जस्टिस रामण्णांविरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे आरोप #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. जस्टिस रामण्णांविरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे आरोप न्यायाधीशांवर आरोप लावण्याच्या प्रकरणांच्या यादीत आता आणखी एक प्रकरण जोडलं गेलं आहे. यावेळी चक्क मुख्यमंत्र्यांनीच न्यायाधीशांवर आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिलं असून जस्टीस एन. व्ही. रामण्णा हे आंध्र प्रदेश हाय कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात, असा आरोप मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे.

जस्टीस रामण्णा हे सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती असून त्यांच्याकडे पुढील सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीश बोबडे यांना लिहिलेल्या पत्रात रेड्डी म्हणाले, "जस्टीस रामण्णा हायकोर्टातील बैठकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही न्यायाधीशांच्या रोस्टरचाही समावेश आहे."

या आठ पानी पत्रात जस्टीस रामण्णा यांचे आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबतच्या कथित संबंधांबाबतच्या आरोपांचा उल्लेख आहे.या पत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या जमिनीच्या वादाचाही उल्लेख आहे. आंध्र प्रदेशमधील अमरावती येथील जमिनीच्या या प्रकरणात जस्टीस रामण्णा यांच्या दोन मुली आणि इतर काही लोकांचा सहभाग आहे. या जमिनी त्यांनी विकत घेतल्यानंतरच याठिकाणी राज्याची नवी राजधानी बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. 6 ऑक्टोबर रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर शनिवारी (10 ऑक्टोबर) हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे मुख्य सल्लागार अजेय कल्लम यांनी हे पत्र पाठवलं होतं.

2. आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा : चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला

पुणे महापालिकेच्या 16 प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 11 जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीनं चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली.

या विजयावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

'पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना काही स्वप्न पडत असतील, तर त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालवू नये. आम्ही पण तुमचे बाप आहोत,' अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, "या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या सर्व जागा भाजपला मिळायला हव्या होत्या अशी काहीतरी जादू व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही."

पुण्यात भाजपच्या कोथरुड मतदारसंघातील व्यापारी सेलच्या नियुक्त्या करण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते.

3. श्रीकांत दातार 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'चे डीन नियुक्त

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राज ठाकरेंनी एका पोस्टमध्ये म्हटलं, "जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल'च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. 1908 साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्य तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.

या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा."

4. बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेचा बिस्किट चिन्हाला नकार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे. मात्र शिवसेनेने मात्र बिस्कीट या चिन्हावर नापसंती दर्शवली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. बाण हे जेडीयू पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय उतरावं लागणार आहे.

दरम्यान, शिवसेना बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असून पक्षानं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदी नेत्यांचा समावेश आहे.

5. 'जवानांसाठी नॉन बुलेटप्रुफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचं विमान'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 8400 रुपये खर्चून आलिशान विमान मागवलं जात आहे आणि जवानांना विना बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवलं जात आहे," असं त्यांनी हा व्हीडिओ ट्वीट करताना म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "पंतप्रधानांनी आपल्यासाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे 30 लाख, जॅकेट-ग्लोव्ह्ज 60 लाख, बुटं 67 लाख 20 हजार, ऑक्सिजन सिलिंडर 16 लाख 80 हजार...पण, पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)