You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सीरम'चा दावा : चेन्नईमधल्या स्वयंसेवकाबद्दल जे घडलं त्याचा चाचणीशी संबंध नाही
- Author, मयूरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
'कोव्हिशिल्ड' लस ही सुरक्षित आहे. चेन्नईमधल्या स्वयंसेवकाबाबत जे घडलं त्याचं कारण ही लस नसल्याचं सीरम इन्स्टिट्यूटनं स्पष्ट केलं आहे.
या लशीसंबंधी नियामकांद्वारे आखून दिलेली सर्व प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन झालं आहे. डीएसएमबी अँड एथिक्स कमिटीच्या मुख्य निरीक्षकांनी चेन्नईतल्या घटनेचा व्हॅक्सिन ट्रायलशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचंही सीरम इन्स्टिट्यूटनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचंही सीरमनं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट' उत्पादित करत असलेल्या आणि 'ऑक्सफर्ड विद्यापीठ' आणि 'एस्ट्राझेनेका' यांनी संशोधन केलेल्या या लशीच्या गंभीर परिणामांबाबत चेन्नईस्थित एका स्वयंसेवकानं दावे आणि आरोपही केले होते.
या लशीच्या भारताच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये लस टोचून घेतल्यानंतर आपल्याला मेंदूचा गंभीर आजार झाल्याचं या व्यक्तीचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्यानं 5 कोटी रुपये भरपाईची मागणीही केली होती, तर 'सीरम इन्स्टिट्यूट'नं हे दावे फेटाळून लावत या आरोपांबद्दल 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं.
चेन्नईमध्ये उद्योग सल्लागार म्हणून स्वतंत्र काम करणाऱ्या या 40 वर्षीय पुरुष स्वयंसेवकानं त्यांच्या वकिलांमार्फत नोटीस जारी केली होती.
'आयसीएएमआर' चे संचालक, 'सीरम इन्स्टिट्यूट ओफ इंडिया' चे सीईओ, देशाचे औषध महानियंत्रक म्हणजे 'डिसीजिआय', 'एस्ट्राझेनेका' चे सीईओ, 'ऑक्सफर्ड विद्यापीठा'चे या लशीचे मुख्य तपास नियंत्रक आणि चेन्नईच्या 'श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन' या संस्थेच्या कुलगुरुंना त्यांनी एन जी आर प्रसाद आणि आर राजाराम या आपल्या वकिलांमार्फत ही नोटीस पाठवली गेली.
'कोव्हिशिल्ड' या लशीची तिसऱ्या टप्प्यातले युरोप आणि अमेरिकेतल्या हजारो स्वयंसेवकांवर झालेल्या चाचण्यांचे निकाल उत्साहवर्धक असल्याचं 'ऑक्सफर्ड'नं नुकतंच जाहीर केलं होतं.
'सीरम' तर्फे भारतातल्याही 1500 स्वयंसेवकांवर या तिसऱ्या टप्प्यात चाचण्या केल्या जात होत्या. जारी केलेल्या नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, त्या टप्प्यादरम्यानच 1 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये 'श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन' जिथं या चाचण्यांचं आयोजन केलं होतं त्यात या व्यक्तीनं ही लस टोचून घेतली.
ती 'प्लासिबो' नव्हती कारण त्यानंतर करण्यात आलेल्या 'अँटिबॉडी टेस्ट'मध्ये या व्यक्तीच्या शरीरात लसीमुळे निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचं निदान करण्यात आलं होतं. या स्वयंसेवकाला पहिले 10 दिवस काहीही परिणाम जाणवले नाहीत, पण 11 ऑक्टोबरपासून त्यांना प्रचंड डोकेदुखी सुरु झाली, अशक्तपणा आला. त्यांना 'श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. जिथं ते 26 ऑक्टोबरपर्यंत दाखल होते.
या नोटिशीत स्वयंसेवकाने केलेल्या दाव्याप्रमाणे या 'कोव्हिशिल्ड' लशीमुळे त्याच्या मेंदूच्या कार्यात गंभीर बिघाड झाला आहे आणि त्याला अनेक मानसिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे.
लसीकरणापूर्वी जो प्रत्येक स्वयंसेवकाकडून फॉर्म भरुन घेतला होता आणि होऊ शकणाऱ्या ज्या परिणामांची कल्पना देण्यात आली होती, त्यात या स्वयंसेवकाला होत असलेले परिणाम सांगितले गेले नव्हते. आतापर्यंत केलेल्या चाचण्यामधून ही लस सुरक्षित आहे असं सांगितलं गेलं म्हणूनही आपण चाचण्यांसाठी पुढे आलो असंही म्हटल गेलं आहे.
