You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली उदयन राजेंच्या बहिणीची भेट #5मोठ्याबातम्या
वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मराठा आरक्षणाच्या मुदयावर संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार?
खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी संभाजीराजे यांनी उदयनराजे यांच्या बहीणीची भेट घेतली. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. पण या संघटनांमध्येही नेतृत्त्वावरून वाद असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी मनिषाराजे यांची भेट घेतल्याचे समजते.
मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्यासाठी काही जबाबदाऱ्या ठरवायच्या असतील तर निश्चित करू असंही ते म्हणाले.
3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंथन बैठक होणार आहे. यासंबंधी चर्चेसाठी आमदार विनायक मेटे यांनी नुकतीच सातारा येथे उदयनराजे यांची भेट घेतली होती. "मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर, सगळेच आरक्षण रद्द करा." असे वक्तव्य यावेळी उदयनराजे यांनी केले होते.
2. राजपूत समाजाला सरसकट आरक्षण द्या', राजपूत महामोर्चाची मागणी
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात आंदोलन सुरू असताना आता सरसकट राजपूतांनाही आरक्षण द्यावे अशी मागणी राजपूत महामोर्चाकडून करण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरला राजपूत समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. झी 24 तासने ही बातमी दिली आहे.
राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी, 'मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा सर्वांचे आरक्षण रद्द करा.' या उदयनराजेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
प्रत्येक धर्मासाठी वेगळे कायदे आणि नियम असलेले संविधानही बदला अशीही मागणी सेंगर यांनी केलीय.
3. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा इशारा
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज (29 सप्टेंबर) आणि उद्या (30 सप्टेंबर) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अॅग्रोवनने ही बातमी दिली आहे.
आंध्र प्रदेशात चक्रवाताची शक्यता असल्यानेही महाराष्ट्रात काही भागांत दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील.
राज्यात अद्याप परतीच्या पावसाला सुरूवात झालेली नाही. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भात ब्रम्हपूरी येथे 34.1 सेल्सियस तापामानाची नोंद करण्यात आली आहे.
4. कृषी विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचे आत्मनिर्भर शेतकरी अभियान
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून मोहीम सुरू केली जाणार आहे. भाजप ग्रामीण भागात घरोघरी जाऊन 'आत्मनिर्भर शेतकरी' हे अभियान राबवणार आहे. हिंदुस्थान टाईम्सने ही बातमी दिली आहे.
कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी भाजपने नव्या कायद्याच्या जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन करून अभियान राबवले जाईल असेही सांगण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी सांगितले, "विरोधी पक्ष राजकीय हेतूने विधेयकाबद्दल खोट्या आणि मूर्खपणाच्या अफवा पसरवत आहेत."
नवीन कृषी विधेयकानुसार शेतकऱ्यांना बाजारपेठेत व्यापक प्रवेश मिळत असला तरी एमएसपी आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वार राहणार आहेत. अशीही माहिती सिंह यांनी दिली.
5. भारतातील कोरोना लशीची ताजी माहिती देण्यासाठी सरकारचे वेबपोर्टल
कोरोना लशीची अद्ययावत माहिती, वैद्यकीय नोंदणी आणि अपडेट्स देणारे पोर्टल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले आहे. https://vaccine.icmr.org.in/ असे या पोर्टलचे नाव आहे.
मिंट वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
भारतातील लशीसंदर्भात सर्व माहिती या ऑनलाईन पोर्टलवर असेल असे इंडियन कॉऊंसील ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
याविषयी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी सांगितले, "या पोर्टलवर कुणीही ऑनलाईन जाऊ शकेल. कोरोना लशीसंदर्भात सुरू असलेले प्रयोग, ट्रायल्स, संशोधन याविषयी सर्व माहिती उपलब्ध असेल."
कोरोना आरोग्य संकटाबाबत बोलताना डॉ.वर्धन पुढे म्हणाले, "भारतात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच मृत्यू दरही कमी होतोय. हे यश सर्व राज्यांचे आहे. 1 लॅब ते 1800 हून अधिक लॅब्सपर्यंतची क्षमता आपण वाढवली आहे. कोरोनाच्या टेस्टही वाढवल्या असून आता दिवसाला 15 लाख टेस्ट केल्या जातात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)