अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल का होतात?

फोटो स्रोत, Facebook
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटिझन्सच्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत.
मुलींना 'जगू द्या…शिकू द्या…" अशा आशयाचं मिसेस फडणवीस यांनी गायलेलं गाणं टी-सिरीजने नुकतच सोशल मीडियावर प्रदर्शित केलं.
मात्र, या गाण्यामुळे अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. अमृता फडणवीस यांना नेटिझन्यकडून ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी राजकारणाबद्दलची वक्तव्य, बोटीवरून प्रवासात सुरक्षेचा विचार न करता काठावर बसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
'जगू द्या…शिकू द्या…"
14 नोव्हेंबरला अमृता फडणवीस यांनी गायलेलं 'जगू द्या…शिकू द्या…" हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कंपनी 'टी-सिरिज'ने बनवलेलं गाणं यू-ट्यूबवर रिलिझ करण्यात आलं. या गाण्याला आत्तापर्यंत 12 लाखापेक्षा जास्त लोकांनी यू-ट्यूबवर पाहिलं आहे. मात्र, यू-ट्यूबवर तब्बल 13 हजार लोकांनी याला 'डिसलाईक' केलं, तर लाईक करणाऱ्यांची संख्या फक्त 1300 एवढीच आहे.
अमृता फडणवीस यांचं गाणं रिलिज झाल्यानंतर सोशल मीडियात त्यांच्या गाण्यावर टीका करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पडला. यू-ट्यूबवर हजारोंच्या संख्येने लोकांनी आपलं मत व्यक्त केलं.
गाण्यावरून ट्रोल झाल्या अमृता फडणवीस
"आवाज खुपच मस्त आहे मॅडम चा पण हेडफोन खराब असल्याने खरा आवाज कळत नाहीये नीट !!" अशी कमेंट सागर लोखंडे यांनी केली.
राहुल कोळी यांनी, "अरे कुठे नेऊन ठेवलाय कान माझा..कान रक्तरंजित करण्यासाठी पुरेसे आहे गाणे.." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
अमृता फडणवीस जरी त्यांच्या गाण्यावरून ट्रोल झाल्या असल्या तरी, तुम्ही लोकांचं मनावर घेऊ नका अशी प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे. भीमाशंकर मुक्कानवार यांनी, "गाणं खूप छान आहे. ज्यांना तुमचं गाण आवडत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमची आवड जपा. निराश होऊ नका." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणतात महेश टिळेकर?
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीदेखील नाव न घेता अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली.
अनेक लोकांचे चांगले आवाज असून त्यांना संधी मिळत नाही असं म्हणत टिळेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"चांगला आवाज असून नाव नाही. हातात पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कोणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. पण, जिचा आवाज ऐकल्याने कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते. अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?"

फोटो स्रोत, Facebook
महेश टिळेकर यांनी टी-सिरिजवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. "नेहमीच बिझनेसला प्राधान्य देणारी ही कंपनी का पैसा खर्च करत आहे? त्यामागे काय लागेबांधे आहेत? हे एक न सुटणारं कोडे आहे.'
अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्याचा प्रोमो ट्विटरवर शेअर केलाय.
गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले आहेत, "लोकांचा चांगला प्रतिसाद आणि टीका दोन्हीचे स्वागत," असं त्या म्हणाल्या. "लवकरच मी काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासमोर येईन," असं त्यांनी ट्विटरवर लिहीलं.
बोटीतून प्रवासात कडेला बसल्यावरून ट्रोल
21 ऑक्टोबर 2018 ला अमृता फडणवीस ट्रोल झाल्या होत्या. भारतातील पहिली 'अंग्रीया' नावाच्या क्रूजमधून प्रवासादरम्यान त्या बोटीच्या सुरक्षा रिंगच्या बाहेर जावून त्या कडेला बसल्या.

फोटो स्रोत, T-Series
पोलीस आणि सुरक्षारक्षक त्यांना समजावत असल्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. धोका पत्करून सेल्फी काढल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर, अमृता फडणवीस यांनी "कोणाला मी चूक केली असं वाटत असेल तर माफी मागते," असं वक्तव्य केलं होतं.
"मुंबई सुरक्षित नाही- अमृता फडणवीस"
याच वर्षी 3 ऑगस्ट 2020 ला अमृता फडणवीस त्यांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सच्या टीकेच्या धनी ठरल्या.
"ज्या परिस्थितीत सुशांत सिंह राजपूत प्रकरण हाताळलं जात आहे. मला वाटतं मुंबई माणूसकी विसरली आहे. या शहरात निष्पाप आणि स्वाभिमानी लोकांना रहाणं सुरक्षित नाही," असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं.
अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी "सुशांत मृत्यू प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका. मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरू नका." असं उत्तर दिलं होतं.
नरेंद्र मोदी 'फादर ऑफ द नेशन'
17 सप्टेंबर 2019 ला अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी त्यांना 'फादर ऑफ द नेशन' अशी उपमा देणारं ट्विट केलं होतं. त्यावरूनही सोशल मीडियावर त्या ट्रोल झाल्या होत्या.
नरेंद्र मोदी यांची तूलना महात्मा गांधी यांच्याशी केल्याबद्दल नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली होती.
काय म्हणतात महिला पत्रकार?
अमृता फडणवीस यांना नेटिझन्सकडून ट्रोल करण्यात आल्या प्रकरणी वरिष्ठ पत्रकार राही भिडे म्हणतात, "प्रत्येक व्यक्तीची एक आवड असते. आणि आपली आवड जपण्याचा त्याला अधिकार आहे. कोणाला अमृता फडणवीस यांचं गाणं ऐकायचं नसेल तर त्यांनी ऐकू नये. पहायचं नसेल तर पाहू नये. पण, फक्त कमेंट करण्यासाठी गाणं ऐकलं जातं का?"
"आक्षेपार्ह किंवा चुकीची गोष्ट कोणी बोललं तर आक्षेप घेणं योग्य आहे. पण, त्यांच्या गाण्यात चुकीचं किंवा आक्षेपार्ह असं काही नाही. एकीकडे महिला सक्षमीकरणाची भाषा करायची आणि दुसरीकडे खालच्या पातळीत महिलांवर टीका करायची. हे योग्य नाही." असं त्या पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, Twitter
मात्र, मुक्त पत्रकार नीता कोल्हटकर यांचं याबाबत वेगळं मत आहे.
नीता कोल्हटकर म्हणतात, "अमृता फडणवीस यांच्या गाण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण, त्यांनी त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा वापर, आपली आवड जपण्यासाठी करणं अयोग्य आहे. याआधी त्यांनी आपल्या गाण्यात राज्य सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा वापर केला होता. हे चुकीचं आहे."
पण, अमृता फडणवीसांना यांना ट्रोल का केलं जातं. याबाबत त्या म्हणतात, "प्रसिद्धी झोतात रहाण्यासाठी आणि लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी त्या अशी वक्तव्य करतात. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले. त्यामुळे या आधीदेखील अनेक मुद्यांवरून त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत ज्यामुळे त्या ट्रोल झाल्यात."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























