You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: सूर्यकुमार तळपला; मुंबईचा दणदणीत विजय
देखणेपण आणि रांगडेपणा यांचा सुरेख मिलाफ बॅटिंगमध्ये पाहायला मिळणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या बळावर मुंबईने राजस्थानचा धुव्वा उडवला.
मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना 193 रन्सची मजल मारली. राजस्थानचा डाव 136 रन्समध्येच आटोपला.
मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने 49 रन्सची सलामी दिली. राजस्थानसाठी पदार्पण करणाऱ्या कार्तिक त्यागीने क्विंटनला आऊट केलं. 10व्या ओव्हरमध्ये रोहित आणि इशान किशन या दोघांना श्रेयस गोपाळने आऊट केलं. त्यावेळी मुंबईची स्थिती 88/3 अशी होती.
यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रं हाती घेतली. एकेरी-दुहेरी आणि चौकार-षटकार यांची सुरेख सांगड घालत सूर्यकुमारने 47 बॉलमध्ये नाबाद 79 रन्सची खेळी साकारली. सूर्यकुमारच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले.
पारंपरिक फटक्यांच्या बरोबरीने सूर्यकुमारने अक्रॉस जाऊन फाईनलेग क्षेत्रात रन्सची लयलूट केली. जोफ्रा आर्चर आणि टॉम करन यांच्यासारख्या वेगवान माऱ्यासमोरही सूर्यकुमारने फाईनलेग क्षेत्रात रन्स वसूल केल्या. हार्दिक पंड्याने 19 बॉलमध्ये 30 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने हार्दिक पंड्यासह पाचव्या विकेटसाठी 38 बॉलमध्ये 76 रन्सची भागीदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानची पहिल्या सहा ओव्हर्समध्ये 12/3 अशी अवस्था झाली. यानंतर जोस बटलरचा अपवाद वगळता राजस्थानच्या एकाही बॅट्समनने झुंज दिली नाही.
बटलरने 44 बॉलमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांसह 70 रन्सची खेळी केली. बटलरचं फॉर्ममध्ये येणं प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरू शकतं. जसप्रीत बुमराहने 20 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या.
ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. पॅटिन्सच्या बॉलिंगवर पोलार्डने बटलरचा घेतलेला कॅच संस्मरणीय होता.
सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)