अमृता फडणवीस - मी पुन्हा येईन, नवीन गाणं घेऊन : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

1. मी पुन्हा येईन, नवीन गाणं घेऊन-अमृता फडणवीस

अमृता फडणवीस आणि त्यांचं गाणं पुन्हा एकदा चर्चेत आहे. महिलांवर आधारित 'तिला जगू द्या' या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन, असं अमृता यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

"आपलं गाणं प्रत्येक भाऊरायाला समर्पित होतं. भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत 'तिला जगू द्या" असं म्हणत त्यांनी त्यांचं नव्या गाण्याचा व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचं सांगत अमृता यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर देवेंद्र यांचं 'मी पुन्हा येईन' हे वाक्य चांगलंच गाजलं होतं. त्या धर्तीवर माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी तसाच पुनरुच्चार गाण्याच्या निमित्ताने केला आहे.

दरम्यान म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको अशी टीका दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी केली आहे.

महेश टिळेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडतात. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर निशाणा साधला आहे. "चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे," असं टिळेकरांनी म्हटलं आहे.

2. बाळासाहेबांबद्दल काँग्रेसकडून ट्वीट नाही

मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांचं स्मरण केलं. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे कुणीही आदरांजली वाहिली नसल्याने चर्चेला वाव मिळाला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे. मात्र त्यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. मात्र काँग्रेस नेते दूर राहिले.

अख्खा दिवस गेला तरी काँग्रेस नेतृत्वाकडून बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला एक मेसेज किंवा ट्वीट नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेबांनाही मान्य करत नसतील तर शिवसेनेकडे काय उरलं, असा सवाल नितेश यांनी केला आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

3. गुजरातला वाहून जाणारं नाशिकचं पाणी अडवणार-जयंत पाटील

नाशिक जिल्ह्यात पाऊस बऱ्यापैकी होतो. तो राज्यातल्या गिरणा किंवा तापी नदीत कसा आणता येईल याचा अभ्यास सुरू आहे. मराठवाड्यात हे पाणी कसं नेता येईल यावर विचार सुरू आहे. काही प्रकल्प सरकारने ठरवले आहेत, असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

स्थानिक आदिवासींच्या पाणीप्रश्नासाठी काय करता येईल यासाठी तापी खोरे, गोदावरी खोरे आणि कोकण खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करतो आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

4. मुंबईत समुद्रकिनारी, नदीकाठी छटपुजेवर बंदी

छठपूजेचा उत्सव यंदा 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.

जुहू किनारी दरवर्षी छठपूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. यंदा मात्र कोरोनामुळे मुंबई पालिकेने काही अटी घातल्या असून त्यात मुख्य अट म्हणजे समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

चौपाटी, नदीकाठ वा तलावांवर छठपूजेचे आयोजन केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळेच अशा ठिकाणी छठपूजेचे आयोजन करण्यास यंदा प्रतिबंध करण्यात येत आहे, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

गर्दी टाळून हे पर्व साजरे व्हावे म्हणून पालिका संबंधित संस्थांना परवानगी देईल. ही परवानगी विभागवार देण्यात येईल. परवानगी देताना जे नियम आणि अटी घालण्यात येतील त्यांचं पालन संबंधित संस्थांनी करावं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

5. मंत्रीपदाचा कारभार सांभाळत एकनाथ शिंदेंनी मिळवली पदवी

राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदांचा कारभार सांभाळत कला शाखेतून 77.25 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. 'सरकारनामा'ने ही बातमी दिली आहे.

मला ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ होती. गेले तीन वर्ष नियमित परीक्षा देऊन बीए पदवीधर झालो याचं समाधान आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे एम.एस (ऑर्थो) आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)