पुणे : कोरोना व्हायरसच्या अॅक्टिव्ह रुग्णांचे आकडे चुकीचे आहेत का?

- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
गेले काही दिवस पुणे जिल्ह्यातले आकडे वेगाने वाढताना दिसतायत. राज्य सरकारची आकडेवारी पाहिली तर पुण्याचे आकडे मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे. पण या आकड्यांची गोष्ट वेगळी आहे.
गुरुवारी संध्याकाळी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत पुणे जिल्ह्याची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 41357 दाखवण्यात आलेली आहे. पण त्याचवेळी पुणे विभागीय आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केलेली आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 23100 असल्याचं सांगते.
गेल्या काही दिवसांपासून पुणे प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात असलेली आकडेवारी आणि राज्य सरकारकडून प्रकाशित होणारी पुण्याची आकडेवारी यात सातत्याने तफावत दिसत होती.
बुधवारी प्रकाशित केलेल्या आकडेवारीत ही तफावत थेट एकोणीस हजारांवर जाऊन पोहोचली. ही तफावत का येत आहे, नेमकी कोणती आकडेवारी ग्राह्य धरायची आणि पुण्यात येत्या काळात रुग्णसंख्या किती वाढणार आहे या काही प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीने पुणे प्रशासनाकडून मिळवली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीबीसी मराठीला याबद्दल सांगितलं की, "आकडेवारीतली तफावत ही डेटा एन्ट्री योग्य पद्धतीने आणि वेळेवर होत नसल्याने येत आहे."
पण नेमकी आकडेवारी कशी काढली जाते?

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितल्याप्रमाणे 'पुण्यात 15-16 लॅब्स आहेत ज्या सॅम्पल टेस्टिंग करत असतात. त्यांच्याकडून किती अहवाल पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह आले यांची नोंदणी ICMR कडे केली जाते. पण ज्या कोव्हिड केअर फॅसिलिटी आहेत त्यांच्याकडून अॅडमिट झालेल्या रुग्णांना घरी सोडल्यानंतर त्याची नोंद करणं गरजेचं असतं. ती नोंद होत नाही तोपर्यंत अॅक्टिव्ह पेशंट्सचा आकडा अपडेट केला जातो. पण त्या नोंदण्या वेळेवर केल्या जात नसल्याने अॅक्टिव्ह केसेसचा आकडा मोठा दिसतोय.'
कोव्हिड संदर्भातल्या आकड्यांची नोंदणी ही तीन पातळ्यांवर होत असते.
• IDSP- इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हेलन्स प्रोग्राम ही केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत येणारी संस्था आहे.
• राज्य शासनाकडे होणारी नोंदणी- राज्य सरकारच्या कोव्हिड डॅशबोर्डवर होणारी जिल्हावार नोंदणी.
• ICMR - चाचण्या करणाऱ्या सर्व लॅब्स आणि रुग्ण दाखल करून घेणारी हॉस्पिटल्स आपल्याकडच्या अहवालांची आणि रुग्णांची माहिती ICMR कडे देत असतात. ही सर्व नोंदणी एका 'फॅसिलिटी अॅप'द्वारे होत असते. त्याच्यात सध्या काही त्रुटी असल्याने राज्याची आकडेवारी आणि जिल्हा प्रशासनाची आकडेवारी यात तफावत येत आहे.
आकडेवारीतल्या या तफावतीमुळे पुणं हे कोव्हिडचा हॉटस्पॉट बनलं आहे आणि परिस्थिती गंभीर झालेली आहे अशाप्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.

यामुळे पुण्याबद्दल चुकीचं मत तयार होतंय असं तुम्हाला वाटतं का याबद्दल बोलताना अलिकडेच पुणे विभागीय कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सौरभ राव यांनी सांगितलं की, "आम्ही राज्य सरकारच्या कोव्हिड कंट्रोल रुमला वेळोवेळी योग्य ती आकडेवारी पोहोचवत आहोत. ते त्याची दखल घेतील अशी त्यांना आशा आहे."
प्रशासन काय करतंय?
"सध्या दिसणारी तफावत ही फक्त अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यांमध्ये दिसत आहे. इतर आकड्यांमध्ये कोणतीही तफावत नाही. अशी तफावत दिसू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या तफावतीचं आम्ही कोणतंही समर्थन करत नाही. ही तफावत भरून काढण्याच्या सूचना सर्व हॉस्पिटल्सना देण्यात आल्या आहेत. ती दोन दिवसांत भरून निघेल अशी अपेक्षा आहे", असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
महिनाअखेर पर्यंत परिस्थिती काय असेल
सौरभ राव यांनी सांगितलं की सध्याचा रुग्णवाढीचा दर पाहता जुलै महिनाअखेरपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रात 27 हजार अॅक्टिव्ह रुग्ण असतील. यांच्यातल्या सुमारे 24 हजार रुग्णांची सोय कोव्हिड केअर सेंटर्समध्ये केली जाईल.

फोटो स्रोत, Twitter/@InfoDivPune
सुमारे 3 हजार रुग्णांना दवाखान्यांमध्ये दाखल करण्याची गरज पडू शकते. या प्रोजेक्शननुसार परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासन करत आहे. असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या महिनाभरात सॅम्पल टेस्टिंगचा वेग वाढवत नेल्यामुळे रुग्ण समोर येत आहेत तसंच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत असंही पुणे प्रशासनानं सांगितलं आहे.
सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्याचा केस फेटॅलिटी रेशो (CFR) हा 2.35% असला तरी पुणे महापालिका क्षेत्राचा CFR 2.5% आहे, तो कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही सौरभ राव यांनी सांगितलं.
लॉकडाऊन संपल्यानंतर काय?
23 जुलैच्या मध्यरात्री पुणे शहरातला दहा दिवसांचा लॉकडाऊन संपत आहे. यानंतर 31 जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊनपूर्वीचे जे नियम होते तेच लागू असतील असंही पालिका प्रशासनाने सांगितलंय. याबद्दलचा आदेश लवकरच काढला जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























