IPL 2020: सॅमसन. आर्चरच्या तुफान फटकेबाजीसमोर चेन्नई निष्प्रभ

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चेन्नईच्या लुंगी एन्गिडीने फेकलेल्या शेवटच्या ओव्हरचं हे विश्लेषण चेन्नईची अवस्था सांगणारं आहे. सिक्सेस आणि फोरची पर्वणी ठरलेल्या लढतीत राजस्थानने 216 रन्स केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईने उशिरा प्रतिकार सुरू करत 200 धावांची मजल मारली.

राजस्थानच्या रॉयल्सच्या धुलाईत चेन्नई सुपर किंग्सचा अक्षरक्ष: पालापाचोळा झाला. संजू सॅमसनची 32 बॉलमध्ये 74 धावांची वादळी खेळी, स्टीव्हन स्मिथच्या संयमी 69 रन्स आणि शेवटी जोफ्रा आर्चरने 8 बॉलमध्ये केलेल्या 27 रन्स यांच्या बळावर राजस्थानने 216 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने नियमित विकेट्स गमावल्या आहेत.

संजू सॅमसनने घरच्या मैदानावर खेळावं इतक्या सहजतेने खेळताना चेन्नईच्या बॉलर्सची विशेषत: पीयुष चावलाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. संजूने 1 फोर आणि 9 सिक्सेस लगावत 32 बॉलमध्येच 74 रन्स कुटल्या. संजू आऊट झाल्यावर राजस्थानची घसरगुंडी उडाली. पण स्मिथने एक बाजूने नांगर टाकला. त्याने 4 फोर आणि 4 सिक्ससह 69 रन्स केल्या. डावाच्या शेवटी येत आर्चरने एन्गिडीच्या बॉलिंगची वाताहत केली.

शेवटच्या ओव्हरमध्ये आर्चरने दोन खणखणीत सिक्स लगावले. पुढचे दोन बॉल नोबॉल पडले, त्यावरही आर्चरने सिक्स लगावले. त्यापुढचा बॉल वाईड गेला. अशाप्रकारे 2 अधिकृत बॉलवर 27 रन्स चोपल्या. त्यानंतर मात्र एन्गिडीने आर्चरला एकेरी धावांतच रोखलं. या ओव्हरमध्ये एकूण 30 रन्स निघाल्या.

चेन्नईकडून शेन वॉटसन-मुरली विजय जोडीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन आऊट होताच चेन्नईच्या घसरणीला सुरुवात झाली. विजय, सॅम करन, पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड कोणीच मोठी खेळी करू शकले नाहीत. परंतु फॅफ डू प्लेसिसने 37 बॉलमध्ये 72 रन्सची खेळी करत चेन्नईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. फॅफ आऊट झाल्यानंतर धोनीने फटकेबाजी केली परंतु ती पुरेशी ठरली नाही. राहुल टेवाटियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली.

युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो पहिली मॅच खेळू शकला नव्हता. मात्र आता तो कोरोनातून पूर्णपणे बरा झाला आहे.

सलामीच्या लढतीत दमदार अर्धशतक करणारा अंबाती रायुडू पूर्ण फिट नसल्याने ऋतुराजच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)