कोरोनाः 'लॉकडाऊनमुळे पाच महिने उत्पन्न बंद राहिलं, अजून वाट पाहण्यापेक्षा ऑनलाइन ट्रेनिंग सुरू केलं'

फोटो स्रोत, Krishna das
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना फटका बसला. फिटनेस इंडस्ट्री त्यांपैकीच एक.
आर्थिक गरजांचा विचार करत टप्प्याटप्प्यानं काही नियम लागू करत अनेक गोष्टी अनलॉक करायला सुरूवात झाली. पण अजूनही अनेक राज्यांत जिम, योगा क्लासेस, फिटनेस स्टुडिओ किंवा ट्रेनिंग सेंटर्स सुरू झाले नाहीत.
महाराष्ट्रातही याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही. गेले पाच महिने उत्पन्नाचं साधन बंद ठेवल्यानंतर आता हातावर हात ठेवून बसून राहता येणार नाही, याची जाणीव झाली आणि काही जणांनी या संकटाचं रुपांतर संधीत कसं करता येईल याचा विचार करायला सुरूवात झाली.
आपल्यापर्यंत क्लायन्ट येऊ शकत नसले, तरी आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचे नवीन मार्ग शोधून पुन्हा एकदा नव्या उर्जेनं सुरुवात करणाऱ्यांपैकी एक आहेत कृष्णा दास.
रुईया कॉलेजमधल्या जिमखान्यामध्ये कृष्णा दास बॉक्सिंगचं ट्रेनिंग देतात. केडीज बॉक्सिंग अॅकॅडमी या त्यांच्या क्लबमध्ये बॉक्सिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. पण लॉकडाऊनमुळे बॉक्सिंग क्लब बंद करावा लागला. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झाला. सुरूवातीला 21 दिवसांसाठी लावलेला लॉकडाऊन लांबतच गेला.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

