You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे यांचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी देऊन? - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी देऊन?' - चंद्रकांत पाटील
"भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार हे पाहावं लागेल," अशी उत्सुकता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
मात्र, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणाही साधला. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचं समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की चॉकलेट?"
"नाथाभाऊंच्या नाराजीबाबत अनेकवेळा त्यांच्याशी बोलणं झालं. त्याविषयी काहीतरी मार्ग निघाला असता. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस काय देईल, ते बघूया.
दोन वाजताचा प्रवेश चार वाजेपर्यंत का लांबला? तुमचे समाधान होईल ते देऊ, असं सांगण्यात आलं आहे. समाधानासाठी लिमलेट किंवा चॉकलेटसुद्धा दिलं जातं," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
2. 'सेक्युलर'प्रश्नी 104 मान्यवरांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अभिनंदनाचं पत्र
राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मुद्द्यावरून 'आपण सेक्युलर झालात का?' अशी विचारणा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर या विषयावर प्रतिक्रियांचं सत्र सुरू झालं होतं.
राज्यपालांच्या पत्राला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देऊन आता एक आठवडा उलटून गेला असला तरी हा विषय अजूनही चर्चेत आहे.
याप्रकरणी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील 104 मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं पत्र लिहिलं आहे. या माध्यमातून त्यांनी स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, जयंत पवार, नीरजा, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पानसे, मुक्ता दाभोलकर, विश्वास उटगी, मिलिंद मुरुगकर यांचा यात समावेश आहे.
"जेव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेव्हा अशी ठाम भूमिका घेणे राजकीयदृष्ट्या कठीण असले तरी आपण ती भूमिका ठामपणे घेतली. तुम्ही सेक्युलॅरिझमच्या (धर्मनिरपेक्षता) बाजूने उभे राहिलात. त्याची जाणीव राज्यपालांनाही स्पष्ट शब्दांत करून दिली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार!" असं मान्यवरांनी पत्रात म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
3. सिरम इन्स्टिट्यूट पाच कोरोना लशींचे 100 कोटी डोस तयार करणार - अदर पूनावाला
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच कोरोना लशींचे 100 कोटी डोस तयार करणार आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्होवॅक्स, कोव्हिवॅक्स, कोव्हिवॅक आणि SII कोव्हॅक्स या लशींचा समावेश आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्य अदर पूनावाला यांनी दिली आहे.
2022 वर्ष उजाडण्याआधी हे डोस तयार करण्यात येतील. कोव्हिशिल्ड लशीपासून याची सुरुवात होईल. 2021 च्या प्रत्येक तिमाहीत नवी लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही पूनावाला यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट भारतातील कंपनी युरोपातील अॅस्ट्राझेनिका कंपनीसोबत मिळून काम करत आहे. सध्या कोरोना लस बनवण्यासाठी त्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
याठिकाणी आधीपासूनच महिन्याला 2 ते 3 कोटी डोस तयार केले जात आहे. ही संख्या जाणुनबुजून मर्यादित ठेवली असून लस अंतिम झाल्यानंतर येत्या काळात काळात हा आकडा 7 ते 8 कोटींपर्यंत जाऊ शकतो, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे.
4. पंकजा मुंडेंनी मानले शिवसेनेचे आभार
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही शिवसेनेत यावं अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी दिली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
"नाथाभाऊ पक्षातून जाणार नाहीत, अशी भूमिका मी वेळोवेळी घेतली. पण त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे मलासुद्धा धक्का बसला आहे. भाजपमध्ये पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे.
वंचित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आहे. हे काम मी शेवटपर्यंत करत राहीन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याबाबत मुंडे यांनी खोतकर यांचे आभारही मानले. ही बातमी सरकारनामाने दिली आहे.
"एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, हा भाजपसाठी मोठा धक्का आहे, भाजपचे आणखी बरेच नाराज नेते आहेत. तेसुद्धा येत्या काळात योग्य निर्णय घेतील. पंकजा ताईच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या कोणत्याही नेत्याला शिवसेनेची दारं उघडी आहेत," असं खोतकर यांनी म्हटलं होतं.
तर गुलाबराव पाटील यांनीसुद्धा अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती. "पंकजाताई आमच्या भगिनी आहेत. त्या बाळासाहेबांचा आदर करतात. शिवसेना त्यांच्याविरुद्ध उमेदवार देत नाहीत, म्हणून त्यांनी शिवसेनेत यावं," असं पाटील म्हणाले होते.
5. महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही - नवाब मलिक
"महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये प्रचारासाठी गेले आहेत. तिथं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचं सांगतात. पण इथं आल्यावर वेगळी भूमिका घेतात. महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही," अशी टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मलिक शुक्रवारी (23 ऑक्टोबर) परभणी दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींना बिहारवर प्रेम असल्याचं सांगता आणि इथं वेगळीच भूमिका मांडता. जनतेला आता सगळं कळतं," असंही मलिक म्हणाले. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
- 'मी संघर्ष केला पण पाठीत खंजीर खुपसून राजकारण केलं नाही'- एकनाथ खडसे
- एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- फडणवीस
- एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडायला लावणारं कथित भोसरी भूखंड प्रकरण काय आहे?
- एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे आता काय करतील?
- देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक आता तोंड वर काढतील का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)