You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : पुण्याच्या जंबो कोव्हिड हॉस्पिटलमधली परिस्थिती कशी आहे?
कोरोना संसर्गासाठी पुणे शहर आणि जिल्हा देशातला संवेदनशील हॉटस्पॉट बनला. मुंबई, दिल्ली अशा शहरांना मागे टाकत पुणे सर्वाधिक एक्टिव्ह केसेस असलेलं शहर बनलंय.
आतापर्यंत, म्हणजे जेव्हा ही बातमी लिहिली जाते आहे तोपर्यंत, पुणे शहरात एकूण 1 लाख 56 हजार 783 केसेसची नोंद झाली आहे तर जिल्ह्यासाठी हा आकडा २ लाख 95 हजार 689 पर्यंत पोहोचला आहे. ज्यात 57,460 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
एका बाजूला पुणे हे देशात दर दहा लाखांच्या लोकसंख्येमागे सर्वाधिक टेस्ट्स करणारं शहर आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी हे शहर झगडतंय. पुण्याची कोरोनाविरुद्धची लढाई आहे, जी दिवसागणिक लांबत चालली आहे.
राज्यातली कोव्हिडची पहिली केस 9 मार्चला पुण्यात नोंदवण्यात आली. त्यानंतर 6 महिन्यांनी 24 ऑगस्टला या शहराला पहिलं जंबो कोव्हिड हॉस्पिटल मिळालं.
पुण्याच्या शिवाजीनगर भागातल्या 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे' (COEP) च्या मैदानावर हे हॉस्पिटल उभं आहे. तोपर्यंत दीड लाख पॉझिटिव्ह केसेसची नोंद झालेल्या पुण्यात बेड्सअभावी रुग्णांची परवड सुरु झाली होती.
पण व्यवस्था कोलमडली, डॉक्टर्स निघून जायला लागले, हॉस्पिटलच्या दारात बाऊन्सर्स बसू लागले तेव्हा मोठा लोकक्षोभ झाला. व्यवस्थापना बद्दल अनेक तक्रारी येऊ लागल्या.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ३ सप्टेंबरला या सेंटरमध्ये मृत्यू झाला आणि अनेक प्रश्न उभे राहिले. जम्बो सेंटरचं काम मिळालेल्या एजन्सीवर प्रशासनानं याचं खापर फोडलं आणि सगळी व्यवस्था नव्या एजन्सीकडे दिली.
"जे आम्हाला सांगितलं गेलं होतं त्या एजन्सीमार्फत की आम्ही पूर्णपणे तयार आहोत तुम्ही माणसं पाठवा. त्याप्रमाणे आम्ही पेशंट्स पाठवले. त्यासाठी आम्ही सगळी व्यवस्थाही केली होती. पण माहित नाही की त्या एजन्सीची कुठे चूक झाली.
आमच्या चौकशी कमिटीनं आता नोटीस देऊन त्यांच्यावर ॲक्शन करत आहेत. पण स्पेसिफिक एका केससाठी आपण सांगू शकत नाही की त्या केसमध्ये काय झालं. ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते व्हेंटिलेटरवर इथे आले होते. त्याची चौकशी सुरु आहे," पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि या कोविड सेंटरची जबाबदारी असणाऱ्या रुबल अगरवाल सांगतात.
या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कमांड सेंटरपर्यंत जाण्याची आम्हाला परवानगी मिळाली. आतमधल्या सगळ्या वॉर्ड्समध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कमांड सेंटरमधून सर्व व्यवस्थेवर नजर ठेवता येते.
आता सगळं सुरळीत झालं असल्याचा आणि कोणाचीही तक्रार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
पण संसर्गाच्या सहा महिन्यांनंतर सुरु झालेलं पुण्याचं हे जंबो हॉस्पिटल अद्यापही पूर्ण क्षमतेनं सुरु नाही. 400 ते 500 बेड्स आतापर्यंत कार्यान्वित आहेत. पण त्याची मूळ क्षमता 800 बेड्सपर्यंत असणं अपेक्षित आहे.
राज्य सरकारने 800 बेड्स कार्यान्वित करण्यासाठी आठवड्याभराची डेडलाईन दिली आहे. इथली क्षमता लवकरच वाढवली जाईल, पण त्याव्यतिरिक्त शहरासाठी असलेली 800 बेड्सची गरज त्यांनी विभागून पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावा आहे.
