You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोथरूड रानगवा मृत्यू: वन्यप्राणी शहरात आले, तर काय करायचं ?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
पुण्यातील कोथरुड भागात 9 डिसेंबरला रानगवा आल्याने सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली. सात तासाच्या थरारनाट्यानंतर त्याला बेशुद्ध करुन पकडण्यात वन विभागाला यश आले. परंतु नंतर या गव्याचा मृत्यू झाला.
गव्याला पकडताना अनेक अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागला. लोकांच्या गर्दीमुळे आणि आरडाओरड्यामुळे गवा बिथरला आणि इतरत्र धावू लागला. यात तो गंभीर जखमी देखील झाला. या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वन्यप्राणी शहरात आल्यावर काय करायचं?
"वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी अनेकदा बिबट्या शहरांमध्ये आल्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्राणी जर मानवी वस्तीत आले तर लोकांनी गोंधळ करु नये," असं माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर सांगतात.
"लोकांनी आरडाओरडा केला, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. हे प्राणी त्यांच्या अधिवासापासून बाहेर आलेले असल्याने ते घाबरेलेले आणि बिथरलेले असतात. त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी असते. यामध्ये ते आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळेच नागरिकांनी गोंधळ न करता संबंधित यंत्रणांना प्राण्याची माहिती देणं आवश्यक असतं," कुकडोलकर सांगतात.
यंत्रणांनी कुठली पाऊलं उचलायला हवीत?
एखादा वन्यप्राणी मानवी वस्तीत आला तर काय करायचं याबाबात प्रत्येक राज्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्याचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे.
कुकडोलकर म्हणतात, ''वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्याची पूर्वतयारी करणं आवश्यक असतं. त्याला पकडण्यासाठी लागणारं साहित्य, वाहनं, प्रशिक्षित मनुष्यबळ हे उपलब्ध आहे की नाही हे पाहणे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर पोलीस, महापालिका, वनविभाग यांनी समन्वय साधून काम करणं गरजेचं आहे.
"पोलिसांनी ज्या भागात वन्यप्राणी आला आहे त्या भागात कलम 144 लागू करुन तो भाग क्वारंटाईन करायला हवा. वनविभागाने त्या प्राण्याला पकडण्याची योजना आखायला हवी आणि तशी अंबलबजावणी करायला हवी. त्याचबरोबर त्या प्राण्याला पकडताना त्या प्राण्याची, नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा घेणं अत्यंत आवश्यक असतं," कुकडोलकर सांगतात.
वन्यप्राणी मानवी वस्तीत कसे येतात ?
शहरालगत नैसर्गिक अधिवास असल्याने वन्यप्राणी शहरांमध्ये येण्याची शक्यता असते. पुण्याच्या जवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्यात अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. या प्राण्यांचा अधिवासाता लोकांनी हस्तक्षेप केल्याने या प्राण्यांचं क्षेत्र कमी होत गेलं.
महाराष्ट्रातील अनेक गावं ही वनांवर अवलंबून आहेत. त्यामुळेसुद्धा या प्राण्यांच्या अधिवासाची प्रत खालावली आहे. या प्राण्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यासाठी अडचणी येत असल्याने ते बाहेर पडत आहेत.
"प्राण्यांना स्थलांतर करण्यासाठी आडोशाची, एका कॉरिडॉरची गरज असते. असा कॉरिडॉर उपलब्ध होत नव्हता. परंतु गेल्या काही वर्षात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात उसाची पिकं घेतली जात असल्याने या प्राण्यांना एक कॉरिडॉर तयार झालाय आणि यामुळे ते आता मानवीवस्तीतून स्थलांतर करतायेत," अशीही माहिती कुकडोलकर यांनी दिली.
प्राण्यांशी विचारपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक वागण्याची गरज
जंगलातून चुकून शहरात येणारे प्राणी इथला आवाज, लोकं यामुळे गोंधळतात आणि त्यांच्यावर ताण येतो. अशा प्राण्यांशी लोकांनी विचारपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक वागण्याची गरज असल्याचंही पुण्याचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील यांनी म्हटलंय.
"अशी घटना घडल्यास वनविभाग, पोलीस कर्मचारी, प्राण्यांचे डॉक्टर्स किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना शांतपणे काम करू द्यावं, गोंधळ करू नये जेणे करून या प्राण्यावर आणि रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही तणाव येणार नाही," असंही ते सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)