कोरोनाः साथीचा रोग पसरला असताना बिहारमध्ये हजारोंच्या भरगच्च सभा

तेजस्वी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विकास पांडेय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोनाच्या काळात पाळायचे निर्बंध सध्या बिहारमध्ये मात्र पाळले जात नसल्याचं दिसून येत आहे. 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. त्यासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत आणि त्यात लोकांची भरपूर गर्दी होत आहे.

सर्व पक्षांच्या या सभांमध्ये लोक आपल्या नेत्याला पाहाण्यासाठी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती वाटावी अशी गर्दी करत असल्याचं व्हीडिओतून दिसतं.

या सभांमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी मास्कही वापरले नसल्याचं दिसतं. यामुळे भयानक दुष्परिणाम भोगावे लागतील असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं असून कोरोना व्हायरस अधिक वेगाने लोकांमध्ये पसरेल अशी भीती ते व्यक्त करत आहेत.

निवडणूक आयोगानं कोव्हिड-19 संदर्भात केलेल्या नियम तोडणाऱ्या नेत्यांना नियमांची जाणीव करून दिली आहे. मात्र त्याचा काहीच परिणाम प्रचारसभांवर होत नसल्याचं दिसत आहे. कारण प्रचारसभांमध्ये गर्दी वाढतच आहे.

कोरोना सुरक्षा नियमांचं उल्लंघन

व्हायरॉलॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांच्या मते राजकीय पक्षांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही जागरुक केलं पाहिजे.

ते म्हणाले, "या प्रचारसभांमध्ये हजारो लोक सामिल होत असल्याचं दिसतं. त्यातले फारच कमी लोक मास्क वापरत असल्याचं दिसतं. राजकीय पक्षांनी प्रचारसभेत येणाऱ्या लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितलं पाहिजे."

बिहारमध्ये भाजपा आणि जदयुची आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांची आघाडीही प्रयत्नशील आहे. तसेच अनेक प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याही प्रचारसभा होत आहेत.

प्रचारामध्ये कोरोनावर कोणीही बोलत नसल्याचं मत बिहारमधील एक पत्रकार व्यक्त करतात.

ते म्हणाले, "राज्यामधून कोरोना एकदम गायब झाल्यासारखं वाटत आहे. लोकांनी जीवाची पर्वा करणं सोडून दिलं आहे आणि त्यांना त्याची जाणीव करुन देण्यासाठी नेते पुरेशी पावलं उचलताना दिसत नाही."

दररोज दीड लाख चाचण्या होत असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

पण तज्ज्ञांना हे पटलेलं नाही. 30 मिनिटात अहवाल देणाऱ्या रॅपिड अँटिजेन चाचणीबद्दल सरकार बोलत आहे असं ते सांगतात. या चाचणीचा सत्यता दर केवळ 30 टक्के इतकाच आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राज्यात दररोज दोन लाख लोकांची चाचणी होत असल्याचं सांगितलं होतं. पण त्यात आरटी-पीसीआरच्या 11,732 चाचण्या होत्या.

तज्ज्ञांच्या मते ही स्थिती जोखमीची कारणं रॅपिड अँटिजनमुळे चुकीचे अहवाल येण्याची शक्यचा असते. संसर्ग झालेला असूनही लोक इकडे तिकडे जाऊन विषाणू पसरू शकतो.

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. ए. फतहउद्दिन म्हणतात, "बिहारमध्ये असा नियमभंग परवडणारा नाही. त्यामुळे समस्या वाढतील. राज्यातील आरोग्य व्यवस्था आधीच डळमळीत आहे. डॉक्चर, प्रशिक्षित पॅरामेडिक्स आणि परिचारिका कमी आहेत."

ते सांगतात, "बिहारमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोक एकत्र कुटुंबात राहातात. या प्रचारसभांमध्ये जाणारे लोक घरी गेल्यावर संसर्ग पसरवू शकतात."

कोरोनाः साथीचा रोग पसरला असताना बिहारमध्ये हजारोंच्या भरगच्च सभा

फोटो स्रोत, Getty Images

सणासुदीच्या काळाचा आणि हवामानाचाही कोरोना पसरण्यात संबंध असू शकतो. नोव्हेंबरनंतर थंडी पडू लागल्यावर उत्तर भारतात हवा जास्त प्रदुषित असते. प्रदूषणामुळे कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ होते असं अभ्यासातून दिसून आलं आहे.

डॉ. शाहीद जमील सांगतात, "प्रचारसभांचे असे फोटो, थंडीचे दिवस आणि येणारा सणासुदीचा काळ पाहून मी घाबरुन जातो. जर पुढील आठवड्यांत काळजी घेतली नाही तर काय भयंकर परिस्थिती तयार होईल याच्या विचारानेच भीती वाटते."

डॉ. फतहउद्दिन म्हणतात, "तरुणांमध्ये कोरोनाचा फारसा परिणाम होत नाही असा समज पसरत आहे. पण तरुणांना या विषाणूमुळे गंभीर आजारपण येत नाही अशी आपण खात्री देऊ शकत नाही."

ही गर्दी देशातल्या इतर प्रदेशातल्या लोकांनी पाहिली तर विषाणू आता पसरत नाही असं त्यांना वाटू शकतं आणि त्याचा धोका मोठा असेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)