"आपण इथे 400 बेड तयार केले. त्याच्यासोबत 100 बेड दळवी हॉस्पिटलमध्ये केले. 300 बेड्स बाणेरच्या हॉस्पिटलमध्ये केले. त्यामुळे 800 बेड्सचं नियोजन आम्ही पूर्ण केलं. फक्त ते आम्ही तीन ठिकाणी वाटलेले आहे. ही फॅसिलिटी पण सुरु होईल. पण काय आहे की मॅनपॉवरची कमतरता आहे.
मागच्या आठवड्यात केरळ, हैद्राबाद तिथून आम्ही स्पेशल फ्लाईटनी, बसेसमधून लोक आणले. ICUमध्ये काम करणा-या नर्सेस तिथून बोलावल्या," असं रुबल अगरवाल म्हणतात.
या सेंटरच्या दर्शनी भागात एक चांगला उपक्रम पहायला मिळतो. इथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक कक्ष उभारण्यात आलाय.
या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटून जाई. नातेवाईकांना आपल्या व्यक्तीची तब्येत कशी आहे, हे समजत नसे.
जर कोणाचा मृत्यू झाला तर परिस्थिती अधिकच बिकट होई. पण आता या नव्या कक्षात टॅब ठेवले आहेत. नातेवाईक इथे बसून आत उपचार घेत असलेल्या रुग्णाशी बोलू शकतात. रुग्णाची परिस्थिती कशी आहे, हे स्वतः पाहू शकतात.
डॉ श्रेयांन्श कपाले हे या जम्बो कोव्हिड हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. त्यांच्यामते आता व्यवस्था सुरळीत झाली आहे पण पुणेकरांनी संयम दाखवणं गरजेचं आहे आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे.
"आताही मी बघतो की जवळपास 30 ते 40 टक्के पेशंट्स असे आहे की ज्यांचं सॅच्युरेशन बऱ्यापैक कमी झाल्यानंतर ते इथे येताहेत. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये काही न करता येण्यासारखीही परिस्थिती निर्माण झालेली असते. आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करतो पण अपयश ब-याच वेळेला या केसेसमध्ये पहायला मिळतं. कारण बऱ्यापैकी दुर्लक्षित आहेत लोक."
पण प्रश्न असा आहे की पुण्यात ज्या वेगानं आकडे वाढत गेले त्याचा अंदाज अगोदर का येऊ शकला नाही आणि नियोजन अगोदर का केले गेले नाही?
परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे दावे केले गेले आणि खाजगी हॉस्पिटल्सचे बेड्सही दिमतीला आहेत असं सांगितलं गेलं. तरीही बेड्स मिळवण्यासाठी हॉस्पिटल्सचे उंबरे कसे झिजवायला लागले, याच्या कहाण्या पुण्यात जागोजागी ऐकायला मिळतात.
शेखर मते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या मावशी आणि काकांसाठी बेड्स शोधत शहरभर फिरत होते. पण सिरीयस झालेल्या त्यांच्या नातेवाईकांना कसेबसे बेड्स मिळाले.
"आम्ही सकाळी 11च्या सुमारास बेड्स शोधायला सुरुवात केली आणि रात्रीपर्यंत शोधत होतो. अनेक हॉस्पिटल्समध्ये गेलो. कुठे बेड्सच नव्हते, तर कुठे बेड्स होते पण ऑक्सिजन सप्लाय नव्हता. परिस्थिती बिकट झाली होती. शेवटी मावशीला जम्बो हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला तर काकांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये," शेखर मते सांगतात. पण असे अनुभव कित्येकांचे आहेत.
अजूनही परिस्थिती काही वेगळी नाही. ऑनलाईन डॅशबोर्डवर तयारीचे आकडे मोठे दिसत असले, तरीही उपलब्ध क्रिटीकल बेड्सचे आकडे कमी होत चालले आहेत. पुण्यात ICU बेड्सची वानवा स्पष्टपणे दिसते आहे.
ही बातमी लिहिताना आता 'कोव्हिड केअर सेंटर'च्या सरकारच्या डॅशबोर्ड वेबसाईटप्रमाणे पुणे शहरात 4746 बेड्स उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये केवळ 31 व्हेंटिलेटरसहित ICU बेड्स आहेत. जिल्ह्यात असे 75 व्हेंटिलेटर ICU बेड्स आहेत. हे आकडे कमी-जास्त होत राहतात.
