You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : भारत एक लाख मृत्यूंपर्यंत कसा पोहोचला?
- Author, अपर्णा अल्लुरी आणि शादाब नज्मी
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारताने एक लाखांचा आकडा गाठला आहे.
कोव्हिड-19 च्या प्रादूर्भावाचा विचार करता अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोना व्हायरसच्या आकड्यांच्या बाबतीत भारतासाठी सप्टेंबर महिना सर्वात वाईट ठरला. या महिन्यात देशात दररोज सरासरी 1100 मृत्यूंची नोंद झाली. काही राज्यांमध्ये मृत्यूंची संख्या दिवसांगणिक वाढत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसने भारतात आपले हातपाय खोलवर पसरले आहेत.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या संदर्भात भारताची परिस्थिती सध्या काय आहे, याचा आढावा बीबीसीने घेतला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसार
कोरोनाच्या प्रसारात महाराष्ट्र भारतात सर्वात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत 13 लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 36 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाने पहिल्या टप्प्यातच राज्यात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात महानगरं आणि नंतर ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरले.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
राज्यात सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी 300 ते 500 मृत्यूंची नोंद होत होती. ही संख्या देशातील इतर राज्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
सुरुवातीच्या काळात मुंबईला कोरोनाने घेरलं होतं. नंतर पुण्याकडे कोरोनाचा केंद्रबिंदू वळला. राज्यात मुंबईमध्येच सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले असून त्यानंतर पुण्यात 5 हजार 800 मृत्यूंची नोंद झाली आहे.
डॉ. अर्णब घोष यांच्या मते, "मुंबई हे कोरोनाव्हायरसचं भारतातलं प्रवेशद्वार ठरलं. डॉ. घोष यांनी राज्यात अँटीबॉडीच्या सिरो सर्व्हे करणाऱ्या पथकातही काम केलं आहे. प्रशासनाने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये पुण्यात तब्बल 50 टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडी आढळून आल्या."
डॉ. घोष सांगतात, "सर्वांचं लक्ष मुंबईकडे होतं, त्या काळात पुणे आणि परिसरात तसंच ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा प्रसार झाला."
एकीकडे, रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमधील गैरसोयीबाबत मोठ्या प्रमाणात आरोप आणि चर्चा झाली.
पंजाबमधील परिस्थिती बिकटच
पंजाबमध्ये कोरोना मृत्यूंचं प्रमाण 3 टक्क्यांच्या आसपास आहे. देशातील मृत्यूंच्या प्रमाणापेक्षा पंजाबमधील मृत्यूंचं प्रमाण जवळपास दुप्पट आहे.
देशात कोरोना मृत्यूंच्या बाबतीत पंजाब नवव्या क्रमांकावर आहे. पण राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंतही गेल्याचं दिसून येईल.
पंजाबमधील परिस्थितीबाबत आम्ही ब्रुकिंग इन्स्टिट्यूशनच्या डॉ. शमिका रवी यांच्याशी बातचीत केली. त्या सांगतात, "पंजाबमधील स्थिती खरंच गंभीर आहे. इथला मृत्यूदर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
"भारतातील व्यापक चाचणी आणि उपचारांमुळे मृत्यूदर कमी होत असल्याचं चित्र होतं. पण पंजाबची ही परिस्थिती चिंताजनक असून भारतातील घटनाक्रमाच्या पूर्ण विरुद्ध आहे."
डॉ. रवी यांच्या मते, "महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांत एकसारख्या समस्या आहे. मर्यादित चाचणीमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढू शकतं. संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयांपर्यंत उशीरा पोहोचल्यामुळे ते धोकादायक ठरू शकतं."
चाचणीत कोणत्या अडचणी?
पंजाबमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण 6.2 टक्के इतकं आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण 24 टक्के आहे. हेच प्रमाण बिहारमध्ये 2.5% आणि झारखंडमध्ये 3.7% आहे. याचा अर्थ प्रति दशलक्ष चाचण्यांचं प्रमाण कमी असूनही पंजाबमध्ये पॉझिटिव्ह येण्याचा दर कमीच आहे.
