You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, तीन महिन्यांत मराठा आरक्षण मिळवून देऊ'- नितेश राणे #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, तीन महिन्यात मराठा आरक्षण मिळवून देऊ- नितेश राणे - नितेश राणे
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा आणि तीन महिन्यात मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. टिव्ही 9 मराठीने हे वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. पण अद्याप यासंदर्भात कोणताही अंतिम निकाल आलेला नाही.
इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. पण या सरकारची इच्छाशक्ती नाही असा आरोपही नितेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
भाजपचे खासदार उदयनराजे यांनीही नुकतीच मराठा आक्षणावरून सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षण टिकले होते असंही उदयनराजे म्हणाले होते.
2. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि कोरोना आला हा त्यांचा पायगुण - नारायण राणे
महाविकास आघाडीचे सरकार आले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये असे असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. असं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
"ठाकरे सरकार कामात शून्य आहे," अशी टीका करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आणि कोरोना आला हा त्यांचा पायगुण आहे," असंही राणे म्हणाले आहेत.
कोरोना आरोग्य संकट हाताळण्यात सरकारला अपयश आले असून एकट्या महाराष्ट्रात कोरोनामुळे 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल आहे अशी टीकाही नारायण राणे यांनी केली. तसेच कोरोनाच्या नावाखाली सरकारने तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.
राणेंनी पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. खून करून आत्महत्या दाखवल्या जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा नारायण राणेंनी केला आहे. तसेच असे आरोप केल्यानंतर खोट्या केसेस दाखल करून सुडाचे राजकारण केले जात असल्याचंही राणेंचे म्हणणे आहे.
3. शिक्षण-कला-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका - नवाब मलिक
दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून ऑनलाईन अजान पठणचे आयोजन करण्यात आल्याने भाजपकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. दिव्य मराठीने हे वृत्त दिले आहे.
गीता पठण स्पर्धेत मुस्लीम मुलगी अव्वल येते. त्यामुळे कला, शिक्षण, अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपला दिले आहे.
"आम्ही भगवत गीता पठणाची स्पर्धा आयोजित करतो. त्याच धर्तीवर मुस्लीम समाजातील मुलांसाठी 'अजान' पठण स्पर्धा आयोजित करावी अशी सूचना मी मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना केली. मुस्लिम मुलांना प्रोत्साहन मिळावं हा यामागचा हेतू आहे," असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते पांडुरंग सपकाळ यांनी दिले.
तर "शिवसेना नेत्याचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेचं सत्तेनंतर बदललेलं स्वरूप आहे. सत्तेच्या नादात हिंदुत्वाच्या भूमिकेत सरमिसळ झाली" असं म्हणत भाजप आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली.
4. राज्य सरकारला केंद्राकडून निधीची गरज असल्यास भाजपला सत्ता द्या - प्रीतम मुंडे
भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. राज्य सरकारला प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडून मदत निधी हवा असल्यास केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपला सत्ता द्या असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे.
महाविकास आघाडी सराकरची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापूर्ती आहे अशीही टीका त्यांनी केली. त्या जालना येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा विषय असो वा कोव्हिड आरोग्य संकट राज्य सरकार दोन्ही बाबतीत अपयशी ठरले आहे असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या. पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याठिकाणी महिलांची सुरक्षेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, या पत्रकार परिषदेला भाजपचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित असताना आमदार बबनराव लोणीकर मात्र अनुपस्थित होते.
5. नावासमोर देशभक्त लिहिल्याने कुणी देशभक्त होत नाही - कपिल शर्मा
आपल्या नावासमोर देशभक्त लिहून कुणी देशभक्त होत नाही या शब्दात कॉमेडियन कपिल शर्मा यांनी एका ट्रोलरला सोशल मीडियावर सुनावले आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकाविरोधात गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट कॉमेडियन कपिल शर्मा यांनी केले.
"शेतकऱ्यांचा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे. त्याचे राजकारण होता कामा नये. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. ते आपले अन्नदाता आहेत." असे ट्विट कपिल शर्मा यांनी केले.
या ट्विटला रिप्लाय करत जिगर मेवात नावाच्या एका युजरने म्हटलं, "चुप चाप कॉमेडी कर. राजकारण करण्याचा प्रयत्न करू नको. जे तुझे काम आहे ते कर," या ट्वीटला कपिल शर्मानेही प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, "देशभक्त लिहिल्याने कुणी देशभक्त होत नाही. 50 रुपयांचे रिचार्ज करून ज्ञान पाजळू नको. काम करा आणि देशाच्या विकासात हातभार लावा. धन्यवाद"
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून जंतर मंतर येथे आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)