You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना अनलॉक : महाराष्ट्रातील शाळांना आता 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. महाराष्ट्रातील शाळांना आता 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी
दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
शनिवारपासून (07 नोव्हेंबर) ऑनलाइन शिक्षणासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे.
याआधी पाचच दिवसांची सुट्टी दिल्यानं शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय नववी आणि बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
2. खासगी प्रवासी वाहतूक 100 टक्के क्षमतेने चालवण्यास संमती
महाराष्ट्रात खासगी बसमधून 100 टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय झाला आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
हा निर्णय होताच परिवहन आयुक्तालयाने बससाठी मानक कार्यपद्धतीही जाहीर केली आहे.
त्यानुसार वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणं बंधनकारक आहे. प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरीनंतर प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे.
बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी, कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर वापरणं आवश्यक, असे नियम घालून देण्यात आले आहेत.
3. भाजपनं काश्मिरी पंडितांचा व्होट बँक म्हणून वापर केला - फारूख अब्दुल्ला
भाजपनं काश्मिरी पंडितांचा वापर व्होट बँकेसाठी केला आणि अद्यापही काश्मिरी पंडित खोऱ्यातील पुर्नवसनाच्या प्रतीक्षेत आहेत, असं वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये खरा विकास तेव्हाच होईल, जेव्हा इथं लोकांचं सरकार असेल, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
28 वर्षांपासून ते म्हणत आहेत की काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन करू, पण आता 5 वर्षांहून अधिक काळापासून ते सत्तेत आहेत. पण अजून काश्मिरी पंडित प्रतीक्षेत आहेत, असं अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
4. सरकार सामाजिक बदल घडवू शकत नाही - मोहन भागवत
सामाजिक बदल सरकार घडवू शकत नाही, त्यासाठी सामाजिक नेत्यांची गरज असते, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. फ्री प्रेस जर्नलनं ही बातमी दिली आहे.
ते संघाच्या भोपाळमधील कार्यक्रमात बोलत होते.
त्यांनी म्हटलं, "आपण सगळ्यांनी मिळून समाजाची ताकद ही सामाजिक एकता, पर्यावरणाचं संवर्धन यासाठी वापरली पाहिजे. सामाजिक नेते निर्माण करून त्यांनी कौटुंबिक प्रश्न सोडवायला हवेत. कारण समाज बदलणं हे सरकारला शक्य नाही. हे काम फक्त सामाजिक नेतृत्वच करू शकते."
5. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपतल्या एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे
फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळलं.
"मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की, उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)