उत्पन्नाचं साधन बंद आणि जवळचं सेव्हिंग संपत आलेलं असताना क्लब सुरू करणं आवश्यक होतं. मुंबईतला कोरोनाचा वाढता संसर्ग, सरकारचे यासंबंधीचे नियम यामुळे हे शक्य होईल, असं वाटत नव्हतं. अशावेळी कृष्णा दास यांनी ऑनलाइन ट्रेनिंगचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला. पण बॉक्सिंगसारख्या बॉडी कॉन्टॅक्ट गेममध्ये, जिथे प्रतिस्पर्धी समोर असताना सराव करणं फायदेशीर असतं, तिथे ऑनलाइनचा ऑप्शन व्यवहार्य ठरणार का, अशी शंका होतीच.
याबद्दल बोलताना कृष्णा दास यांनी म्हटलं, "लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उत्पन्नाचा सगळा स्रोत बंद झाला. एक-दोन महिने लॉकडाऊन उठेल म्हणत वाट पाहिली. पण हे लांबतच चाललंय हे लक्षात आल्यानंतर ऑनलाइन क्लासेसचा पर्याय आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही महिने त्यासंबंधीचा अंदाज घेण्यात गेले. मग त्याची तशी प्रसिद्धी केली आणि मग तीन ऑगस्टपासून ऑनलाइन ट्रेनिंग सुरू केलं."
सध्या कृष्णा यांच्या अॅकेडमीमध्ये 34 विद्यार्थी आहेत.
सर्वकाही सुरळीत असताना कृष्णा यांच्या बॉक्सिंग क्लबमध्ये 80 ते 90 मुलं ट्रेनिंग घेत होती. ऑनलाइन कोचिंगमध्ये ही संख्या जवळपास निम्म्यावर आली आहे. बॉक्सिंग क्लबची सुरूवात आणि अनपेक्षितपणे ट्रेनिंगला लागलेला ब्रेक या प्रवसाबद्दल कृष्णा दास यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Krishna Das
"1996 मध्ये मी रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी माझ्या एक-दोन बॅचमेट्ससोबत बॉक्सिंग खेळायचो. माझे वडीलही बॉक्सर होते. मी स्वतः स्टेट कॅम्प, वेस्टर्न इंडिया टूर्नामेंटमध्ये खेळलो होतो."
त्यांचं खेळणं पाहून तुम्ही कोचिंग का सुरू करत नाही, ही विचारणा करण्यात आली.
"2000 पर्यंत आमची चांगली टीम झाली. स्टेट चॅम्पियनशिपसाठीही आमच्या क्लबचे खेळाडू खेळले होते."
लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधी कृष्णा दास यांच्या क्लबमध्ये तीन बॅचेस सुरू होत्या. पंधरा वर्षांखालच्या मुलांची एक बॅच आणि मोठ्या मुलांच्या दोन बॅचेस. या तिन्ही बॅचमध्ये मिळून 80 ते 90 मुलं ट्रेनिंग घेत होती.
"क्लबची फी एक हजार रुपये आहे. रजिस्ट्रेशन फी दोन हजार रुपये. 50 टक्के रक्कम कॉलेजला जाते आणि 50 टक्के आम्हाला. त्याच रकमेतून ग्लोव्हज, वेट ट्रेनिंगचं सामान आणावं लागतं. वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च हा केवळ ग्लोव्हजवरच होतो. एकूण मेन्टेनन्सचा खर्च हा लाख ते दीड लाख रुपये आहे."
ऑनलाइन ट्रेनिंगमध्ये या गोष्टी कशा बदलल्या आहेत, त्याबद्दल कृष्णा दास यांनी सांगितलं, की आता आम्ही सहाशे रुपये फी घेतो. आता इक्विपमेंट्सचा खर्च नाहीये. शिवाय आधी जी सहा-सात जणांची टीम होती ती आता तिघांची झाली आहे.
"बॉक्सिंग हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे. त्यामुळे ऑनलाइन ट्रेनिंगवर मर्यादा येतात. पण मुलांचा फिटनेस टिकून राहण्याच्या दृष्टिनं हे प्रशिक्षण महत्त्वाचं ठरू शकतं. शिवाय त्यांची प्रॅक्टिसची सवयही मोडत नाही."
लॉकडाऊनचे पाच-सहा महिने खरंच खूप त्रासात गेले. जे सेव्हिंग होतं त्यावरच भागवावं लागलं. आताही विद्यार्थी कमी, फी कमी यामुळे उत्पन्नही निम्म्यावर आलं आहे. पण किती दिवस थांबणार ना? असं म्हणत कृष्णा दास यांनी सध्या तरी ऑनलाइनलाही रिस्पॉन्स चांगला मिळतोय, असं सांगितलं.
त्यांच्या ऑनलाइन ट्रेनिंगच्या दोन बॅचेस सुरू आहेत. अगदी सातारा, नंदुरबार, नाशिक, नांदेडमधूनही विद्यार्थींनी नोंदणी केली आहे.
पण बॉक्सिंगसारख्या खेळात ऑनलाइनचा पर्याय किती दिवस अवलंबणार हाही प्रश्न आहे.
'नोव्हेंबरपर्यंत तरी ट्रेनिंग ऑनलाइनच'
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू असलेल्या आणि 2004 पासून ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षी उपाध्याय यांनीही सध्या ऑनलाइन ट्रेनिंगचाच मार्ग अवलंबला आहे.
वर्षा उपाध्याय यांनी 2004 साली प्रीमिअर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स अॅकेडमीची सुरुवात केली होती. दादर येथील समर्थ व्यायामशाळा, नंतर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन इथून सुरु झालेल्या या अॅकेडमीच्या आज दादर, अंधेरी तसंच ठाण्यातही बॅचेस सुरू आहेत.

फोटो स्रोत, Premierrhythmicgymnastics
गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यानच वर्षा उपाध्याय यांनी मुंबई विद्यापीठात जिम्नॅस्टिक्सच पहिलं एक्सलन्सी सेंटरही सुरू केलं. आणि वर्षभरातच कोव्हिडचा फटका बसला. एक्सलन्सी सेंटरसोबतच प्रीमिअर ऱ्हिदमिक अॅकेडमीच्या इतर ठिकाणच्या बॅचेसही बंद झाल्या.
मुंबईत कोव्हिडचा प्रादूर्भाव वाढायला लागला, तसं वर्षा यांनी क्लासेसना पंधरा दिवस सुट्टी दिली. पण कोरोनाचं संकट इतक्यात आटोक्यात येणार नाही, हे लक्षात आल्यावर मात्र वर्षा यांनी क्लासेस ऑनलाइन सुरू करण्याचा विचार केला.
अर्थात, जिम्नॅस्टिकसारख्या क्रीडा प्रकारात ऑनलाइन ट्रेनिंग किती शक्य आहे, मुंबईतल्या छोट्या घरात मुली हे ट्रेनिंग करू शकणार का असे प्रश्न होते. त्यामुळे त्यांनी अॅकेडमीतल्या सर्व प्रशिक्षकांची एक झूम मीटिंग घेऊन प्रशिक्षणाचा प्रोग्रॅम ठरवला. 25-30 मार्चच्या दरम्यान त्यांनी सीनिअर मुलींच्या बॅचपासून ऑनलाइन ट्रेनिंगला सुरूवात केली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांनी इतरही मुलींसाठीही ऑनलाइन बॅचेस सुरू केल्या.

