अनुराग कश्यप : 'उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं' #5मोठ्याबातम्या

अनुराग कश्यप

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं - अनुराग कश्यप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईत सुरक्षित वाटतं, असं मत सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"मी कुणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच सुरक्षित वाटतं. इथे मी माझे मत खुलेपणाने मांडू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टी बदलल्या आहेत. ते पाहून शिवसेनेबद्दलचं माझं मत पूर्ण बदललं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत नसेलही पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं," असं अनुराग कश्यप म्हणाला.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त करत मुंबईला 'पाकव्याप्त कश्मीर' आणि 'पाकिस्तान'ची उपमा दिली होती. मुंबई सुरक्षित नसल्याचेही विधान तिने केले होते.

कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपलं मुंबईवर प्रेम असल्याचे ट्वीट केलं होतं.

2) कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं

केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे अधिकार मर्यादित करणारे विधेयक संसदेत मांडले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या संप करण्याचा अधिकारावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

तसंच, 300 हून कमी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना नवीन भरती किंवा कर्मचारी कपात करताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

संसद

फोटो स्रोत, Getty Images

नवीन बदलांसह 'दि इंडस्ट्रिअल रिलेशन्स कोडबिल 2020' शनिवारी (19 सप्टेंबर) संसदेत सादर करण्यात आले. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी हे विधेयक मांडले. या इंडस्ट्रिअल रिलेशन्स कोडबिलनुसार आता कंपन्यांच्या अधिकारात वाढ होणार आहे. पूर्वी 100 कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना नोकर भरती आणि कपातीचा अधिकार होता. ही मर्यादा वाढवून आता 300 एवढी करण्यात आली आहे.

औद्योगिक कंपनीतील कर्मचारी 60 दिवसआधी नोटीस दिल्याशिवाय संप करू शकणार नाहीत. सार्वजनिक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही संप करण्यापूर्वी नोटीस देण्याचा कालावधी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी करणारे विधेयक म्हणून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

3) 'अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, हे विधान गृहमंत्र्यांच्या तोंडी कुणी टाकले?'

"भाजपचे लोक महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. ते आज-उद्याही करतील. पण राज्यातील बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तोंडी असे विधान टाकण्याचे धाडस केले कुणी?" असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून विचारण्यात आला आहे.

'सरकार कोण पाडतंय? अस्तनीत निखारे आहेतच' या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख छापण्यात आला आहे.

"गृह खात्यातील बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते हे विधान आपण बोललोच नाही असे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. मग त्यांच्या तोंडी हे विधान कुणी टाकले? ज्यांनी हे काम केले तेच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत," असा थेट आरोप 'सामना'तून करण्यात आला आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

"अधिकाऱ्यांमुळे सरकार जाऊ शकते असे जर एखाद्या मंत्र्याला वाटत असेल तर सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे असे जनतेला वाटू शकते," असंही अग्रलेखात म्हटलंय.

"सरकार कोण पाडणार यापेक्षा, काहीही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभभूतीदार कोण, हे महत्त्वाचे. असे अधिकारी गुप्त माहिती विरोधकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणे ही गृहखात्याची जबाबदारी आहे," असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

4) कंगनाकडून शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कंगनाने या आंदोलकांना 'दहशतवादी' म्हटले आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

कृषी विधेयावरुन पंजाब आणि हरयाणात आंदोलन चिघळले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार असून शेतीमालाची खरेदी सरकार करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

या ट्वीटला रिट्विट करत कंगना राणावत म्हणाली, "पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहेत त्यांना जागे करता येईल. पण जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना कसे जागे करणार? तुम्ही कितीही समजवून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले गेले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीचे नागरिकत्व कायद्याने हिरावले गेले नाहीय."

5) व्यसनी पित्याने पोटच्या मुलाला पाच लाखांत तृतीयपंथाला विकले

लॉकडॉऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला. घरी येणारा पैसा बंद झाला. अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये कर्जबाजारी झालेल्या व्यसनी बापाने आपल्या पोटच्या मुलाला पाच लाखांत विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

बालकाच्या आजीने चाईल्ड लाईनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बालकाला जिल्हा संरक्षण कक्षाकडे स्वाधीन केले आहे.

गंगावेशमध्ये दिंगबर पाटील आपली मनोरुग्ण पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. घरची परिस्थिती बिकट असल्याने आणि दिंगबर व्यसनी असल्याने आनंदी चौगुले यांनी आपल्या मुलीला दोन्ही नातवांसह मे महिन्यात आपल्या घरी माजगाव,पन्हाळा येते नेले.

पण आजीचीही परिस्थिती बिकट असल्याने 12 वर्षाच्या मुलाला त्यांनी त्याच्या वडिलांकडे सोडले. महिना झाला तरी मुलाचा काहीही संपर्क नसल्याने चौकशी केली असता मुलाला एका तृतीयपंथाकडे सांभाळण्यास दिल्याचे समोर आले. मुलाच्या बदल्यात पाच लाख रुपयांचा व्यवहार करून स्टॅम्प पेपरवर मुलाला दत्तक घेतल्याचे पोलीसांनी सांगितले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)