...तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल-मुख्यमंत्री #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. ...तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल-मुख्यमंत्री

"संत एकनाथ महाराजांनी पाणी आणायचं काम केलं, तर त्यांच्या शिष्याने कावडीने रांजण भरले. आज मुख्यमंत्री यांनी कावड आणली म्हणून हौद भरत आहे", अशी भावना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्हाला गाडगेबाबा सारखे काम करायचे आहे. पाण्यासाठी व अन्नासाठी. आजपर्यंत औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेची लेझीम सुरू होती. मात्र, माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल". 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झालं. या कार्यक्रमात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्रीखंड्या म्हणून उल्लेख केला.

"हे शहर शिवसेनाप्रमुखांचं आवडतं शहर आहे. काही म्हणतात की निवडणूक आली म्हणून तुम्ही आले. निवडणूक आली तर काम करायचे नाही का? इतके वर्षे रखडलेली योजना माझ्या हस्ते होतोय हे माझं भाग्य आहे", असंही मुख्यमंत्री म्हणाले.

2. देशविरोधी शक्तीकडून शेतकरी आंदोलन हायजॅक-निर्मला सीतारमण

शेतकरी आंदोलनात कृषीसंबंधी विषय मागे पडत असून देशविरोधी शक्तींनी हायजॅक केलं आहे असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

"कृषी क्षेत्रात होत असलेले हे बदल शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिला आहे. पुढील चर्चेसाठी सरकार सदैव तयार आहे. पण आता या आंदोलनात कृषीसंबंधी मुद्दे मागे पडत असल्याची भीती आहे. शेती आणि शेतकऱ्यांसंबंधी मुद्दे आता आंदोलनात मांडले जात नाही आहे.

"केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहेत. पुन्हा मागे जाणं हेदेखील तितकं चांगलं नाही", असं सीतारमण म्हणाल्या.

3. केरळमध्ये कोरोना लस विनामूल्य-मुख्यमंत्री

केरळमध्ये सर्वांना कोरोनावरची लस विनामूल्य मिळेल असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जाहीर केलं. बिहारच्या निवडणुकीत भाजपने राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचं आश्वासन दिलं होतं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्यात येईल. लशीचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहोत. केंद्राने हिरवा कंदील देताच सगळ्यात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल असं पिनराई यांनी स्पष्ट केलं.

केरळमध्ये कोरोना मृत्यूदर कमी होत असला तरी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

4. पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला केक खाण्यासाठी झुंबड

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. परळी शहरात मोंढा मैदानावर हा कार्यक्रम झाला. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

या कार्यक्रमात 81 किलोचा केक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सिनेअभिनेता गोविंदा यांच्या हस्ते कापण्यात आला. मात्र या कार्यक्रमानंतर केक खाण्यावरून स्टेजवरच मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.

तरुणांनी केक खाण्यासाठी धाव घेतली तर बच्चे कंपनीकडून एकमेकांवर केकचा मारा सुरू झाला. या सर्व प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल आता चांगलाच व्हायरल होत आहे.

5. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला, एकाचा मृत्यू, ६ जखमी

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या निमित्ताने वातावरण तापलं आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस पार्टी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

हलिशहर शहरातील कार्यकर्ता सैकत भवाल याची टीएमसीच्या गुंडांनी निर्घृण हत्या केल्याचं बंगाल भाजपने म्हटलं आहे. या हल्ल्यात सहाजण जखमीही झाले आहेत. जखमींना कल्याणीच्या जेएन मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरोघरी जाऊन प्रचार करत असताना सैकत यांच्यावर हल्ला झाल्याचं भाजपने म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

ही घटना वैयक्तिक वादातून घडली असल्याचं तृणमूलने म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली असल्याचा आरोप भाजप नेते मुकुल रॉय यांनी केला.

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गाडीवर बंगालमध्ये हल्ला झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)