कोरोनाचा उद्धव ठाकरेंनी एवढा अभ्यास केला की, ते अर्धे डॉक्टर झालेत : अजित पवार, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कोरोनाचा मुख्यमंत्र्यांनी एवढा अभ्यास केला की, ते अर्धे डॉक्टर झालेत : अजित पवार

"कोरोनावर काम करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एवढा अभ्यास झाला आहे की, ते अर्धे डॉक्टर झाले आहे," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

आम्हाला सर्वांना कोरोना झाला. पण यांच्या अभ्यासामुळे कोरोना या दोघांना भिऊन आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राज्यभर राबवली आहे. या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्षे जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे."

2. मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण विजयी

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं.

सतीश चव्हाण यांना एकूण 1,16,638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58,743 मते मिळाली.

3. पुण्यात 'सेक्स टॉईज'चा बाजार

महाराष्ट्रात पुणे, मुंबई या शहरांमध्ये सेक्स टॉईज वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यामध्ये 65 टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष सेक्स टॉयज खरेदी करत आहेत. तर महिलांमध्येही याचं प्रमाण लक्षणीय आहे. वर्षाला कोट्यवधींचा बाजार होत असल्याचं समोर आलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

यामध्ये सेक्स डॉल, तेल, औषधं यांचा समावेश आहे. चीनमधून या वस्तू आयात केल्या जात आहेत आणि दिल्ली, उत्तर भारतातून हा माल ग्राहकांना पुरवला जात आहे.

मुंबई, पुणे, बंगळुरू अशा मोठ्या शहरांमध्ये याची विक्री होताना दिसते आहे. कुरिअरमार्फत माल घरपोच दिला जातो आहे.

4. विदर्भात बोंडअळीमुळे कापूस उत्पादनाला फटका

विदर्भ, मराठवाडय़ातील कापूस उत्पादक क्षेत्राला पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा फटका बसला आहे. कापूस क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून बोंडअळीमुळे या वर्षी कापूस उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

सिंचनाची सुविधा असलेल्या भागात बाधित कपाशी उपटून रब्बी हंगामील पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य शासनाने मदत करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

प्रामुख्याने पश्चित विदर्भात कापसाचे उत्पादन घेतलं जातं. पश्चिम विदर्भात 10 लाख हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र होते.

5. कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

कंगना तिच्या ट्विटर अकाऊंटवरून वारंवार तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सदर याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं आहे.

"मी रोज अखंड भारताबद्दल बोलत आहे. रोज मी तुकडे-तुकडे टोळीशी लढत आहे. तरीही माझ्यावरच देशाचं विभाजन केल्याचा आरोप होत आहे. व्वा! तरीही, माझ्यासाठी ट्विटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही. एका इशाऱ्यात हजारो कॅमेरे माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतील हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.

"माझा आवाज दाबण्यासाठी तुम्हाला मला मारावं लागेल. पण त्यानंतर मी प्रत्येक भारतीयांच्या माध्यमातून बोलेन आणि हेच माझं स्वप्न आहे. तुम्ही काहीही केलं तरी माझं स्वप्न आणि ध्येय साकार होईल. म्हणूनच मला खलनायक आवडतात," असं कंगनानं ट्वीट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)