IPL 2020: नितीश राणाने आपली दिमाखदार खेळी सासऱ्यांना समर्पित केली

नितीश राणा, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, Kolkata Knight Riders

फोटो कॅप्शन, नितीश राणा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

नितीश राणाने वैयक्तिक दु:ख कर्तव्याआड येऊ न देता शानदार खेळी साकारली.

जवळचा माणूस गमावणं म्हणजे आधारवड गमावणं. खेळाडूंच्या कारकीर्दीत चढउतार खूप असतात. अशावेळी घरच्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. कोलकाता नाईट रायडर्सतर्फे खेळणाऱ्या नितीश राणाच्या सासऱ्यांचं शुक्रवारी (23 ऑक्टोबर) निधन झालं. नितीशने हा धक्का सहन करत शनिवारी (24 ऑक्टोबर) झालेल्या मॅचमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.

कॅन्सरने आजारी असलेल्या नितीशच्या सासऱ्यांचं शुक्रवारी (23 ऑक्टोबर) निधन झालं. मात्र या आघाताने खचून न जाता नितीशने खेळण्याचा निर्णय घेतला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कोलकाताने राहुल त्रिपाठीऐवजी नितीशला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफ्समध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने कोलकातासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. नितीश सलामीला आला आणि त्याच्यासमोर तीन सहकाऱ्यांनी झटपट विकेट गमावल्या आणि कोलकाताची अवस्था 42/3 अशी झाली.

पण त्यानंतर नितीशने सुनील नरिनच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 56 बॉलमध्ये 115 धावांची शानदार भागीदारी करत मॅचचं चित्रच पालटलं. दिल्लीने तीन विकेट्स मिळवत कोलकातावर घट्ट पकड मिळवली होती. नितीश-नरिने जोडीने आक्रमक हाच सर्वोत्तम बचाव हे धोरण स्वीकारत चौकार-षटकारांची लयलूट केली.

नितीश राणा, कोलकाता नाईट रायडर्स

फोटो स्रोत, BCCU/IPL

फोटो कॅप्शन, नितीश राणा

नितीशने रबाडाच्या बॉलिंगवर चौकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण होताच ओव्हरही संपली. कोलकाताचा राखीव खेळाडू रिंकू सिंगने एनर्जी ड्रिंकबरोबर एक जर्सी आणली होती. त्या जर्सीवर सुरिंदर अर्थात नितीशच्या वडिलांचं नाव लिहिलेलं होतं. नितीशने जर्सी दाखवत अर्धशतक वडिलांना समर्पित केलं. अर्धशतकानंतरही चांगला खेळ कायम करत नितीशने 53 बॉलमध्ये 81 रन्सची खेळी केली. या दिमाखदार खेळीत 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

कागिसो रबाडा, अँनरिच नॉर्किया, तुषार देशपांडे, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि मार्कस स्टॉइनस अशा चांगल्या बॉलिंगचा समाचार घेत नितीशने केलेली खेळी कोलकातासाठी महत्त्वपूर्ण ठरली. कोलकाताने या खेळीच्या बळावर 194 रन्स केल्या.

उसळत्या चेंडूचा सामना करताना नितीशला अडचण येते. दिल्लीविरुद्ध नितीशने सगळ्या त्रुटींना बाजूला सारत शानदार खेळी केली.

26वर्षीय नितीश काही वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता. त्यानंतर कोलकाताने त्याला संघात समाविष्ट केलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नितीश दिल्लीसाठी खेळतो.

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये शैलीदार आक्रमक बॅटिंग आणि उपयुक्त ऑफस्पिन बॉलिंगसाठी नितीश ओळखला जातो.

2016 पासून नितीश सातत्याने आयपीएल खेळतो आहे. आयपीएल स्पर्धेत नितीशने 57 मॅचेसमध्ये 1350 रन्स केल्या आहेत. 135च्या स्ट्राईकरेटने रन्स करताना नितीशने 10 अर्धशतकांची नोंद केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)