देवेंद्र फडणवीस: 'उद्धव ठाकरे सरकारचं माध्यमांबाबतचं धोरण दुटप्पी'

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या

1. उद्धव ठाकरे सरकारचं माध्यमांबाबतचं धोरण दुटप्पी, हक्कभंग प्रस्तावावरून फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदराने बोलायला हवं, अशी आमची भूमिका आहे. पण सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान, राज्यपाल यांचा उल्लेख कशाही प्रकारे होतो, हे तुम्हाला चालतं, तुमची इज्जत चांगली आणि त्यांच्या चिंध्या, हे कसं चालेल? यामुळे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचं माध्यमांबाबतचं धोरण दुटप्पी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धच्या हक्कभंग प्रस्तावाला अनुमोदन देताना भाषण केलं होतं. त्यानंतर फडणवीस विधानसभेत बोलण्यास उभे राहिले.

"प्रसारमाध्यमं मुख्यमंत्र्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करत असतील, तर त्याचं समर्थन नाही. पण ज्या पोटतिडकीने छगन भुजबळ उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबाबत बोलतात, तसा त्यांनी सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत कसा उल्लेख होतो, हे तपासून पाहावे. सरकारची हे धोरण दुटप्पी आहे. याविषयी समान पद्धतीने भूमिका घ्यावी, असं फडणवीस म्हणाले. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

2. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा रद्द

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (8 सप्टेंबर) विधानसभेत केली.

राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असं वर्गीकरण करण्यात आलं होतं.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

यानुसार स्थानिक भागातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा, तर उर्वरित 30 टक्के जागांवर राज्यातील इतर भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. मराठवाडा आणि विदर्भात महाविद्यालयांची संख्या कमी आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी करत होते. या भागातील विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

3. पंतप्रधान दिल्लीत बसून निर्णय घेतात, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री वर्षावरून निर्णय घेतात - अजित पवार

कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यातून बाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, Ajit pawar/facebook

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं चांद्यापासून बांद्यापर्यंत लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे दिल्लीत बसून निर्णय घेतात, त्याप्रमाणेच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यातून निर्णय घेतात, यात बिघडलं कुठे?" असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला आहे. ते विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना बोलत होते. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

4. जलयुक्त शिवार योजना अपयशी, कॅगच्या अहवालात ठपका

माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना मानली जाते.

पण जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट अपयशी ठरल्याचं कॅगच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

जलयुक्त शिवार

फोटो स्रोत, CMO MAHARASHTRA

जलयुक्त शिवार योजनेत 9 हजार 634 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र, पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात योजना अपयशी ठरल्याचं कॅगने म्हटलं आहे. योजनेतून गावांतील पिण्याच्या पाण्याची गरजही भागवली गेली नाही, त्याठिकाणी टँकर्स सुरू असल्याचं कॅगने निदर्शनास आणून दिलं. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

5. कंगनाला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेनेने करू नये - रामदास आठवले

"कंगना राणावतला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेनेने करू नये," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. टीव्ही 9 मराठीने याबाबत बातमी दिली आहे.

कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या वाद सुरू आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिसं असून कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावत बुधवारी (9 सप्टेंबर) मुंबईत येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिला संरक्षण देण्यात येईल. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दुपारी 12 पासून तिच्या संरक्षणासाठी मुंबई विमानतळावर सज्ज असतील, असं आठवले म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)