भारत-चीन सीमावाद: LAC वरील शांतता आणि स्थैर्य बिघडलं - एस. जयशंकर

एस. जयशंकर

फोटो स्रोत, Hindustan Times

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) शांतता आणि स्थैर्य बिघडलं आहे. यामुळे भारत आणि चीन संबंधांवर वाईट परिणाम होत आहे, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं.

लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव कायम आहे. सीमेवर दोन्ही देशांनी 50 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत.

एस. जयशंकर यांनी त्यांच्या 'द इंडिया वे' या पुस्तकाशी संबंधित एका वेबिनारमध्ये भारत-चीन संबधांवर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.

"भारत-चीनचे संबंध पूर्वीपासूनच जास्त काही चांगले नव्हते. 1980 नंतर व्यापार, प्रवास, पर्यटन आणि इतर सामाजिक घडामोडींनंतर हे संबंध सामान्य झाले होते."

भारत-चीन वाद

फोटो स्रोत, NurPhoto

"सीमा वाद तत्काळ सोडवला पाहिजे, असं मी म्हणत नाही. हा मुद्दा अत्यंत गुंतागुतीचा आणि क्लिष्ट आहे. या विषयावर विविध पातळींवर समेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा मुद्दा अत्यंत अवघड विषय ठरतो," असं जयशंकर म्हणाले.

ते पुढे म्हणतात, "मी एका ठोस उपायाबाबत बोलत आहे. LAC वर सीमाभागात 1980 पूर्वीप्रमाणेच शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत हा प्रयत्न आहे."

भारत-चीन यातून मार्ग कसा काढणार?

"शांतता आणि स्थैर्य बिघडलेलं असेल, तर स्वाभाविकपणे दोन्ही देशांच्या संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो, भारत आणि चीन दोन्ही देश प्रगतीच्या मार्गावर आहेत. जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावण्याची ते अपेक्षा करताना दिसतात. अशा स्थितीत दोन्ही देश एकमेकांमध्ये ताळमेळ कसा राखतील, हा मोठा प्रश्न आहे. मी माझ्या पुस्तकात या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे," असं जयशंकर यांनी म्हटलं.

एस. जयशंकर यांनी हे पुस्तक एप्रिल महिन्यातच म्हणजे सीमेवर तणाव निर्माण होण्याच्या आधीच लिहिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

भारत-चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणाव आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच LAC वर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.

दरम्यान, भारताने चीनशी संबंधित 100 पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घातली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)