You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमिनीपासून हजारो फूट उंच विमानात बाळाचा जन्म कसा झाला?
- Author, इमरान कुरैशी
- Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
डॉ. शैलजा वल्लभनेनी यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा योग्य वापर करत जमिनीपासून हजारो फूट उंचीवरून उडणाऱ्या विमानात डिलिव्हरी केली. त्या दिवसाची आठवण काढल्यावर आजही त्यांच्या अंगावर शहारा येतो.
डिलिव्हरी करण्यासाठी त्यावेळी त्यांच्याकडे केवळ कात्री, सॅनिटायझर आणि पट्टीच होती. आकाशातच डोळे उघडणारं हे पहिलंच बाळ असावं.
या डिलिव्हरीदरम्यान विमानातील प्रवाशांनी मोठी मदत केली. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाला आराम मिळावा म्हणून सहप्रवाशांनी सर्वोतपरी मदत केली. कुणी शाल, कुणी पॅड्स, तर कुणी बॅग्स दिल्या.
विमानात उपस्थित असलेले एक प्लास्टिक सर्जनही मदतीसाठी पुढे आले.
बंगळुरूतल्या क्लाऊड नाईन हॉस्पिटलमधील डॉक्टर शैलजा वल्लभनेनी यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, मी असं काही काम केलं, यावर माझाच आता विश्वास बसत नाही.
दिल्ली-बंगळुरू विमानप्रवासादरम्यान विमानातच डॉ. शैलजा वल्लभनेनी यांनी डिलिव्हरी केली आणि त्यात आई-बाळाला सुखरुप ठेवलं. विमानात अशाप्रकारे काही घडल्यास तांत्रिकदृष्ट्या डॉक्टरांच्या मदतीला येणारं काहीच नसतं. अशावेळी डिलिव्हरी यशस्वी झाल्यने त्यांनाही आश्चर्यच वाटतं.
त्या म्हणतात, "विमानात अशाप्रकारच्या घटना घडू शकतात, हे लक्षात घेऊन बेसिक प्रेग्नंसी किट तयार ठेवल्या पाहिजेत."
बेसिक प्रेग्नंसी किट प्रथमोपचार किटपेक्षा वेगळी असते.
उड्डाणावेळी काय झालं?
दिल्लीतून बंगळुरूच्या दिशेनं विमान झेपावल्यानंतर अगदी अर्ध्या तासातच डॉक्टरांची आवश्यकता असल्याचं आवाहन करण्यात आलं.
रियादमध्ये प्लास्टिक सर्जन म्हणून काम करणारे डॉ. नागराज मदतीसाठी पुढे आले.
डॉ. शैलजा म्हणतात, "मी विमानाच्या मागच्या बाजूस गेले, कारण मला वाटलं त्यांना काही मदत हवीय. मात्र, पायलटनं मला सांगितलं की, साडेसात महिन्यांच्या गर्भवती महिलेला मदत हवीय."
सुरुवातीला डॉ. शैलजा यांना हे गर्भपाताचं प्रकरणं वाटलं. कारण ती महिला पोटात दुखत असल्याचंही सांगत होती. मात्र, स्पॉटिंगमधून रक्त येतंय का, असं विचारल्यावर त्या महिलेने नकार दिला.
डॉ. शैलजा सांगतात, "जेव्हा मी महिलेच्या पोटाकडे पाहिले, तेव्हा असं वाटलं की ही महिला 32 किंवा 34 आठवड्यांची गर्भवती असेल. ती महिला शौचास जाऊन आली होती. ती जेव्हा बाथरूममधून बाहेर आली, तेव्हा मला तिथे रक्ताचे डाग दिसले."
त्यानंतर डॉ. शैलजा महिलेच्या जवळ गेल्या आणि त्यांनी पाहिलं की, बाळाचं डोकं थोडं बाहेर आलं आहे.
त्या सांगतात, "मी कात्री घेतली आणि सॅनिटायझरने स्वच्छ केली. त्यानंतर बाळाची नाळ कापली आणि त्याला झाकण्यासाठी पट्टीचा वापर केला. त्यानंतर इतर प्रवाशांनी कपड्यांची मदत केली, त्या कपड्यांनी बाळाला स्वच्छ केलं. बाळ सुखरूप असल्याची खात्री करून घेतली."
"त्यानंतर महिलेच्या गर्भाशयाला मालिश केलं. विमानात त्यावेळी दोन इंजेक्शन उपलब्ध होते, ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट होती. महिलेचं गर्भाशय आकुंचन पावत होता आणि रक्तस्त्रावही बंद होत होता.
त्यानंतर महिलेनं आपल्या बाळाला कुशीत घेत दूध पाजलं. यामुळे गर्भाशय आकुंचन पावण्यासाठी आणखी थोडी मदत झाली," असं डॉ. शैलजा सांगतात.
या विमानाचे पायलट कॅप्टन संजय मिश्रा हे यापूर्वी भारतीय वायूसेनेत कार्यरत होते. डॉ. शैलजा सांगतात, "कॅप्टन संजय मिश्रा यांनी विचारलं होतं की, विमान हैदराबादमध्ये उतरवायचं का? मी नकार दिला. कारण आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते. त्यामुळे विमान हैदराबादमध्ये उतरवण्याची आवश्यकता नव्हती."
नॉर्मल डिलिव्हरी नसती तर...?
डॉ. शैलजा यांच्या मते, "जर नॉर्मल डिलिव्हरी झाली नसती, तर स्थिती फारच अवघड होऊन बसली असती. त्यामुळेच मी म्हणते की, विमानात बेसिक प्रेग्नंसी किट ठेवायला हवे."
"विमानाच्या पायलटना डिलिव्हरी करण्याचं ट्रेनिंग दिलं जावं, असं माझं म्हणणं नाहीय. मात्र, विमानात जर आपत्कालीन स्थितीत बाळाला जन्म देण्याची वेळ आल्यास त्याबाबत त्यांना मुलभूत माहिती तरी असायला हवी," असंही डॉ. शैलजा म्हणतात.
"विमानात बिटाडीन, स्पिरीट, स्टीचसाठीचं साहित्य, ब्लिडिंग रोखण्यासाठीचं औषध इत्यादी गोष्टी उपलब्ध असायला हव्यात. प्रेग्नंसीसारख्या स्थितीबाबत विमान कंपन्यांनी नियमही बनवायला हवेत," असंही त्यांना वाटतं.
कुठल्या गोष्टीमुळे स्थिती नियंत्रणात आली?
डॉ. शैलजा सांगतात, "त्यावेळी बुद्धीचा वापर केला. विचार केला की, असं काय करता येईल, जेणेकरून आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहतील. मला जे काही उपलब्ध झालं, त्याचा नीट वापर केला. बाळाला सेप्सिसही होऊ शकतं, याची काळजी मी केली नाही. कारण त्यावर नंतर उपचार होऊ शकत होते."
10 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. शैलजा यांनी याआधी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर त्या गर्भतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत.
"विमानातून उतरल्यावर सर्वात आधी आई आणि बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मला कळलंय की, आई आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत," असं डॉ. शैलजा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)