कोरोना व्हायरस : पुणेकर कारवाई होऊनही मास्क का वापरत नाही?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, पुण्याहून बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोनाच्या संसर्गापासून बचावण्यासाठी मास्क वापरणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेपासून ते जगभरातील विविध तज्ज्ञ सांगत आहेत.

एकमेकांशी बोलताना किंवा गर्दीमध्ये मास्क वापरल्यास कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्यामुळेच राज्यात आणि देशात अनलॉक होत असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबाबत सरकारकडून सक्ती करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंड देखील आकारला जात आहे. मुंबई-पुणे या शहरांमध्ये अशी कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

2 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 1 लाख 3 हजार 335 नागरिकांवर मास्क न घातल्याबद्दल तसंच तो योग्य प्रकारे न लावल्याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

पाचशे रुपयाप्रमाणे या दंडाची रक्कम तब्बल 5 कोटी 16 लाख 67 हजार पाचशे इतकी होते. सप्टेंबर महिन्यात पुण्यात दररोज दोन हजारांच्या आसपास रुग्ण वाढत होते. अशा वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक मास्क घालत नसल्याचं तसंच तो योग्यरित्या वापरत नसल्याचे या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकर मास्क वापरत का नाहीत? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला.

लोक मास्क का वापरत नाहीत?

हाच प्रश्न आम्ही मानसोपचारतज्ञ दीपा राक्षे यांना विचारला.

राक्षे म्हणाल्या, ''कोरोनाबाबत अजूनही नागरिकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अनेकांना आलेल्या अनुभवामुळे किंवा एखाद्याचे अनुभव ऐकल्यानंतर खरंच कोरोना आहे की, हा साधा ताप आहे? असा विचार करताना काही नागरिक दिसतात. काहींच्या कोरोना चाचण्या एका केंद्रात पॉझिटिव्ह तर दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह आल्यानं लोकांच्या मनात संभ्रम देखील निर्माण झाला आहे.

पोलिसांच्या कारवाईमध्ये काळजी कमी आणि धाक अधिक वाटतो. काळजीपेक्षा पोलिसांच्या कारवाईला वैतागून लोक मास्क वापरतात. पण, पोलीस नसतील त्या ठिकाणी विनामास्क एकमेकांशी संवाद साधताना दिसून येतात. त्यामुळे कारवाईच्या बडग्यापेक्षा प्रबोधनाला अधिक महत्त्व द्यायला हवं. तसंच नागरिकांनी 'मला कोरोना होईल तेव्हा पाहू' हा अॅप्रोच ठेवणंदेखील अत्यंत चुकीचं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरायलाच हवा.''

कारवाई योग्य पद्धतीनं होत आहे का?

मास्कची कारवाई करताना अनेकदा टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे. मास्क काही सेकंदासाठी काढला किंवा तो काहीसा नाकाच्या खाली सरकला असेल तरी पोलीस कारवाई करत असल्याचा आरोपही केला जात आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

यासंदर्भात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर सांगतात, ''मास्कच्या कारवाईबाबत स्पष्टता दिसत नाही. कारवाई कोणावर करावी, याबाबतची स्पष्टता रस्त्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांना दिली जात नाही. नवराबायको कारमध्ये काचा बंद करुन प्रवास करत असतील तर अशावेळी कारवाईची गरज काय? मग त्यांनी घरात देखील मास्क लावायचे का? असा प्रश्न निर्माण होतो. यात कुठेही लॉजिक दिसत नाही.''

पुण्यातील संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय असणाऱ्या नायडू रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव देखील या लॉजिकबाबत प्रश्न उपस्थित करतात.

डॉ. चंदनशिव म्हणतात, ''एकाच कुटुंबातील व्यक्ती कारने काचा बंद करुन प्रवास करत असतील तर त्यांना मास्कची सक्ती योग्य वाटत नाही. खासकरून नवरा बायको जर प्रवास करत असतील तर ते घरातही एकाच खोलीत राहत असतात, तर गाडीत ते काचा बंद करुन विनामास्क एकत्र प्रवास करत असतील तर अशांवर कारवाई करणे योग्य नाही. संसर्ग केवळ गाडीतच होईल असं काही नाही. परंतु गाडीमध्ये बसेपर्यंत आणि गाडीतून उतरण्यापूर्वी मास्क हा लावणे अत्यंत आवश्यक आहे. मास्कच्या वापरामुळे 70 ते 80 टक्के संसर्गाचा धोका कमी होतो.''

'नागरिकांच्या सुरक्षेसाठीच कारवाई'

नागरिक आणि शहरातील डॉक्टरांच्या आक्षेपांविषयी आम्ही पुणे गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांच्याशी संपर्क साधला.

मास्कची नसल्यामुळे होणारी कारवाई ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "कारमध्ये एकापेक्षा अधिक लोक असतील आणि कोणी मास्क घातला नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. घरातील मंडळी बाहेर एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये जाताना मास्क वापरतातच ना?"

तुम्हाला दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याच्या आरोपाचं ते खंडन करतात.

''कारवाईचे टार्गेट असं काहीही नाही, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)