पार्थिव पटेल: धोनीआधी पदार्पण करून धोनीनंतर रिटायर होणारा चिरतरुण कीपर बॅट्समन

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सतराव्या वर्षी कसोटी पदार्पण, 2003 वर्ल्डकप विजेता संघाचा सदस्य, गुजरातला रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार, आयपीएल स्पर्धेत तब्बल सहा संघांचं प्रतिनिधित्व करणारा, लहान मुलासारखा चेहरा असल्याने वय लपणारा चिरतरुण विकेटकीपर बॅट्समन पार्थिव पटेलने 35व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं.

पार्थिवने 25 कसोटी, 38 वनडे आणि 2 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2002 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पोरसवदा पार्थिवने 17व्या वर्षी कसोटी पदार्पण केलं. त्यावेळी तो कसोटी क्रिकेटमधला सगळ्यात लहान वयात पदार्पण करणारा विकेटकीपर ठरला होता.

2003 मध्ये टीम इंडियाने 50 ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. पार्थिव त्या संघाचा भाग होता.

पार्थिवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर वर्षभरात महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी पदार्पण केलं. तडाखेबंद बॅटिंग, कीपिंग करणाऱ्या धोनीने टीम इंडियातलं स्थान पक्कं केलं.

2007 मध्ये टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकला. कर्णधार, विकेटकीपर आणि बॅट्समन या तिन्ही आघाड्यांवर धोनी मोठा होत गेला. पार्थिव संपूर्ण कारकीर्द धोनीच्या छायेत राहिला. धोनीने विश्रांती घेतल्यास किंवा दुखापतग्रस्त झाल्यानंतर पार्थिवला संधी मिळत असे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पार्थिवच्या संधी मर्यादित झाल्या तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरात संघाला आकार मिळवून दिला. पार्थिवच्या अनुभवाचा फायदा गुजरात संघाला झाला.

गुजरातला रणजी स्पर्धेचं जेतेपद मिळवून देण्यात कॅप्टन, कीपर आणि बॅट्समन पार्थिवची भूमिका मोलाची होती. 2016-17 हंगामात गुजरातने फर्स्ट क्रिकेटमधल्या अनुभवी आणि बलाढ्य अशा मुंबईला नमवत रणजी जेतेपदावर कब्जा केला होता. गुजरातच्या संघातील युवा खेळाडूंसाठी त्याने मेंटॉर म्हणूनही भूमिका निभावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या दबदब्यामुळे पार्थिवची कारकीर्द आक्रसत गेली. मात्र आयपीएल स्पर्धेत सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये पार्थिवचा समावेश होतो. पार्थिव मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोची टस्कर्स केरळा, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांसाठी खेळला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)