या नोटिशीत त्यांनी असं म्हटलं आहे, "आमच्या अशीलाला रुग्णालयातल्या डिस्चार्ज समरीमध्ये नोंद केल्याप्रमाणे 'एक्यूट एन्सेफैलोपथी' म्हणजे मेंदूच्या आजारानं ग्रासलं आहे. 16 दिवसांच्या कालावधीत हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्या अनेक मेडिकल टेस्ट केल्या गेल्या आणि त्यांच्या आत्ताचे परिणाम हे लसीकरणापूर्वीच्या कोणत्या तरी शारीरिक कारणाशी जुळवण्याचे प्रयत्न झाले. पण त्या सगळ्या टेस्ट्स निगेटिव्ह आल्या आणि सध्या दुष्परिणाम हे लशीमुळंच झाल्याचं समोर आलं आहे."
मेंदूच्या या व्याधीमुळे त्यांच्या आकलन शक्तीवर परिणाम झाला असून नेहमीची साधी कामंही आता करण्यात अडथळा येत असल्याचा या नोटिशीत दावा करण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर या स्वयंसेवकाकडे 'सीरम' वा 'आयसीएमआर' वा 'डिसीजीआय' यांच्यापैकी कोणीही पाठपुरावा केल्या नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला 'कोव्हिशिल्ड' लशीची भारतासाठी मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणाऱ्या 'सीरम इन्स्टिट्यूट'नं हे दावे खोटे आणि चुकीच्या भावनेतून केले असल्याचा प्रतिआरोप केला आहे.
'सीरम'ने जारी केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, "या स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल 'सीरम इन्स्टिट्यूट'ला सहानुभूती आहे, मात्र त्यांच्या या वैद्यकीय स्थितीचा आणि लशीच्या चाचण्यांचा काहीही संबंध नाही आहे.
ही व्यक्ती चुकीच्या पद्धतीनं या आजारांचा संबंध लशीच्या चाचणीशी जोडू पाहते आहे. त्यांनी केलेले दावे हे दुर्भावनेतून केलेले आहेत कारण त्यांना वैद्यकीय तज्ञांच्या टीमनं स्पष्टपणे सांगितलं होतं की वैद्यकीय गुंतागुंत त्यांच्या बाबतीत निर्माण झाली तिचा लशीशी काहीही संबंध नाही आहे. त्याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना देऊनही त्यांनी जाहीररित्या संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न केले.
एका विशिष्ट हेतूनं ही खोटी माहिती पसरवण्याची इच्छा आहे हे स्पष्ट आहे. 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या नोटिशीचा प्रतिवाद करेल आणि नुकसानभरपाईसाठी 100 कोटी रुपयांचा दावा करेल."
अर्थात 'कोव्हिशिल्ड' लशीच्या चाचण्यांदरम्यान अशा प्रकारचा ब्रेक लागण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याअगोदर सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये एका स्वयंसेवकाला मज्जारज्जूशी संबंधित आजाराची लक्षणं ही लस घेतल्यावर जाणवली होती. त्यानंतर लगेचच 'ऑक्सफर्ड विद्यापीठ' आणि 'एस्ट्राझेनेका' यांनी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती दिली होती.
एका स्वतंत्र वैद्यकीय तज्ञांच्या समितीनं या स्वयंसेवकाची पूर्ण पाहणी करुन काही दिवसांनी त्या आजाराचा आणि लशीचा परिणाम नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर मग तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या परत सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही चेन्नईची घटना समोर येते आहे. त्यासंदर्भात सत्यशोधन करण्यासाठी आणि शंकानिरसन करण्यासाठी औषध महानियंत्रक काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.
इतर कोणत्याही लशींच्या तुलनेत 'कोव्हिशिल्ड' लस भारतात सर्वप्रथम उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यात 'सीरम'ला भेट देऊन या लशीच्या उत्पादनाची तयारी कशी सुरु आहे याची पाहणीही केली होती.
त्या भेटीनंतर 'सीरम'चे सीईओ आदर पूनावाला यांनी येत्या दोन आठवड्यांमध्ये 'कोव्हिशिल्ड'च्या तातडीच्या वापराच्या परवान्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करणार असल्याचंही म्हटलं होतं. पण आता या चेन्नईच्या स्वयंसेवकाच्या दाव्यानंतर या लशीसमोर अजून एक अडथळा आल्याचं दिसतं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)