You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: धोनीसेनेत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संधी
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी (22 सप्टेंबर) मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली आहे.
युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो पहिली मॅच खेळू शकला नव्हता. मात्र आता तो कोरोनातून पूर्णपणे बरा झाला आहे.
सलामीच्या लढतीत दमदार अर्धशतक करणारा अंबाती रायुडू पूर्ण फिट नसल्याने ऋतुराजच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.
मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.
इंडिया ए साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या.
गेल्या वर्षीच्या लिलावात चेन्नईने ऋतुराजला संघात समाविष्ट केलं मात्र त्याला अंतिम अकरात संधी मिळू शकली. सुरेश रैनाने माघार घेतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळेल अशी चर्चा होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण करत असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)