You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांचा टोला, रामदास आठवलेंचा एक तरी आमदार आहे का? #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. रामदास आठवलेंचा एक तरी आमदार आहे का? - शरद पवारांचा टोला
रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? खासदार आहे का? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवलेंना कोणीही गांभीर्यानं घेत नाही असा टोला लगावला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीने एनडीएमध्ये यावं असा प्रस्ताव मांडला होता. त्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवारांनी आठवलेंच्या एनडीएमध्ये येण्याचा प्रस्तावावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, "रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही".
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
शरद पवार यांनी यावेळी सुशांत प्रकरणावरुन टीका करताना सीबीआयने आतापर्यंत काय दिवे लावले आहेत हे मला अजून दिसलेलं नाही, अशी टीकाही केली.
2. सुशांत प्रकरणी बिहार निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राची बदनामी- अनिल देशमुख
बिहारमधली निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या शरीरात विषाचा अंश नाही, असं एम्सच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र तरीही मुंबई पोलिसांची नाहक बदनाम करण्यात आलं. बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एका राष्ट्रीय पक्षानं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
दरम्यान आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपाने केलेले हीन पातळीवरचे राजकारण उघडे पडले आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येचे भांडवल करून महाराष्ट्र, मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची बदनामी करणाऱ्या भाजपचे तोंड एम्सच्या अहवालामुळे काळे झाले असून भाजप आणि मोदी सरकार मधील या षडयंत्रामागचे मास्टर माइंड कोण आहेत, याचा तपास आता सीबीआयने करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
3. ही भाषा योग्य आहे का? - उच्च न्यायालयाचा संजय राऊतांना सवाल
अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
संजय राऊत यांनी एका मुलाखतीत कंगनाचा उल्लेख 'हरामखोर लडकी' असा केला होता. यावर न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. तसेच राऊत यांच्या वकिलाला तुम्हाला हे बरोबर वाटते का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही देखील कंगनाच्या मुंबईविषयीच्या मताविषयी सहमत नाही, पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का? असा प्रश्ना न्यायालयाने विचारला.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. कथावल्ला आणि न्यायमूर्ती आर. आय. चगला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (29 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सर्वच पक्षांनी आपली बाजू मांडली.
4. मराठा समाजाला EWS चे आरक्षण नको, संभाजीराजेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता.
मात्र असं केल्यास कोर्टात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील नेत्यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक निकषावर आरक्षण नको, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना दिली. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरच आरक्षण हवे, अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसह मराठा क्रांती मोर्च्याचे काही नेते आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी EWS मध्ये मराठ्यांना आरक्षण न देण्याच्या सूचना देण्यात येतील, असा शब्द दिल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं.
5. उत्तर प्रदेशमधील जंगलराजनं आणखी एका तरुणीचा बळी घेतला- राहुल गांधींची टीका
उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 20 वर्षीय दलित युवतीचा दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
14 सप्टेंबरला आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असताना या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर कठोर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं की, उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजनं आणखी एका तरूणीला मारून टाकलं.
"सरकारनं ही फेक न्यूज आहे, असं म्हणत पीडितेला मरण्यासाठी सोडलं. मात्र ही दुर्दैवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यू आणि सरकारचा निर्दयीपणाही खोटा नव्हता," असं राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं. आज तकनं ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)