एकूण 800 बेड्स पूर्ण केल्याचं पालिका सांगत असली तरीही शिवाजीनगरचं हे जंबो हॉस्पिटल अर्ध्याअधिक क्षमतेवर अडलं आहे. ससूनसारखं सरकारी हॉस्पिटल 450 बेड्सवर अडलं आहे. केवळ पिंपरी चिंचवडचं जंबो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरु आहे.
सरकार खाजगी हॉस्पिटलवर नको इतकं अवलंबून आहे. मुंबई आणि दिल्लीसारखी शहरं मे महिन्यात जम्बो हॉस्पिटल्स उभारत होती, पण पुणं जणू आपत्तीची वाट पाहत राहिलं.
सिद्धार्थ शिरोळे पुण्याच्या शिवाजीनगरचे आमदार आहेत. पहिल्यापासून ते सरकारला कोरोनासंदर्भातल्या प्रश्नांवर पत्र लिहित होते, समाजमाध्यमांवरही लिहित होते.
"मी असं नाही म्हणत की आपण हे मेमध्ये उभारलं असतं तर परिस्थिती वेगळी असली असती. मेमध्ये आपल्याकडे अगोदर ठरवलेले अग्रकम आहेत. आपण मुंबईत केलं आहे. आपल्याला माहिती आहे की काय चांगलं चालतं आहे, काय चालत नाही. या सगळ्या अनुभवाचा वापर इथे करण्यामध्ये कमी झाला," शिरोळे म्हणतात.
"पहिलं म्हणजे जंबो कोव्हिड सेंटर्स पाहिजेत हा विचार करण्यामध्येच दोन अडीच महिन्यांचा उशीर झाला. त्यानंतर तो 800 बेड्सचा करायचा की 400 बेड्सचा करायचा.
आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सगळ्यात चांगलं चालणारं हॉस्पिटल आहे. 400 बेड्स त्यांच्याकडे आहेत. हा काही छोटा आकडा नव्हे. आपण प्लॅन करताना 800 केलं. ते करतानाच 300-350 असं केलं असतं तर व्यवस्थापनाला सोपं पडलं असतं. पण तरीही 800चं केलं. त्यावेळेस निविदा करतांना, एक तर उशीरा निविदा, त्यात करताना घाई.
"तुम्ही लवकर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची घाई केली हे मान्य. पण त्याबरोबर त्यांना 800 पेशंटसवर उपचार करताना जे पूर्वीचे अनुभव आहेत त्याचा काय उपयोग केला? ते काही दिसत नाही.
आज ते सेंटर होऊन एक महिना झाला. तरीही केवळ 50 टक्केच क्षमता कार्यान्वित आहे. रिस्क कशी आहे तर, तुम्ही बांधून तर ठेवलं आहे. तुम्हाला चालवता तर येत नाहीये. वाढवण्याची घाई करु शकत नाहीत कारण तिथे क्रिटीकल पेशंट्स आहेत. मृत्यूदर आपण वाढवू शकत नाही," शिरोळे पुढे म्हणतात.
पुण्याची स्थिती गंभीर बनल्यापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सतत शहरात येत असतात. त्यांच्यामते जेव्हा निर्णय घ्यायचे तेव्हा ते तातडीनं घेतले गेले, पण काही प्रश्न शहराच्या बाबतीत आहेत.
ससूनसारखं सरकारी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने वापरलं गेलं नाही, काम दिलेल्या एजन्सीनं व्यवस्थित काम केलं नाही आणि मुख्य म्हणजे आवश्यक असणाऱ्या डॉक्टर्सची कमी-जास्त होणारी संख्या ही काही महत्वाची कारणं आहेत.
"पुण्याचा मायनस पॉईंट असा आहे की सरकारी बेड्स कमी दिसतात, परंतु प्रायव्हेट बेड्स खूप आहेत हा प्लस पॉइंट आहे आणि प्रायव्हेट बेड्स 80 टक्के ताब्यात घेतले आहेत किंवा तसं धोरण घेतलं आहे. मग चुकतंय कुठं की प्रशासन तिथलं जे आहे त्यांनी अॅग्रेसिव्हली तिथं जाऊन प्रायव्हेटचे बेड्स ताब्यात घेतले पाहिजेत.
त्यामुळे मी स्वत: प्रायव्हेट हॉस्पिटल्सची मीटिंग घेतली. सगळ्या हॉस्पिटल्सना मी बोलवलं होतं. त्यांना विनंती केली की तुमच्याजवळ जर ICU बेड्स 100 उपलब्ध आहेत तर तुम्ही सरकारला 5-10 देणार? 80 द्यायला पहिजे," राजेश टोपे 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले.
