IPL 2020: चेन्नई एक्स्प्रेसने उडवला पंजाबचा धुव्वा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शेन वॉटसन आणि फॅफ डू प्लेसिस यांच्या तडाखेबंद खेळींच्या बळावर चेन्नईने पंजाबचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. सलग तीन मॅचमध्ये पराभवामुळे चेन्नईवर टीका होऊ लागली होती. मात्र पंजाबला निष्प्रभ करत चेन्नईने सूर गवसल्याचे संकेत दिले.

किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्यांदा 178 रन्सची मजल मारली. लोकेश राहुलने 52 बॉलमध्ये 7 चौकार आणि एका षटकारासह 63 रन्सची खेळी केली. निकोलस पूरनने 17 बॉलमध्ये 33 रन्सची वेगवान खेळी केली. करुण नायरच्या जागी संधी मिळालेल्या मनदीप सिंगने 16 बॉलमध्ये 27 रन्स केल्या. पीयुष चावलाने मयांक अगरवालला 26 रन्सवर आऊट करत पंजाबची सलामीची भागीदारी फोडली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.

पंजाबने दिलेलं लक्ष्य आव्हानात्मक होतं. पण शेन वॉटसन आणि फॅफ डू प्लेसिस या अनुभवी जोडीने पंजाबच्या प्रत्येक बॉलरचा खरपूर समाचार घेत चेन्नईला दिमाखदार विजय मिळवून दिला.

तीनशेहून अधिक ट्वेन्टी-20 मॅचेसचा अनुभव गाठीशी असलेल्या वॉटसनने 53 बॉलमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 83 रन्सची खेळी साकारली. युएईतील प्रचंड उकाडा आणि आर्द्रता यामुळे वॉटसन फिटनेस राखू शकेल का अशी शक्यता होती. मात्र वॉटसनने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

दुसऱ्या बाजूने यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या डू प्लेसिसने 53 बॉलमध्ये 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 87 रन्सची खेळी केली.

धोनी ब्रिगेड युएईत दाखल झाल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचाही समावेश होता. हरभजन सिंग वैयक्तिक कारणांमुळे युएईला रवानाच झाला नाही. सुरेश रैना युएईत पोहोचला मात्र वैयक्तिक कारणांमुळे तो मायदेशी परतला.

पहिल्या मॅचनंतर अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला. ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्हो पहिले काही सामने खेळू शकला नाही. चेन्नईला सलग तीन मॅचेसमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. दरवर्षी हमखास प्लेऑफ्स गाठणाऱ्या संघांमध्ये चेन्नईचा समावेश होतो. यंदा चेन्नईचं काही खरं नाही अशी चर्चा सुरू झाली.

धोनीचं वय झालं यावरूनही सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. मात्र चेन्नईचा आधारस्तंभ असलेल्या वॉटसनला सूर गवसला आणि चेन्नईची पराभवाची मालिका खंडित झाली.

दरम्यान दुपारच्या मॅचमध्ये मुंबईने शिस्तबद्ध बॉलिंगच्या जोरावर हैदराबादना नमवलं. शारजाच्या छोट्या मैदानावर मुंबईने 208 रन्स केल्या आणि हैदराबादला 174 रन्सवरच रोखलं. जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)