IPL 2020: चहल, सैनीची किमया; कोहलीसेनेची विजयी सलामी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

एक तप खेळूनही जेतेपदापासून वंचित राहलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरू संघाने आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. त्यांनी हैदराबादला दहा रन्सनी नमवलं.

देवदत्त पड्डीकल, एबी डीव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळी आणि युझवेंद्र चहलचा भेदक मारा या विजयाचं वैशिष्टय ठरलं.

बेंगळुरूने 163 धावांची मजल मारली. जॉनी बेअरस्टोच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर हैदराबाद ही मॅच जिंकणार असं चित्र होतं मात्र बेअरस्टो आऊट झाला आणि हैदराबादची घसरगुंडी उडाली.

डावाच्या सुरुवातीला बेअरस्टोने मारलेला जोरदार फटका उमेश यादवच्या हाताला लागून स्टंपवर आदळला आणि डेव्हिड वॉर्नरला तंबूत परतावं लागलं.

बेअरस्टो आणि मनीष पांडे जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 71 रन्सची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने मनीष पांडेला चकवलं. त्याने 34 रन्सची खेळी केली. तीन जीवदानांचा फायदा उठवत 61 रन्सची खेळी केली.

16व्या ओव्हरमध्ये चहलने बेअरस्टोला आऊट केलं आणि त्यानंतर हैदराबादने 32 रन्समध्ये 8 विकेट्स गमावल्या. चहलने तीन तर नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी पदार्पणवीर देवदत्त पड्डीकल आणि अनुभवी एबी डीव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर बेंगळुरूने 163 रन्सची मजल मारली.

देवदत्तने पहिल्या लढतीचं दडपण न घेता 42 चेंडूत 8 चौकारांसह 56 रन्सची खेळी केली. 10 ओव्हरमध्ये बिनबाद 90 अशी सुस्थितीतून 2 बाद 90 अशी अवस्था झाली. रनमशीन विराट कोहलीला लौकिकाला साजेशा खेळ करता आला नाही.

नटराजनने कोहलीला 14 रन्सवर आऊट केलं. डीव्हिलियर्सने सगळा अनुभव कामी आणत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 30 चेंडूत 51 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. सनरायझर्सतर्फे नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)