फोटो स्रोत, Premierrhythmicgymnastics
"मुलींच्या शाळेच्या वेळा सांभाळून, घरातल्या लोकांच्या सोयीच्या वेळा ठरवण्यापासून छोट्या छोट्या अडचणी येत गेल्या. पण मुलींचा उत्साह खूप होता, त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या. शिवाय एरवी मुली क्लासला येतात, तेव्हा त्यांच्याशी शिकवण्यापुरता संबंध येतो. ऑनलाइन ट्रेनिंगमुळे आम्हाला थेट त्यांच्या घरात जायला मिळालं. कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले," असं वर्षा यांनी म्हटलं.
सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेणार असल्याचंही वर्षा उपाध्याय यांनी सांगितलं.
'ऑनलाइन ट्रेनिंग सगळ्यांना कसं शक्य?'
एकीकडे कोव्हिडोत्तर काळात फिटनेस इंडस्ट्री अधिकाधिक तंत्रज्ञानाची मदत घेणार का, अशी चर्चा सुरू आहे. वर्षा उपाध्याय किंवा कृष्णा दास यांच्यासारखी इतरंही उदाहरणं आहेत, ज्यांनी नवीन मार्गांचा अवलंब केला आहे. पण हे सर्वांनाच शक्य आहे का?
घाटकोपर इथल्या फिटफुल फिटनेस या जिमचे मालक भूषण पवार यांनी म्हटलं, "ऑनलाइन ट्रेनिंग देण्यासंदर्भात आम्ही मेंबर्सशी संपर्क साधला. पण त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. शिवाय ऑनलाइन ट्रेनिंगच्या काही मर्यादा आहेत. ऑनलाइन ट्रेनिंगमध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी फंक्शनल ट्रेनिंग आम्ही देऊ शकतो, पण वेट ट्रेनिंगसाठी मशिन्सचीच गरज असते."

फोटो स्रोत, Bhushan pawar
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून भूषण यांचं जिम बंद आहे.
"आमचं आर्थिक उत्पन्नाचं साधन जिम आहे. इतर कोणताही पार्ट टाइम जॉबही नाही. अशापरिस्थितीत गेले सहा महिने शून्य उत्पन्न आहे. सरकारकडून आम्हाला दर महिन्याला आश्वासन दिलं जातं...य़ा महिन्यात जिम ओपन करण्याचा विचार करू वगैरे, पण प्रत्यक्षात काही होत नाहीये. ट्रेनर, मॅनेजर, हाऊस कीपिंग असा सगळा मिळून पाच जणांचा स्टाफ होता. आता त्यांचंही रोजगाराचं साधन हिरावलं गेलं आहे."
जिम बंद असलं तरी त्याची देखभाल, मशिन्सचा मेन्टेनन्स तर सुरूच आहे. अर्थात, सध्या तरी मशिन्सची देखभाल भूषण स्वतःच करतात.
जिम सुरू झालं तरी एरवीपेक्षा खर्च वाढलेलाच असेल, असं भूषण सांगतात.
"जिम आधी सॅनिटाइज करून घ्यावं लागेल. त्यानंतर शरीराचं तापमान तपासण्यासाठी गन घ्यावी लागेल, ऑक्सिमीटर ठेवावं लागेल. बॅचेसची संख्याही मर्यादित ठेवावी लागेल. कारण एरवीप्रमाणे बॅचची रचना करता येणार नाही. एक बॅच संपल्यानंतर सगळी उपकरणं पुन्हा सॅनिटाइज करावी लागतील आणि त्यानंतर पुन्हा दुसरी बॅच आतमध्ये घ्यावी लागेल. "
त्यामुळे आता लवकरात लवकर जिम सुरू करण्यासंबंधी निर्णय व्हावा, असं भूषण यांना वाटतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























