You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: जानेवारीत महाराष्ट्रात येणार कोव्हिड-19 ची दुसरी लाट?
महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात कोव्हिड-19 ची दुसरी लाट आली तर काय काळजी घ्यायची याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने महापालिका, जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत.
स्पेन, ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती.
आरोग्य विभागाच्या सूचना
कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा सक्षमपणे सुरू ठेवाव्यात. दर दिवशी 10 लाख लोकसंख्येमागे किमान 140 तपासण्या कराव्यात.
जिल्हा आणि पालिका क्षेत्रात चाचणी केंद्र सुरु करावीत. याची माहिती जनसामान्यांना द्यावी.
'फ्लू' असलेल्या रुग्णांचा शोध घ्यावा. फिवर क्लिनिकच्या माध्यमातून लोकांच सर्वेक्षण करावं.
सूपर स्पेडर म्हणजे अनेक लोकांशी दिवसात ज्यांचा संपर्क येतो त्यांची वैद्यकीय तपासणी करावी.
सर्वाधिक जनसंपर्क असलेले उदाहरणार्थ छोटे व्यापारी आणि व्यवसायिक, घरगुती सेवा पुरवणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, मजूर, सिक्युरिटी गार्ड, अत्यावश्यक सेवा पुरवणारे अशा व्यक्तीचं सर्वेक्षण आणि तपासणी महत्त्वाची आहे.
आरोग्य विभागाला सतर्क केव्हा करावं
लेव्हल-1 : पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर, पालिका आणि जिल्हा स्त्ररावर 5-7 रुग्णालयं कोव्हिड-19 साठी ठेवावीत
लेव्हल-2 : कोरोना संक्रमित रुग्णांची टक्केवारी 7-10 टक्क्यांमधे असेल तर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रत्येक शहर प्रभाग आणि तालुका स्त्ररावर एक रुग्णालय कोव्हिड-19 साठी राखीव
लेव्हल-3 : तपासणीतील 11-15 टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यास, आणखी 20 टक्के रुग्णालयं कोव्हिडसाठी
लेव्हल-4 : 16-20 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह असतील तर, मल्टिस्पेशालिटी सुविधा असणारी सर्व रुग्णालयं कोव्हिडसाठी
औषध आणि ऑक्सिजनची उपलब्धता
ज्या क्षेत्रात संसर्ग जास्त होता त्या ठिकाणी किमान 50 टक्के औषध उपलब्ध असावीत. ऑक्सिजनच योग्य नियंत्रण करावं. ऑक्सिजन अपुरा पडणार नाही यावर लक्ष ठेवावं.
गंभीर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्यावी.
रुग्णवाहिका सुसज्ज असाव्यात. लोकांना याबाबत माहिती देणं गरजेचं. गंभीर रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्णालयं सुसज्ज असावेत.
कोमॉर्बिड क्लिनिक
60 वर्षांवरील वक्तींना लोकांशी संपर्क शक्यतो कमी ठेवावा. मधूमेह, उच्चरक्तदाबाने ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन आवश्यक. या रुग्णांसाठी कोमॉर्बिड क्लिनिक सुरू करावं.
दिवाळीनंतर वाढणार रुग्णांची संख्या?
महाराष्ट्रात जवळपास सर्वच अनलॉक झालं आहे. त्यामुळे कामासाठी दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोकं घराबाहेर पडले आहेत. यामुळे येत्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी भीती राज्य सरकारला वाटतेय. सरकारप्रमाणे डॉक्टरांनाही याचीच चिंता सतावते आहे.
याबाबत बोलताना नागपूरच्या स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. लिना काळमेघ म्हणतात, "लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. यामुळे डॉक्टरांना थोडी काळजी वाटू लागली आहे. मास्क कोरोना संसर्गापासून बचावाचा एक प्रभावी उपाय आहे. पण, मास्क आहे 100 टक्के सुरक्षा असं नाही. कारण आपण योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि हात वारंवार धूणं याकडे लक्ष दिलं पाहिजे."
काय करतंय राज्य सरकार?
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने काही दिवसापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्कफोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली.
याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले, "थंडीमध्ये फ्लूसारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खासगी डॉक्टारांनी तापांच्या रुग्णांच्या लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधन्य देण्याच समितीने सुचवलं आहे. त्यानुसार राज्यभरात फिवर क्लिनिक सर्वेक्षण वाढवण्यात येणार आहे."
"ज्या व्यक्तींचा जनसंपर्क सर्वाधित असतो उदाहरणार्थ दुकानदार, दूध विक्रेते, घरगुती सेवा पुरवणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, मजूर, सिक्युरिटी गार्ड, अत्यावश्यक सेवा पुरवणारे अशा व्यक्तीचं सर्वेक्षण आणि चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.
राज्यातील परिस्थिती
मुंबईत 9 नोव्हेंबरला 599, तर 10 नोव्हेंबरला मुंबईत 535 कोरोनाग्रस्त आढळून आले होते. मात्र, 11 नोव्हेंबरला ही संख्या दुपटीने वाढून 1069 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली.
राज्यभरात (मुंबई वगळता) 9 नोव्हेंबरला 4907, तर 10 नोव्हेंबरला मुंबईत 3791 कोरोनाग्रस्त आढळून आले होते.
मात्र, 9 नोव्हेंबरला 3277, 8 नोव्हेंबरला 5092 तर 7 नोव्बेंबरला 3959 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)