You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्यांच्या पत्रावर पल्लवी आमटेंकडून स्पष्टीकरण
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सासरच्यांनी एक पत्रक जारी करून आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्याच्या उत्तरादाखल आमटे कुटुंबातील सदस्य पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी आमटे कुटुंबीयांची भूमिका जाहीर केली आहे.
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूने आमटे कुटुंबीयांवर मोठं अरिष्ट आल्याचं सांगून आमटे कुटुंबीय या धक्क्यातून हळूहळू सावरत असल्याचं त्यांनी सांगितलं. आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही, विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी सावरण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्यात.
"जे घडले ते फार दुर्देवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान होत्या. शीतल यांनी जे काही स्वप्नं बघितली होती आणि त्या स्वप्नांची पुढची दिशा जी काही होती, ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबध्द आहे," असं त्या म्हणाल्या.
आजवर समाजाने आनंदवनाला दिलेले सहकार्य यापुढेही कायम राहील याची आम्हाला आशा आहे. आमटे आणि करजगी परिवार सध्या दुखा:त आहेत.
करजगी कुटुंबीयांनी जाहीर एक पत्र लिहून जे प्रश्न आनंदवनावर उपस्थित केले आहेत त्यावर आता आनंदवनाचा निर्णय करण्याची ही वेळ नाही, असं पल्लवी आमटे म्हणाल्यात.
आमटे आणि करजगी कुटुंबीयांना या दुख:तून सावरण्यासाठी खूप वेळ जाईल, पण काळ अनेक प्रश्नांची उत्तरे देईल असंही त्या पुढे म्हणाल्या.
डॉ. शीतल यांच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत. त्या तपासातून सत्य पुढे येईलच पण आनंदवनाचं कधीही भरून न निघणारं नुकसान डॉ. शीतल यांच्या जाण्याने झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुहासिनी करजगी आणि शिरीष करजगी या शितल आमटेंच्या सासूसासऱ्यांनी एक खुलं पत्र लिहून आमटे कुटुंबीयांना जाब विचारला आहे. त्यात त्यांनी अनेक सवाल विचारले आहेत. तसंच कौस्तुभ आमटे यांच्याबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
"शितलला कसलाही मानसिक त्रास नाही आणि हा त्रास तिच्यावर जबरदस्ती लादला जातोय आणि तो पण तिच्या सख्या आई-वडीलांन कडून हे तीचे खंर दुर्भाग्य आहे," असा गंभीर आरोप करजगी दांपत्याने पत्रातून केला होता.
तपास कुठवर आलाय?
"पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालातून डॉ. शीतल यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या तपासावरून डॉ. शीतल यांनी आत्महत्या केली असावी अशी वस्तुस्थिती दिसते. पण न्यायसहाय्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावरच या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली जाईल," अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बीबीसी मराठीला दिली आहे.
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूप्रकरणात चंद्रपूर पोलिसांचा तपास सुरू आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधासह न वापरलेली इंजेक्शन्स आणि काही गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
डॉ. शीतल यांच्या व्हिसेरातील नमुने आणि जप्त केलेल्या गोळ्या आणि औषधातील नमुन्यांचा तपास सुरू आहे. नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत.
डॉ. शीतल यांनी आत्महत्या केली असावी या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला आहे. पण न्यायसहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच चित्र आणखी स्पष्ट होईल.
पोलिसांनी गौतम करजगी, सासू सुहासनी करजगी आणि सासरे शिरीश करजगी यांचे जबाब नोंदविले आहे. यासोबतच डॉ. शीतल यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांची चौकशी करून त्याचेही जबाब नोंदविण्यात आले आहे.
डॉ. शीतल यांनी मृत्यूपुर्वी कोणतीही चिठ्ठी किंवा संदेश लिहून ठेवलेला नाही. जर डॉ. शीतल यांनी आत्महत्या केली असेल तर आत्महत्येच्या मागच्या कारणाची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली असती. त्यामुळे डॉ. शीतल आमटे यांचा मोबाईल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये असा काही संदेश आहे का, याचा पोलीस तपास करताहेत.
डॉ. शीतल यांनी काही दिवसांअगोदरच फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपचे पासवर्ड बदलले होते. हे पासवर्ड क्रॅक करून त्यातील डेटा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जप्त केलेली सर्व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स मुंबईला सायबर सेलकडे पाठविण्यात आली आहेत. जर मुंबईत ही उपकरणं उघडली नाहीत तर ते हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवली जातील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)