You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Big Boss 14: सलमान खानने केली घोषणा- राहुल वैद्य, जान कुमार बिग बॉसचे स्पर्धक
बिग बॉसच्या 14व्या हंगामाची सुरुवात झाली आहे. शनिवारी (3 ऑक्टोबर) बिग बॉसचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. यावर्षी सहभागी होत असलेल्या स्पर्धकांची यामध्ये घोषणा करण्यात आली.
यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे बिग बॉस हा रिअॅलिटी शो होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण शोचा होस्ट सलमान खान याने एका व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये 14व्या हंगामाची घोषणा केली आणि याबाबतचा संभ्रम दूर केला. शनिवारी पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खानने शोमधील सर्व स्पर्धकांची ओळख करून दिली.
स्पर्धकांची नावं, त्यांची संख्या याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. जान कुमार, राहुल वैद्य, जास्मीन भसीन यांची नावं सुरुवातीपासूनच चर्चेत होती.
सोबतच यावेळी शोमध्ये 13 स्पर्धक सहभागी होतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. पण शनिवारी सलमानने फक्त 11 नावांची घोषणा केली.
बिग बॉसच्या 14व्या हंगामासाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत.
पहिला नियम म्हणजे, यंदाच्या वर्षी सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान हे तीन सीनियर सदस्य दोन आठवडे घरात राहातील.
हे तिन्ही सदस्य घरातील सर्व नियम बनवतील. दाखल होणारा प्रत्येक स्पर्धक 14 दिवस 'टू बी कन्फर्म्ड' (TBC) स्थितीत असेल. स्पर्धकांना या काळात तिन्ही सीनियर सदस्यांचं लक्ष वेधून घ्यावं लागेल.
तिन्ही सदस्य या सर्वांची परीक्षा घेऊन शोमध्ये कोण सहभागी होईल आणि कोण बाहेर जाईल, याचा निर्णय घेतील.
बिग बॉसच्या घरात कोण कोण असेल?
निशांत सिंह मलकानीः हिंदीतील कार्यक्रमांमध्यांना आपण पाहिले आहे. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास असणारी व्यक्ती म्हणून निशांतची ओळख आहे. बिग बॉसचा स्वरूप पाहता निशांत महत्त्वाचा स्पर्धक ठरेल.
जास्मिन भसीनः तमिळ सिनेमांमधून करिअरची सुरुवात करणारी जास्मिन 'टशन-ए-इश्क' आणि 'दिल से दिल तक' या कार्यक्रमांमध्ये दिसली होती. बिग बॉसमधील याआधीचे स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यासोबतही तिने काम केले आहे.
अभिनव शुक्लः कलर्स टीव्हीच्या वेबसाईटनुसार, 'सिलसिला बदलते रिश्तों का' आणि 'छोटी बहू' या मालिकांमधील अभिनेता अभिनव शुक्ला आणि त्याची पत्नी रुबिना दिलॅक बिग बॉसच्या घरात दिसतील.
रुबिना दिलॅकः यंदा बिग बॉसच्या घरात विवाहित जोडपं पाहायला मिळेल. अभिनव शुक्लाची पत्नी रुबिना सुद्धा बिग बॉसच्या घरात दिसेल. 'छोटी बहू' नावाच्या सिनेमात या कलाकार जोडप्याने काम केले आहे. तसंच, रुबिनाने 'शक्ती - अस्तिव के एहसास की' या मालिकेत तृतीयंपथीयाची भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेची खूप चर्चाही झाली होती. रुबिना बिग बॉस टॉक्समध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकली नाही. त्यामुळे तूर्तास तिला घराबाहेर ठेवण्यात आले आहे.
सारा गुरपालः बिग बॉसच्या गेल्या हंगामात पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल आणि हिमांशी खुराणा यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेच लक्षात घेऊन यावेळी बिग बॉसच्या घरात पंजाबी कलाकार सारा गुरपाल हिला प्रवेश देण्यात आला आहे. सारा पंजाबी अभिनेत्री आणि गायिका आहे. मात्र, सारालाही रुबिनासारखं रिजेक्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
पवित्रा पुनियाः एमटीव्ही चॅनलच्या रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया सुद्धा यंदा बिग बॉसच्या घरात असेल. बिग बॉसच्या टीझरमध्येही पवित्रा दिसते. त्यामुळे ती बिग बॉसच्या घरात असेल यावर जवळपास शिक्कामोर्तबच झालंय.
जान कुमार सानूः ग्रँड प्रीमियरच्या आधीपासूनच जान कुमार सानूचे प्रोमो सलमान खानसोबत आले होते. वडील कुमार सानू यांनी याला दुजोराही दिला होता. मात्र, तोही सध्या घराबाहेरच आहे.
राहुल वैद्यः इंडियन आयडल या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये राहुल वैद्य दुसऱ्या क्रमांकावर होता. पार्श्वगायनामध्ये फारशी चमकदार कामगिरी तो करू शकलेला नाही. बिग बॉसमध्ये जान कुमार सानू यांच्यानंतर येणारा तो दुसरा गायक आहे.
शहजाद देओलः एमटीव्ही चॅनलच्या एका रिअॅलिटी शोमध्ये दुसऱ्या क्रमांकार्यंत गेलेला शहजाद देओललाही बिग बॉसमध्ये संधी मिळाली आहे. एमटीव्हीच्या शोमध्ये शहजाद एक गुड बॉय म्हणून ओळखला गेला होता. आता मॉडेलिंगमधून करिअर सुरू करणाऱ्या शहजादची बिग बॉसमध्ये काय प्रतिमा तयार होते ते पाहू.
निकी तांबोळीः दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीमधील निकी तांबोळीने यंदा बिग बॉसमध्ये प्रवेश मिळवला आहे. कंचना-3 सारख्या चित्रपटांत काम करणाऱ्या निकीला बिग बॉसमुळे हिंदी सिनेमाची दारं उघडली जाऊ शकतात.
एजाज खानः अभिनेता एजाझ खानने टीव्ही दुनियेत बरंच काम केलं आहे. त्याने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)