"तुम्ही कमी चाचण्या केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. तुम्हाला ते उशीराने आढळून येत आहेत," असं डॉ. शमिका सांगतात.
डॉ. शमिका यांच्या मते, "असंच चित्र महाराष्ट्रात दिसून येईल. राज्यात रुग्णसंख्या, मृत्यूदर वेगाने वाढत असूनसुद्धा इथं चाचण्या म्हणाव्या तितक्या वाढवण्यात आलेल्या नाहीत."
मात्र डॉ. गौतम मेनन यांना चाचण्या आणि मृत्यूसंख्येचा संबंध जोडणं योग्य वाटत नाही. डॉ. मेनन हे संसर्गजन्य रोगांच्या स्वरूप या विषयाचे संशोधक आणि प्राध्यापक आहेत.
डॉ. मेनन सांगतात, "तुम्ही चाचण्या जास्त घेत नाहीत, म्हणजे तुम्ही अनेक रुग्णांची नोंदच केली नाही. याचा अर्थ त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं, असा होत नाही."
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्य नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये कोव्हिड रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून मृत्यू होईपर्यंतचा कालावधी सरासरी 13 दिवस इतका होता. उशीरा निदान झाल्यानेच हे प्रमाण वाढलं, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
तामीळनाडूमध्ये सातत्याने जास्त प्रमाणात कोव्हिड चाचणी घेण्यात येत आहे. इथं मृत्यूदर कमी आढळून येतो. राज्यात आतापर्यंत 9 हजार कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूंच्या बाबतीत तामीळनाडू देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण जुलै महिन्यापासून इथली रुग्णसंख्या सातत्याने घटताना आपल्याला दिसेल.
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. जेकब जॉन सांगतात, "सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्गाचं निदान झाल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास मदत नेहमीच होतो असं नाही."
डॉ. जॉन यांच्या मते, "चाचणीचा निष्कर्ष योग्य न आल्यास उपचार करण्यात अडचणी येऊ शकतात किंवा मुळात उपचार पद्धतीच चुकीची असल्यामुळेही मृत्यूंचं प्रमाण वाढू शकतं."
शहरी भागात जास्त मृत्यू
देशात कोरोनाचा फटका सर्वात जास्त बसलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने शहरी भागाचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी तब्बल 80 टक्के मृत्यू शहरी भागात झाल्याची नोंद आहे.
शहरी भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखणंही अवघड असतं. शिवाय कोरोनाचा जास्त प्रसार झालेले महाराष्ट्र आणि पंजाब हे राज्य श्रीमंत म्हणून ओळखली जातात. इथं शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. इतर जिल्ह्यांमध्येही अनेक मोठी शहरं आहेत. याठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे.
याठिकाणीच जास्त मृत्यूदर आढळून येत आहे. इतर जिल्ह्यांतील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात, हेसुद्धा याचं कारण असू शकतं, असं तज्ज्ञांना वाटतं.
"पुण्यातील आकडेवारीनुसार आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे. त्यांचाही पुण्याच्या संख्येत समावेश होतो," असं डॉ. गौतम मेनन सांगतात.
"शिवाय ग्रामीण भागात इतर रोग किंवा व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही कमी असते, अशा लोकांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो," असंही डॉ. मेनन सांगतात.
गरीब राज्यांमध्ये मृत्यूंचं कमी प्रमाण
देशातील गरीब राज्यांमध्ये कोरोना मृत्यूंचं प्रमाण कमी आढळून आलं आहे. याठिकाणी कोरोनाचा प्रसार झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल, अशी सर्वांना भीती होती. पण अद्याप याठिकाणी मृत्यूदर कमी आहे.
डॉ. घोष यांच्या मते, "कोरोना व्हायरसची साथ अजून संपलेली नाही. महाराष्ट्र आणि बऱ्यापैकी दिल्लीसाठी वाईट काळ आला होता. पण इतरांना अजूनही त्यातून जावं लागू शकतं."
"प्रत्येक राज्यात कोरोनाची साथ वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. ही महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यांमध्ये सुरू झाली. बिहारमधून याची सुरूवात झाली असती तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असती," असं डॉ. घोष यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)