You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील : 'मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा काय पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा काय पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा' - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतल्यास गैर काय? या संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चालवतात हे संजय राऊत यांनी अखेर मान्य केले असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपवर टीका करणे हेच संजय राऊत यांना देण्यात आलेले काम आहे. या कामामुळेच त्यांचे पद टिकून आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले.
शरद पवार यांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
2. 'लव्ह जिहादच्या गुन्हेगारांनी 'राम नाम सत्य है' यात्रेसाठी तयार रहावं' - योगी आदित्यनाथ
'लव्ह जिहाद'च्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांनी 'राम नाम सत्य है'च्या यात्रेसाठी तयार रहावे या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत चालली असल्याचं योगी सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) अलाहबाद उच्च न्यायालयाने लग्नासाठी धर्मपरिवर्तन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद रोखण्यासाठी कडक कायदा केला जाईल अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
मुलींची फसवणूक करणाऱ्या अशा गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
3. 'शेजारील देशाने पुलमावा हल्ल्याचे सत्य स्वीकारले' - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
काही लोक दहशवादाचेही जाहीर समर्थन करतात ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.
पुलवामा हल्ल्या प्रकरणातले सत्य शेजारील देशाने स्वीकारले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
ते म्हणाले, "या हल्ल्यात वीर जवान शहीद झालेले असताना काही लोक या दु:खात सहभागी झाले नव्हते हे देश विसरणार नाही. त्यावेळी अनेक आरोप करण्यात आले. काहींनी अशा हल्ल्याचे राजकारण केले."
शेजारील देशाच्या संसदेने सत्य स्वीकारले असल्याने काही लोकांचा खरा चेहरा समोर आला अशीही टीका भाजपकडून करण्यात आली.
4. 'देव जरी मुख्यमंत्री बनले तरी...' गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य चर्चेत
देव जरी मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना सरकारी नोकरी देणं शक्य नाही, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होतेय. सकाळने हे वृत्त दिले आहे.
गोव्यात एका कार्यक्रमात पंचायत प्रतिनिधींशी ते चर्चा करत होते. गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 'स्वयंपूर्ण मित्र' या अभियानाअंतर्गत सरकारकडून रोजगाराचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
सरकारी नोकरी देणं देवाच्याही हातात नाही या प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याने उपस्थित असलेल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
5. आमदार गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्याकडून शिवीगाळ?
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ केल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. एवढेच नाही तर या व्यक्तिने भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड फेकण्याचा प्रयत्न केला. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
संबंधित व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावाही करण्यात येत आहे. भाजपकडून मात्र संबंधित इसम आपला कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगाव येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)