You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतची भगतसिंग यांच्याशी तुलना, दाक्षिणात्य अभिनेता विशालची पोस्ट #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कंगना राणावतची भगतसिंग यांच्याशी तुलना, दाक्षिणात्य अभिनेता विशालची पोस्ट
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं आहे.
पालिकेच्या या कारवाईवर दाक्षिणात्य अभिनेता विशाल यानं नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं कंगनाची तुलना थेट भगतसिंग यांच्याशी करत तिला पाठिंबा दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
विशालनं ट्वीट केलं की, "प्रिय कंगना, तुमच्या धैर्याला सलाम. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही या वादात उडी मारली. हे तुमचं वैयक्तिक प्रकरण नाही. तरी देखील सरकारच्या प्रकोपाचा सामना तुम्हाला करावा लागत आहे. पण तुम्ही तितक्याच सक्षमपणे उभ्या आहात. हे खूप मोठं उदाहरण आहे. 1920 साली भगत सिंग यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती," अशा आशयाचं ट्विट करुन विशालने कंगनाची तोंड भरुन स्तुती केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
यामुळे सरकारचं काही चुकत असेल तर त्याविरोधात बोलण्याची सामान्य माणसाला ताकद मिळेल, असंही त्यांनी पुढे म्हटलंय.
दरम्यान, "कंगना राणावतला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे ही त्यांचीही भावना आहे. आमचीही हीच भावना आहे. मुंबई ही आरपीआयची आहे, भाजपाची, राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेसची, शिवसेनेची सगळ्यांची आहे. मुंबईत राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे," असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
कंगनासोबत एक तास चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
2. खडसेंसारख्या कार्यकर्त्यांमुळेच पक्षाला आज अच्छे दिन - नितीन गडकरी
फार पूर्वीपासून आम्ही राज्यात खडसेंसोबत पक्षाचं काम करत आलो आहोत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यावेळच्या प्रतिकूल काळात आम्ही महाराष्ट्रात भाजपची उभारणी केली. आज जे चांगले दिवस आहेत, ते खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचं फलित आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.
जनसेवेचा मानबिंदू- एकनाथ खडसे या पुस्तकाचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात खडसे यांनी फडवीसांना टोला लगावला आहे.
ते म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण त्यांनी महाराष्ट्रात तिकीट वाटपात जसे राजकारण केले, तसे बिहारमध्ये करू नये', असं खडसेंनी म्हटलं आहे.
3. राम मंदिराच्या देणगी खात्यातून 6 लाख रुपयांची चोरी
राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा होत आहेत. पण, त्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
या खात्यातून 6 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. क्लोन चेकरचा वापर करून ही रक्कम लंपास करण्यात आली आहे. लखनऊ मधील दोन बँकांमध्ये क्लोन चेकचा वापर करून 6 लाखांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला आहे.
यानंतर अयोध्या पोलीस स्थानकार FIR दाखल करण्यात आली आहे.
4. परेश रावल यांची एनएसडीच्या अध्यक्षपदी निवड
भाजपचे माजी लोकसभा खासदार आणि अभिनेता परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी परेश रावल यांची नियुक्ती केली. लोकमतनं ही बातमी दिलीय.
सध्या या पदावर राजस्थानी कवी अर्जुन चरण हे कार्यरत असून लवकरच परेश रावल पदभार स्वीकारतील. चरण हे 2018 मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत, परेश रावल यांचं अभिनंदन केलंय.
प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांची महामहीम राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रावल यांच्या प्रतिभावान व अनुभवाचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. हार्दिक अभिनंदन... असं ट्वीट प्रल्हाद सिंह पटेल यांनी केलंय.
5. सुदर्शन न्यूजच्या 'त्या' कार्यक्रमाला केंद्र सरकारची परवानगी
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूदर्शन न्यूजच्या वादग्रस्त कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम 'नागरी सेवांमध्ये वर्गात एका विशिष्ट समुदायाची घुसखोर वाढत आहे,' असा दावा करणारा होता. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयानं 28 ऑगस्टला या कार्यक्रमावर बंदी आणली होती. जामिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्यानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश नवीन चावला यांनी हा कार्यक्रम थांबवण्याचे आदेश दिले होते.
आता मंत्रालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, "सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी 31 ऑगस्टला अधिकृतरित्या जबाब नोंदवला होता. त्यानंतर मंत्रालयानं निर्णय घेतलाकी, कार्यक्रमातील कंटेटमुळे कायद्याचं उल्लंघन होत असेल तर चॅनेलविरोधात कारवाई केली जाईल. कार्यक्रम प्रसिद्ध होण्यापूर्वी कार्यक्रमाची स्क्रिप्ट मागवणं शक्य नाही, तसंच कार्यक्रमाचा प्रसार थांबवता येऊ शकत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)