You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : मुंबईतील झोपडपट्टयांमधील संसर्गात घट - सिरो सर्व्हे
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात 45 टक्के, तर इमारतीत राहणाऱ्या 18 टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील तीन विभागांमध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेचे आकडे गुरूवारी (1 ऑक्टोबर) जारी केले.
मुंबईकरांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडी तयार झाल्या आहेत का? संसर्ग कोणत्या भागात किती लोकांपर्यंत पोहोचला आहे, हे जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे करण्यात येतो.
दुसरा सिरो सर्व्हे दादर, माटुंगा, धारावी, देवनार, गोवंडी, दहिसर या परिसरात करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा दुसरा सिरो सर्व्हे करण्यात आला होता.
दुसऱ्या सिरो सर्व्हेचे परिणाम :
- शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या 45 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या.
- इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होण्याचं प्रमाण पहिल्या सिरो सर्व्हेपेक्षा दोन टक्क्यांनी वाढून 18 टक्क्यांपर्यंत पोहोचलं.
- पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या.
- 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडी तयार होण्याचं प्रमाण जास्त.
- 5 हजार 384 लोकांच्या रक्ताची तपासणी सिरो सर्व्हेमध्ये करण्यात आली होती.
पहिल्या सिरो सर्व्हेमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या 57 टक्के, तर इमारतीत राहणाऱ्या 16 लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं होतं.
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "दुसऱ्या सिरो सर्व्हेच्या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. झोपडपट्टी भागात मोठ्या संख्येने लोक राहतात. त्यामुळे या भागात संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळ योग्य काळजी घेतली तर कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यास मदत होईल."
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीच प्रमाण
दुसऱ्या सिरो सर्व्हेमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या 27 टक्के कर्मचाऱ्यांच्या शरीरात कोरोना व्हायरस विरोधात अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलंय. या सर्व्हेक्षणात हेल्थपोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्त्ररावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती.
याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणतात, "मुंबईतील झोपडपट्टी परिसरात पालिकेने घरोघरी जाऊन तपासणी केली. या तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी घराघरात पोहोचले. मात्र, या आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेऊन तपासणी केल्याने त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात झाला."
सिरो सर्व्हेचा निष्कर्ष
झोपडपट्टी परिसरातील नमुन्यांमध्ये आढळून आलेलं अँटीबॉडीजचं प्रमाण आणि बाधित रुग्णांची संख्या, याचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.
पहिल्या फेरीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत इमारतींमध्ये लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होण्यात वाढ झाली आहे.
बरे झालेले रुग्ण आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांमध्ये काही कालावधीनंतर अँटीबॉडी पातळी ही घसरते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)