शरद पवार- 'सिरममध्ये लस टोचून घेतली, पण ती कोरोनावरची नव्हती' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, RAVEENDRAN
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. सिरममध्ये लस टोचून घेतली, पण ती कोरोनावरची नव्हती- शरद पवार
मी कोरोनावरील लस घेतली, असे सांगितले जात असले तरी त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्याचं कळल्यानंतर त्यांनी कोरोनाप्रतिबंधंक लस टोचून घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र शरद पवारांनी स्वतःच या चर्चेला पूर्णविराम दिला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"मी सिरममध्ये लस टोचून घेतली हे खरे आहे मात्र ती लस रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. सिरममध्ये प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या लशीची निर्मिती होते. मी व माझ्या स्टाफने आज हीच लस घेतली आहे," असं शरद पवार यांनी म्हटलंय.
सिरमचे प्रमुख पूनावाला हे शरद पवार यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे पवारांसाठी त्यांनी करोना लशीची व्यवस्था केली असेल, असे तुम्हाला वाटत असेल पण तसं काहीही नाही, असंही मिश्कीलपणे पवार म्हणाले.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दरम्यान, राज्यातलं ठाकरे सरकार मजबूत आणि स्थिर असून सरकारचे सहा महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे निवडणुका आणि सत्तांतराच्या आशेवर आणखी साडेचार वर्षं काढा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप नेत्यांना लगावलाय.
लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असल्याचं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
2. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे उत्तर प्रदेशात गप्प का?- अमोल कोल्हे
हाथरसमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे, काँग्रेस नेते हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले तेव्हा घडलेला प्रकार म्हणजे दडपशाही आणि अघोषित हुकुमशाहीचं उदाहरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केली आहे. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, NCP/FACEBOOK
महाराष्ट्रात खुट्टं वाजलं की लगेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येते पण आता उत्तर प्रदेशात इतकी मोठी घटना घडूनही ते सगळे लोक गप्प का आहेत, असा सवालही कोल्हेंनी केलाय.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही अशीच टीका केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ओरड करणाऱ्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावून दाखवावी, असं सावंत म्हणाले आहेत.
3. तब्बल 7 महिन्यानंतर पहिल्यांदाच निर्यातीत वाढ
कोरोनाची जागतिक साथ सुरू झाल्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये पहिल्यांदाच भारतातून करण्यात येणाऱ्या निर्यातीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 5.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मिंटने ही बातमी दिली आहे.
इंजिनिअरिंग गुड्स, पेट्रोलियम उत्पादनं, औषधं आणि कपड्यांच्या निर्यातीत वाढ झालीय. प्रामुख्याने चीन आणि अमेरिकेला ही निर्यात करण्यात येतेय. सप्टेंबर महिन्यात एकूण 27.4 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली तर 30.3 अब्ज डॉलर्स मूल्याच्या वस्तूंची आयात भारताने केली.
4. डोनाल्ड ट्रंप यांना कोरोनाची लागण; शेअरबाजारांवर परिणाम, सोनं महागलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्यावर त्याचे परिणाम जगभरातल्या शेअरबाजारांवर झाले. यामध्ये अमेरिकन शेअरबाजार आणि आशिया खंडातल्या शेअरबाजारांमध्ये घसरण झाली. सकाळने याविषयीची बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शेअरबाजारांत पडझड होत असतानाच दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीही घसरल्या आणि गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या.
गांधी जयंतीनिमित्त भारतीय शेअरबाजार शुक्रवारी बंद होते, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत याचे पडसाद पहायला मिळाले नाहीत.
5. सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी पैसे नाहीत, विमान खरेदी करण्यासाठी आहेत - जयराम रमेश
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांसाठी खरेदी करण्यात आलेलं 'एअर इंडिया वन' विमान भारतात दाखल झालं. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी यावरून सरकारवर टीका केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याविषयी ट्वीट करत त्यांनी म्हटलंय की सरकारकडे एकीकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाहीत, पण दुसरीकडे करदात्यांचे 8458 कोटी रुपये पंतप्रधान आणि दोन महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विमान घ्यायला खर्च करण्यात आले. सरकारचा प्राधान्यक्रम चुकला असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलंय. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























