You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: राहुल त्रिपाठी चमकला; कोलकाताचा चेन्नईवर विजय
चेन्नईच्या हातातल्या विजयाचा घास काढून घेत कोलकाताने निसटत्या विजयाची नोंद केली. कोलकाताने 10 रन्सच्या फरकाने ही मॅच जिंकली.
168 रन्सचं आव्हानासमोर खेळताना चेन्नईची 12 ओव्हरमध्ये 1 बाद 99 अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर कोलकाताने रन्स रोखत आणि विकेट्स पटकावत चेन्नईवर दडपण आणलं. कोलकाताच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर चेन्नईने नियमितपणे विकेट्स गमावल्या.
शेन वॉटसन-फॅफ डू प्लेसिस जोडीने 30 रन्सची भागीदारी केली. शिवम मावीने डू प्लेसिसचा अडसर दूर केला. वॉटसनने अंबाती रायुडूला हाताशी घेत दुसऱ्या विकेटसाठी 69 रन्सची भागीदारी केली. कमलेश नागरकोट्टीने रायुडूला आऊट केलं. त्याने 30 रन्स केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वॉटसन सुनील नरिनच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि एका षटकारासह 50 रन्स केल्या.
10 ते 16 ओव्हर्समध्ये शिस्तबद्ध बॉलिंग करत कोलकाताने चेन्नईने चौकार-षटकार मिळू दिला नाही. धोनी 12 बॉलमध्ये 11 रन्स करून आऊट झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला आऊट केलं. 11 बॉलमध्ये 17 रन्स करून सॅम करन आऊट झाला. केदार जाधव आणि रवींद्र जडेजाने प्रयत्न केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. चेन्नईने 157 रन्स केल्या.
कोलकाताकडून शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोट्टी, सुनील नरिन, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राहुल त्रिपाठीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र राहुल त्रिपाठीचा अपवाद वगळता कोलकाताच्या एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही.
सुनील नरिनऐवजी राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शुभमन गिल-त्रिपाठी जोडीने 37 रन्सची सलामी दिली. शार्दूल ठाकूरने ही जोडी फोडली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नितीश राणाला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळालेल्या करण शर्माने चकवलं. तो 9 रन करू शकला.
आयोन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल असे एकापेक्षा एक महारथी संघात असतानाही कोलकाताने सुनील नरिनला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं. नरिनने 9 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. रवींद्र जडेजा, फॅफ डू प्लेसिस यांनी एकत्रित कॅच घेत नरिला माघारी धाडलं.
इनिंग्जच्या उत्तरार्धात संधी मिळालेले मॉर्गन आणि रसेल झटपट आऊट झाले आणि कोलकाताची गाडी घसरली. सॅम करनच्या उसळत्या बॉलवर फटका खेळण्याचा मॉर्गनचा प्रयत्न धोनीच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. शार्दूल ठाकूरच्या बॉलिंगवर लगेचच मोठा फटका खेळण्याचा रसेलचा प्रयत्न फसला. मॉर्गन 7 तर रसेल 2 रन्स करू शकला.
एकाबाजूने सहकारी आऊट होत असताना त्रिपाठीने 51 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांसह 81 रन्सची दिमाखदार खेळी साकारली. काही हंगामांपूर्वी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना त्रिपाठीने चांगली कामगिरी केली होती.
दिनेश कार्तिकने 12 तर पॅट कमिन्सने 17 रन्स केल्या.
बर्थडे बॉय ड्वेन ब्राव्होने 3 तर सॅम करन, शार्दूल ठाकूर आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ब्राव्होच्या बॉलिंगवर धोनी एका हातातील कीपरचे ग्लोव्ह्ज काढून उभा होता. शिवम मावीने खेळलेला बॉल धोनीच्या त्याच हाताला लागून उसळला. चाळिशीकडे झुकलेल्या धोनीने जोरदार डाईव्ह लगावत कॅच टिपला.
हंगामाच्या सुरुवातीपासून दिनेश कार्तिकऐवजी आयोन मॉर्गनला कॅप्टन करा असा क्रिकेटचाहत्यांचा सूर होता. कोलकाताच्या कामगिरीत सातत्य नसल्याने मॉर्गनला कॅप्टन करा हा सूर अधिकच तीव्र झाला.
सुनील नरिनला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवणं आणि अकराव्या ओव्हरपर्यंत बॉलिंग न देणं यामुळे कॅप्टन कार्तिकवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
कोच ब्रेंडन मॅक्युलम, बॅटिंग कोच अभिषेक नायर, मेंटॉर डेव्हिड हसी यांची भूमिकाही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)