छेडछाडीनंतर तरुणीला जिवंत जाळलं, आरोपी फरार

प्रतीकात्मक फोटो
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

15 नोव्हेंबरला संध्याकाळपासूनच बिहारच्या दोन महिलांच्या घरी लोक जमायला सुरुवात झाली. लोकांसोबत स्थानिक मीडियाही दोन्ही घरात येत होता. पण दोन्ही घरात वेगवेगळ्या कारणासाठी गर्दी जमली होती. एका घरात आनंदोत्सव होता तर दुसऱ्या घरात शोक.

पहिली महिला आहे रेणू देवी. ज्या बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बेतिया या ठिकाणापासून जवळपास 190 किमी अंतरावर वैशाली या गावात अरमिदाचा (बदलेले नाव) मृतदेह अंगणात आणला आहे.

जळालेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनेचे एक जिवंत उदाहरण आहे.

अरमिदाने 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण ती अपयशी ठरली. 15 नोव्हेंबरला बिहारच्या पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

कोण आहे अरमिदा?

20 वर्षीय अरमिदाला 30 ऑक्टोबर रोजी जिवंत जाळण्यात आले. त्यादिवशी संध्याकाळी सधारण 5 वाजता अरमिदा कचरा बाहेर फेकण्यासाठी घराबाहेर पडली.

रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पीडिताने तक्रार नोंदवली. त्यानुसार गावातील सतीश राय, विजय राय, चंदन कुमार यांनी अरमिदाला पकडून गैरवर्तणूक करण्यास सुरुवात केली. याला अरमिदाने विरोध केला आणि घरी गेल्यावर आईला सांगेन असा इशाराही दिला.

अरमिदाने दिलेल्या जबाबीनुसार, यानंतर सतीश रायने केरोसीनचे तेल तिच्या शरीरावर टाकले आणि पेटवून दिले. अरमिदा जोरजोरात ओरडत असताना गावकरी जमा झाले.

अरमिदाची लहान बहीण सांगते, "गावकरी घटनास्थळी पोहचल्यानंतर तिघेही पळून गेले. गावातल्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरी आम्ही फक्त भावंडं होतो."

2017 साली अरमिदाच्या वडिलांचे निधन झाले. पाच बहिणी आणि चार भाऊ असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आई शैमुना खातून आणि भाऊ इस्तकार अहमद यांच्या मजुरीवर चालतो. इस्तकार अहमद पटणा येथे राहून कपडे विकतात तर शैमुना खातून दररोज वैशाली येथून पटणा शहरात जावून शिवणकाम करतात.

आंदोलन करताना

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

फोटो कॅप्शन, आंदोलन करताना

'प्रेम प्रस्तावाला नकार दिल्याने जाळले'

अरमिदाचा भाऊ इस्तकार अहमद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "साधारण सव्वा महिन्याआधीच अरमिदाचे लग्न ठरले होते. जानेवारी महिन्यात तिचे लग्न होते. लग्न ठरल्यानंतर सतीश राय तिला त्रास देत होता. त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. अरमिदाने कायम त्याला नकार दिला. तिला मारून टाकण्याच्या धमक्याही तो द्यायचा."

इस्तकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा त्यांची आई शैमुना खातून पाटणा येथे होत्या. फोनवरून त्यांनी पोलीस तक्रार करण्यास सांगितले. सतीश रायच्या एका नातेवाईकाने कुटुंबाला संपर्क करून पोलीस तक्रार न केल्यास अरमिदावर उपचार करू असं सांगत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांच्या दबावानंतर कुटुंबाने त्यांचे न ऐकता एका खासगी रुग्णालयात अरमिदावर उपचार सुरू केले. यानंतर 30 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता अरमिदाचा जबाब नोंदवला.

फेसबुक

फोटो स्रोत, Reuters

उपचारासाठी फेसबुकवर अभियान

आतापर्यंत अरमिदाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात सतीश आणि चंदन कुमार यांनी केरोसीन टाकून जाळलं असल्याची माहिती अरमिदाने दिली आहे.

अरमिदावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन फेसबुकवर करण्यात आले. किरण यादव नावाच्या महिलेने आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.

इस्तेकार अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "किरण यादव यांनी उपचारासाठी बारा लाख रुपये जमा केले. 7 नोव्हेंबरला त्यांनी अलमिदाला पाटणाच्या पीएमसीएचमध्ये दाखल केले. 15 नोव्हेंबरला सकाळी अरमिदाचे निधन झाले."

बीबीसीने किरण यादव यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल बंद होता. आर्थिक मदतीसाठी आवाहन करणारे अनेक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आहेत. काही व्हिडिओमध्ये अरमिदा बरी झाल्याचंही त्या सांगत आहेत.

15 नोव्हेंबरला अरमिदाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह पटणाच्या कारगील चौकात ठेवून आंदोलन केले.

सामाजिक कार्यकर्ता जीशान महबूब सांगतात, "सकाळी अरमिदाच्या आईचा फोन आला होता. मृत्यूनंतर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर आम्ही काही लोक एकत्र आलो आणि सरकारी प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर काही सामाजिक संघटनांनी आरोपींना पकडण्याची मागणी करत आंदोलन केले."

आंदोलन

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणातील तीन पैकी एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. वैशालीच्या डीएम उदिता सिंह यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला असताना त्यांनी पोलीस अधिक्षकांशी बोलण्यास सांगितले.

"आपण स्थानिक मीडियाला त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे," अशी प्रतक्रिया वैशालीचे पोलिस अधिक्षक मनीष यांनी दिली.

स्थानिक मीडियाला त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, "दोन तारखेला या प्रकरणात तक्रार नोंदवली. विशेष फोर्स तयार केला असून तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करू."

मात्र, 30 ऑक्टोबरला अरमिदाने जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस का लागले? हा प्रश्न कायम आहे.

याप्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसंच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. तसंच कुटुंबाला 20 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याचीही मागणी केली आहे.

अरमिदाचे मोठे भाऊ इस्तेकार अहमद यांची मागणी काय आहे? असे बीबीसीने विचारले असता त्यांनी सांगितले, "आमच्या बहिणीला जीवंत जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याहून कमी शिक्षा नको."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)