमी ग्रामीण भागाची आहे.
"बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत मी कधी काम करेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. बीबीसी म्हणजे पत्रकारितेचं अत्युच्य असं प्रतीक आहे. मला बीबीसीमध्ये काम करण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान आहे. ट्रेनी स्कीममुळे पत्रकारितेची तत्त्वं अधिक टोकदारपणे बिंबवली गेली. सोशल मीडियासंदर्भात काम करण्यासाठी मिळालेला आत्मविश्वास मला आयुष्यभर उपयोगी पडेल," कैलास सांगतो.
चितवन विनायक ही 2019-2020 ट्रेनी स्कीमचा भाग होती. चितवन सध्या एका नामांकित प्रसारमाध्यम समूहासाठी काम करते. चितवनने ट्रेनी स्कीम उपक्रमाबद्दल बोलताना सांगितलं की, "पत्रकारितेशी संलग्न अशी सर्वसमावेशक आणि सर्वांगीण कौशल्यं घोटीव करण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारितेतील गुरुतुल्य व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने पत्रकारितेची तत्त्वं खोलवर भिनली."
"या तत्त्वांबरहकूम काम कसं करावं हे शिकता आलं. उपक्रमात सोशल मीडिया कौशल्यांवरही भर देण्यात आला. त्याचा मला अतिशय उपयोग झाला. कोणतीही बातमी किंवा लेख लिहितानाची माझी कौशल्यं अधिक पक्की झाली. व्हीडिओ सादरीकरण कसं करावं, व्हीडिओ कसे तयार करावेत याची सखोल माहिती मिळाली. बीबीसीच्या ट्रेनी स्कीम उपक्रमाचा भाग असल्यामुळेच मला राष्ट्रीय स्तरावरील एका संस्थेसाठी काम करण्याची संधी मिळाली," चितवन सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)