पण पुण्यावर केवळ या एकट्या शहराचा वा जिल्ह्याचा ताण येत नसून पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतून लोक इथे येत असल्याने परिणामी इथले बेड्स कमी पडत असल्याचं आरोग्यमंत्री टोपे आणि पुण्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचंही मत आहे.
"पुण्याचा एक मायनस पॉईंट लक्षात घ्या, सगळ्यात मोठा. पुणे हे फक्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. सातारा, सांगली, नगर, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यांमधले पेशंट्स हे पुण्यातच येतात. त्यामुळे पुण्याची क्षमता कितीही वाढवली तरी 35 ते 40 टक्के बेड्सवर असलेले पेशंट्स, हे या जिल्ह्यांमधले आहेत. त्यामुळे पुण्यात क्षमता वाढवली जाते आहे. पण बाहेरच्या जिल्ह्यातले पेशंट्स येत असल्यामुळे ती क्षमता कमी पडते," राजेश टोपे म्हणतात.
दुसरीकडे पुण्याचा कोरोनाचा आलेख देशातल्या इतर कोणत्याही शहर आणि जिल्ह्यापेक्षा अधिक वेगानं वर चढतोय. 9 मार्चला पहिल्या रुग्णाची नोंद झाली तरीही जूनपर्यंत पुण्याचे आकडे संयमाचे म्हणता येतील.
पण जूननंतर संयम सुटला आणि सप्टेंबरपर्यंत पुणे अडीच लाखाच्या पुढे गेलं. पण असं का झालं?
लॉकडाऊन शिथिल केला गेला, गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका निघाल्या नसल्या तरी पुण्याच्या रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणं ही शिस्त पाळली गेली नाही अशी काही कारणं लगेच समोर येतात.
पण इतर शहरांपेक्षा इथं वेगानं संसर्ग व्हायचं काही कारण असावं का? राज्याचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांच्यामते पुण्याच्या हवामानाचंही या संसर्गामागे कारण असावं.
"पुण्याचं जे वातावरण आहे ते 'स्वाईन फ्लू'च्या साथीवेळेस पण पाहिलेलं आहे. ते या प्रकारच्या विषाणूच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण आहे. पुण्याचा जो मान्सूनच्या पावसाचा जो पॅटर्न आहे, इथलं किमान आणि कमाल तापमानातला जो फरक आहे हे सगळं पाहता पुण्याचं वातावरण या प्रकारच्या विषाणूंच्या वाढीकरता पोषक आहे. मला असं वाटतं आहे की त्याचाही परिणाम होतो आहे पुण्यामध्ये," डॉ आवटेंनी 'बीबीसी मराठीशी बोलतांना सांगितलं.
पण त्यासोबतच पुणे देशात दर दहा लाखांच्या लोकसंख्येमागे सर्वाधिक टेस्ट करणारं शहर आहे, म्हणून इथले आकडे मोठे दिसतात असंही त्यांना वाटतं. एकट्या पुण्यानं आतापर्यंत 6.5 लाख टेस्ट्स केल्या आहेत.
"दुसरा एक भाग असतो की रिपोर्टिंग बायस किंवा सर्व्हेलन्स बायस. पुण्यात NIV आहे. आपण जर पाहिलं तर 'स्वाईन फ्लू'ची पहिली केस पुण्यानं रिपोर्ट केली आणि कोव्हिडचीसुद्धा पहिली केस पुण्यानं रिपोर्ट केली. त्याच्यानंतर बाकी सगळीकडे सुरु झालं. याचं कारण एकच असतं की जेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात तेव्हा सर्वेक्षण हे अधिक चांगल्या पद्धतीनं होत राहतं.
आता तुम्ही जर पाहिलं तर राज्यात दर दशलक्ष लोकसंख्येमागं जवळपास 95000 टेस्ट पुणे करतं आहे. हे मुंबईपेक्षापण जास्त आहे," डॉ. आवटे पुढे म्हणतात.
पुण्याचा कोरोनाच्या आकड्यांचा पीक आला का, तो कधी येईल, कर्व्ह सपाट कधी होईल असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण त्यामुळे लढा थांबणारा नाही. पुण्याचा लढा वेळेशी आहे. पहिला काळ जरी हातून निसटला तरी आहे तो सार्थकी लावणे अत्यावश्यक आहे. कोरोना लढ्यात पानिपत होणे पुण्याला परवडणारे नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)