अजित पवार: 'कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नाही' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी नाही - अजित पवार

"कृषी विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले असले तरी ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. हे विधेयक लागू करण्याची इतकी घाई का? कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कृषी विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

"कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे या विधेयकाची अंमलबजावणी राज्यात करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही. त्यामुळे कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील, तसंच संसदेच्या विधेयकांची अंमलबजावणी न केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात. या निर्णयाविरोधात कुणी न्यायालयात गेलं तर काय होईल, याचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाईल," असं अजित पवार म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

दरम्यान, कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. 'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है, असं वक्तव्य राणे यांनी केलं आहे.

2. देशात कोरोना संपला का? - संजय राऊत

देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.

"देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या भीतीने विधिमंडळ आणि संसदेलाही अधिवेशन गुंडाळावं लागलं. एक मंत्री आणि तीन खासदारांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचं कारण काय? देशात कोरोना संपला आहे का? तसं असेल तर एकदाचं जाहीर करून टाका," अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

निवडणुका घेण्यास सध्याची परिस्थिती योग्य आहे किंवा नाही, याबाबत विचार करण्याची गरज होती, असंही राऊत म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. CSMT च्या खासगीकरणाची तयारी सुरू

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचं खासगीकरणाबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकाचा ताबा घेण्यात अदानी समूह तसंच टाटा समुहाने रस दाखवला आहे.

CSMT च्या खासगीकरण संदर्भात चर्चेसाठी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली होती. तिथं याबाबत चर्चा झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

नीती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेशाकील या बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव उपस्थित होते. तसंच बैठकीत अदानी समूह, टाटा प्रोजेक्ट्स, जीएमआर, एल्डेको, जेकेबी इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी आणि एस्सेल समुहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. मातांचा आवाज 'मातोश्री'पर्यंत कधी पोहोचणार? - चित्रा वाघ

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेली तरुणी गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी दाखल तरूणीचा गेल्या 27 दिवसापांसून घरच्यांशी संवाद नाही. सदर मुलगी घरीदेखील परतली नाही, असं सांगत मुलीची आई कोव्हिड सेंटरबाहेर उपोषणास बसली आहे.

या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

'माझं कुटुंब, माझी जबाबदारी', असं मुख्यमंत्री म्हणतात, मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमधून गायब झालेल्या लेकीसाठी तिची माय आर्त हाक देत आहे. अशा कित्येकींचा आवाज 'मातोश्री'पर्यंत कधी पोहोचणार?," असा सवालही वाघ यांनी केला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. दीक्षाभूमीवरील धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा कोरोनामुळे रद्द

कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण साधेपणानं साजरे झाले. त्याचप्रमाणे धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही यावर्षी रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील तसेच नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहून सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीने दिली. टीव्ही 9 मराठीने याबाबत बातमी दिली आहे.

दरवर्षी 14 ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात. 14 ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असते. पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द केला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)