You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा : #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.'शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावं'
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.
अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही घोषणा केली आहे. 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. 'सामना'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
गेल्या 11 दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसंच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरियाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली असं राऊत म्हणाले.
2. आमचं हिंदुत्व व्यापक-देवेंद्र फडणवीस
"आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही," असं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही," असं फडणवीस म्हणालेत.
"आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे," असंही फडणवीस पुढे म्हणाले.
3. रावणाच्या उद्गारावरून सैफ अली खानची माफी
रावणाबाबत काढलेल्या उद्गारावरून वादंग निर्माण झाल्याने अभिनेता सैफ अली खानने माफी मागितली आहे.
माझ्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. माझा तो उद्देश कधीच नव्हता. मी माझं बोलणं मागं घेतो. ज्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची मी माफी मागतो, असं सैफने म्हटलं आहे. 'आजतक'ने ही बातमी दिली आहे.
सीताहरणाच्या मुद्द्यावरून केलेल्या एका वक्तव्यानंतर सैफ अली खानला सोशल मीडियातून मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने म्हटलं आहे की, "आगामी आदिपुरुष या चित्रपटात मी रावणाची भूमिका साकारतोय. आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून रावणाचं एक दयाळू आणि मानवतावादी रुप प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापलं होतं. त्यांनंतर त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचं हरण केलं. रावणाच्या या भूमिकेला चित्रपटाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत."
भाजप नेते राम कदम यांनी हिंदूधर्मीयांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हटलं होतं. सोशल मीडियावरही सैफच्या उद्गारावरून अनेकांनी टीका केलेली पाहायला मिळाली. सैफने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
4. विजय मल्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त
उद्योगपती विजय मल्या यांची फ्रान्समधील 14 कोटींची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे. किंगफिशर एअरलाईन्ससाठी अफरातफर करून 10 हजार कोटींचं कर्ज घेऊन ते न फेडल्याचा मल्या यांच्यावर आरोप आहे.
हे कर्ज फेडण्याऐवजी मल्या यांनी भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
ईडीने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. विजय मल्या यांची पीएमएलए अक्टनुसार चौकशी सुरू होती. फ्रान्समधील तपास यंत्रणांच्या मदतीने ईडीने मल्या यांची मालमत्ता जप्त केली आहे.
25 जानेवारी 2016 रोजी किंगरफिशर एअरलाईन्स, मल्या आणि इतरांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
5. सोलापुरात वाहतूक पोलिसाला चिरडलं
सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकाला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडल्याची घटना घडली आहे.
या अपघातात पोलीस नाईक सागर औंदुंबर चौबे यांचा जागीचं मृत्यू झाला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आरोपी चालक नवनाथ शिवाजी गुट्टे हा औषधांचं साहित्य आयशर टेम्पोतून घेऊन हैदराबादहून मुंबईकडे जात होता. यावेळी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ पोलीस नाईक सागर चौबे यांनी टेम्पो चालकाला टेम्पो थांबवण्याचा इशारा केला.
मात्र, टेम्पो चालकाने वाहन थेट चौबे याच्या अंगावर घातले. यात चौबे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक नवनाथ शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी अटक केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)