You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतचं अनिल देशमुख यांना आवाहन : 'माझी ड्रग्ज टेस्ट कराच'
अभिनेत्री कंगना राणावतबाबत अभिनेते शेखर सुमन यांचे पुत्र अध्ययन सुमन यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे. "कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि तिने मलाही ड्रग्ज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला," असा आरोप अध्ययन सुमननं डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, कंगनाबाबतच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल.
त्यावर "मी माझी ड्रग्ज टेक्स करून द्यायला तयार आहे, माझ्या रक्तात त्याचे नमुने आढळले किंवा माझा ड्रग्ज विक्रेत्यांशी काही संबंध आढळला तर मी माझी चूकी मान्य करेल आणि मुंबई कायमची सोडून जाईल," असं ट्वीट कंकना रणावतने केलं आहे.
अनिल देशमुख यांनी सांगितलं, "आमदार सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाई यांनी अभिनेत्री कंगना राणावतबाबत तक्रार दिलीय की, शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी DNA वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि मला सुद्धा ड्रग्ज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. याबाबत आमची अनेकदा भांडणं सुद्धा झाली. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याची प्रत आणि व्हीडिओ क्लिप आमदारांनी माझ्याकडे सुपूर्द केलीय. या प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल."
प्रताप सरनाईक यांनी याआधीही कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कंगनानं ज्यावेळी मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली, त्यावेळी आमदार सरनाईक यांनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
संजय राऊत विरुद्ध कंगना
कंगनाला सुरक्षा देण्यापाठीमागे कंगनाची वक्तव्यं आणि त्यातून निर्माण झालेला वाद कारणीभूत आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, असं विधान कंगनानं केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्यांना मुंबईत सुरक्षित वाटत नाही, त्यांनी आपलं चंबूगबाळं आवरावं असं म्हटलं होतं.
कंगनाच्या या विधानावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
त्यानंतर कंगनानं 'मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 सप्टेंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं,' असं ट्वीट केलं होतं.
कंगनाच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे... ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा."
हा वाद तेव्हा चिघळला जेव्हा कंगनानं "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतल्या आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?" असं ट्वीट केलं. या ट्वीटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कंगनावर टीका केली.
मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'सोबत केल्यानंतर कंगना राणावतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख 'हरामखोर मुलगी' असा केला. यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. सुशांत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं भाजपनं म्हटलं.
कंगनानंही यानंतर एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. या व्हीडिओत कंगनानं म्हटलं आहे, की संजय राऊत, "तुम्ही मला एक 'हरामखोर मुलगी' म्हटलं. तुम्ही सरकारमधील नेते आहात आणि दरदिवशी देशात किती महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात, हे तुम्हाला माहिती असेलच. यासाठी तुम्ही ज्या मानसिकतेचं प्रदर्शन समाजासमोर केलं आहे, ती जबाबदार आहे."
केंद्राकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा
कंगना रानावतला केंद्र सरकारनं Y दर्जाची सुरक्षा दिल्याचं ANIया वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
याविषयी ट्वीट करताना कंगनाने म्हटलं, "कोणत्याही देशभक्त व्यक्तीच्या आवाजाला सरंजामशाही मानसिकता दडपू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. खरं तर परिस्थिती पाहता त्यांनी मला काही दिवस मुंबईला जाऊ नको, असं म्हटलं असतं. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीच्या वचनाचा मान ठेवला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची लाज राखली."
त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.
"मोदी सरकार आपल्या समर्थकांची, आपला अजेंडा चालवणाऱ्यांची अत्यंत काळजी घेत असते, हे वेळोवेळी स्पष्ट झालंय. म्हणूनच आता कंगना राणावत यांना Y दर्जाची सुरक्षा दिली गेली, याबाबत आश्चर्य वाटण्याचं कारण नाही," असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
ड्रग माफिया कनेक्शन आणि बॉलीवूडच्या संदर्भात मोठी माहिती आहे, असं कंगना म्हणत होती. त्यामुळे त्यांनी ही माहिती NCBकडे द्यावी, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. पण, त्यानंतर काही व्हीडिओ समोर आले त्यात कंगना स्वत: ड्रग घ्यायची असं दिसून आल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं.
बीएमसी बदल्याची कारवाई करत नाही - महापौर
कंगना रणावतच्या ऑफिसला बीएमसीनं दिलेल्या नोटीसीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.
"कंगनाच्या आजूबाजूच्या लोकांकडून तक्रार आल्या असाव्यात त्यामुळेच तिच्या कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे, सर्व गोष्टी नियमानुसार होतील. कंगनाने मालमत्तेत केलेल्या बदलांची माहिती पालिकेला दिल्यावर तिला बाजू मांडण्याची संधी दिल जाईल. त्याची चौकशी केली जाईल, बीएमसी कुठल्याही गोष्टी बदला घेण्यासाठी करत नाही," असं पेडणेकर यांनी म्हटलंय.
कंगनाला मुंबईत आल्यावर होम क्वारंटिन करणार का असा सवाल केल्यावर, सामान्य लोकांसाठी जे नियम आहेत तेच तिच्यासाठीसुद्धा लागू आहेत, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)